नवीन लेखन...

भांडणातली मैत्री

आदित्य, प्रणय आणि हेमंत हे तिघे जण एकमेकांचे खूपच जिवलग मित्र. या तिघांना जेव्हा एकत्र फिरताना पाहिल्यावर असं जाणवायचं की, या जगात मैत्रीच्या नात्याबद्दल ज्या विविध गोष्टी सांगितल्या जातात, त्या या तिघांना एकत्र पाहिल्यावर त्या गोष्टींमधील खरेपणा यांच्या मैत्रिकडे पाहून जाणवत असे. मी त्यांना कधीही एकटे फिरत असल्याचे पाहिलेलं आठवत नाही. जेव्हा पाहावं तेव्हा ते तिघे एकत्रच असायचे. कुठेही फिरायला जायचे म्हंटल तर ते तिघेही एकत्रच फिरायला जाताना दिसायचे. कधी एकमेकांची मस्करी करत बसायचे, तर कधी एकमेकांसोबत हसण्याच्या गोष्टी करत बसायचे . तिघे जरी एकत्र या सर्व गोष्टी करत असले तरी त्यांच्या स्वभावात खूप वेगळेपणा दिसून येत होता.  तिघांचेही स्वभाव एकमेकांपेक्षाही खूप वेगळे होते.  आदित्य थोडा शांत स्वभावाचा होता आणि तेवढाच कठोर मनाचा देखील होता. त्याला मस्करी केलेली अजिबात आवडत नाही, हे या दोघांना आधीपासून माहीत असूनसुदधा ते दोघे त्याची सतत मस्करी करत असायचे. या मस्करीतून कधी-कधी थोडंस भांडण आणि थोड्या दिवसांसाठी आदित्यचा रुसवा हा ठरलेलाच असायचा. हा रुसवा अजून किती दिवस राहील हे त्या दोघांना चांगलेच ठाऊक होते. हेमंत चा स्वभावही खूप वेगळा होता. तो येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाला वेड्यात काढत असे. बोल बच्चन मारण्यात त्याचा हात कुणीच धरू शकत नाही असा हा हेमंत होता. आदित्यला वेड्यात काढण्यात त्याला वेगळीच मजा वाटायची. आदित्य ही काही कमी नव्हता. “एखाद्याला वेड्यात काढणे म्हणजे मुर्खपणाची / वेडेपणाची लक्षणे असतात रे हेमंत. आता तूच ठरव तू कोण आहेस”  आदित्यच्या अशा बोलण्यापुढे हेमंत मात्र गप्प राहणेच पसंद करायचा.  प्रणय मात्र या दोघांपेक्षाही खूप वेगळा होता. दिसायला ही खूप सुंदर अन तेवढाच हुशार आणि त्याच्या बोलण्यात असणारा समजूतदारपणा हा गुण त्याचा स्वभाव श्रेष्ठ असल्याची जाणीव इतरांना करून देत असे. अशा या दृष्ट लागण्यासारख्या मैत्रीला एखाद्या स्वार्थी माणसाची लगेच दृष्ट लागेल यात काही शंका नव्हती.

नेहमीच्या सवयीप्रमाणे आज लवकर झोपेतून उठलो आणि थोडासा व्यायाम करण्यासाठी घराच्या बाहेर पडलो. हिवाळ्याचे दिवस असल्याने हवेत खूप गारवा होता. पावसाळ्यातील चिखलपेक्षा आणि उन्हाळ्यातील गरमीपेक्षा हा गारवा खूप सुखदायक वाटत होता. सकाळची 6 ची वेळ असल्याने सभोवतालचा परिसर थोडा अंधुक-अंधुक दिसत होता. पक्षांचा किलबिलाट तर चालूच होता. जवळच असणाऱ्या नदीच्या पाण्याचा आवाज मनाचं लक्ष वेधून घेत होता; पण हा मन वेधून घेण्याचा क्षण फार काही वेळ टिकला नाही. समोरून येणाऱ्या आदित्यकडे माझी नजर गेली. तो समोरच्या वाटेने चालत येत होता. त्याचा चालण्याचा वेग जरा जास्तच होता. काही क्षणातच तो माझ्या समोरून निघून गेला आणि दिसेनासा झाला. त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव मला चटकन ओळखता आले. त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव काही वेगळेच सांगत होते. तो रागामध्ये स्वतःच्या मनाशी हळू आवाजात काहीतरी पुटपुटत चालला होता. याचा अर्थ तो खूप रागामध्ये होता त्यामुळे त्याची नजर माझ्याकडे गेली नसावी. पण याला आज अस अचानक काय झाले रागवायला? नेहमी तर हा शांत असतो. याला कोणी काही बोललं असेल किंवा याची कुणीतरी चेष्टा मस्करी केली असेल; पण इथे तर आमच्या दोघांव्यतिरिक्त कुणीच दिसत नव्हतं. मी असा विचार करण्यात गुंग होतो, तोपर्यंत आदित्य दिसेनासा झालेला होता.

आदित्यच्या चालण्याचा वेग इतका जास्त होता की, तो केव्हा माझ्या नजरेसमोरुन दिसेनासा झाला, हे माझे मलाच समजलं नाही. जेव्हा समजलं तोपर्यंत तो खूपच लांब निघून गेलेला होता. तो ज्या वेगाने माझ्या समोरून निघून गेला आणि ज्या वेगाने दिसेनासा झाला त्याच वेगाने तो माझ्या मनात एक प्रकारे विचारांचे वादळ निर्माण करून गेला. मला त्या तिघांच्या या निखळ मैत्रीतील भांडणाची कारणे जाणून घेण्याची उत्सुकता लागलेली  होती. याच उत्सुकतेमुळे माझी नजर त्याला शोधायला जात होती. माझी पावले आता आदित्य ज्या दिशेकडे गेला आहे त्या दिशेकडे जाऊ लागली. तेवढ्यात मला प्रणय आणि हेमंत येत असल्याचे दिसले. मी माझी पावले पुन्हा थांबवली आणि माझा मोर्चा त्या दोघांकडे वळवला. मनात खूप प्रश्न आणि विचार येत होते. हे प्रश्न आणि विचार त्या दोघांजवळ बोलून दाखवावे; पण मी माझ्या विचारांना आणि स्वत्तःच्या मनाला रोखले. कारण त्या दोघांना पाहताक्षणी असं जाणवत होतं की, ते दोघे खूपच नाराज झालेले आहेत. ही परिस्थिती त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. मी स्वतःच्या मनालाच काही प्रश्न विचारले. या दोघांना आदित्यच्या रुसवा आणि रागाबद्दल विचारावं. तो सतत तुम्हा दोघांशी का भांडत असतो?  भांडण झाल्यावर थोड्या दिवसांसाठी बोलणे बंद करून पुन्हा एक दिवस पहिल्यासारखा का बोलतो? जस काही झालंच नाही. भांडायचे असेल तर एकदाच भांडणे करून आयुष्यभर बोलणं बंद तो का करत नाही? पुन्हा तो त्या दोघांच्या आयुष्यात माघारी का येत असेल?  मी आत्तापर्यंत खूप मुलांच्या मैत्री पाहत आलेला होतो. आत्ताही पाहत आहे. अशा मैत्रींमध्ये मित्रांची एकदा भांडणे झाल्यावर ते मित्र एकमेकांचे आयुष्यभर तोंड पाहत नाहीत. एकमेकांसोबत एक शब्द सुद्धा बोलत नाहीत . एकमेकांसमोरून जर चालत येण्याचा प्रसंग आलाच, तर ते तो मार्ग चुकवून दुसऱ्या मार्गाने निघून जातात. पण या तिघांची मैत्री बाकीच्यांपेक्षा खूप वेगळी असलेली दिसून येतेय कारण,आदित्य एवढ्या दिवसांमध्ये त्या दोघांशी कितीतरी वेळा भांडला असेल हे सांगता पण येऊ शकत नाही. एवढी भांडणे होऊन सुद्धा आदित्य आपला राग विसरून थोड्या दिवसांनी त्यांना असा येऊन मिळतो, जसे की त्यांच्यामध्ये येथून मागच्या आयुष्यात कोणतीच भांडणे झालीच नव्हती. तो बाकीच्या मुलांसारखा आयुष्यभर एकमेकांशी एकही शब्द न बोलणे किंवा एकमेकांच्या समोरून चालत येण्याचा प्रसंग आला, तर लगेच मार्ग चुकवून जाणे. एकमेकांचे तोंडही न पाहणे. या पर्यायांपैकी आदित्य कोणत्याच पर्यायात सामाविष्ट होत नव्हता. हे त्या तिघांच्या मैत्रीचे एक श्रेष्ठत्वाचे लक्षण होते. त्यामुळे मला या तिघांच्या मैत्रीची आणि या मैत्रीतील भांडणाची कारणे जाणून घेण्याची उत्सुकता लागलेली होती. त्या दोघां व्यतिरिक्त आदित्यच्या आशा वागण्याची कारणे खासकरून जाणून घ्यायची होती. माझ्या या सर्व विचारांबद्दल आणि माझ्या मनाला पडणाऱ्या प्रश्नांबद्दल हेमंत आणि प्रणय या दोघांजवळ बोलण्याचे कटाक्षाने टाळले. कारण त्यांना मी हे सर्व सांगितले, माझ्या मनातील विचारांना आणि प्रश्नांना त्यांच्यासमोर वाट मोकळी करून दिली, तर माझ्या अशा वागण्यामुळे त्यांच्या जखमेवरती मीठ चोळल्यासारखे झाले असते. त्या तिघांच्या मैत्रीत भाग घेण्याचा माझा काही एक हक्क नव्हता. त्यामुळे मी या विषयावर बोलण्याचे कटाक्षाने टाळले. दररोजच्या सारख आमच्यात जे साधे बोलणं व्हायच तेच बोलून मी त्यांचा शेवटी निरोप घेतला आणि तेथून निघून जाण्याचा निर्णय घेतला.

माझे काम अजून संपलेल नव्हतं. आता तर खरे काम सुरू झालेलं होतं.  विचार आणि त्या विचारांतून निर्माण झालेले प्रश्न, या सर्वांची उत्तरे शोधण्याचे काम माझे मलाच करावं लागणार होतं. या विचारांमधून निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे मला फक्त तीनच माणसे देऊ शकत होती. ती तीन माणसे म्हणजे हेमंत, प्रणय आणि आदित्य. या तिघांव्यतिरिक्त अजून कोणीही मला या प्रश्नांची उत्तरे देऊ शकणार नव्हतं. याची मला आधीपासूनच जाणीव झालेली होती. याहीपेक्षा सर्वात मोठा प्रश्न हा होता की मी हे सर्व त्यांना कस विचारू? मला थोडे अवघड झाल्यासारखे वाटू लागलं. मी जसा-जसा विचार करत होतो तसा-तसा मी त्या विचारांमध्ये अधिकच गुंतत चाललेला होतो. या वाढीव विचारांतून आणखीन  नवीन प्रश्न माझ्यासमोर उभे राहत होते. मी थोडावेळ माझ्या मनाशीच विचार केला. मी  सतत हाच विचार करत राहिलो तर मी त्या विचारांमध्ये पूर्णपणे अडकून बसेल.  यालाच म्हणतात स्वतःच्या जाळ्यात स्वतःच अडकणे. मला या जाळ्यात अडकायचं नव्हतं. त्यासाठी या सर्व गोष्टींचा विचार बाजूला ठेवून प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या मागे लागलो. मला हवे ते उत्तर मिळण्यासाठी माझ्या समोर हेमंत ,प्रणय आणि आदित्य हे तीनच पर्याय होते. या तिघांकडूनच मला उत्तरे मिळण्याची खात्री होती. मी आदित्यचा विचार थोडावेळ बाजूला ठेवला आणि हेमंत आणि प्रणय चा विचार करू लागलो. मला यामधून असं जाणवलं की, हेमंत आणि प्रणय माझ्या प्रश्नांची  उत्तरे देऊ शकणार नाहीत; कारण त्यांना सुद्धा माझ्यासारखेच प्रश्न पडलेले असतील. आपला मित्र ‘आदित्य’ आपल्याबरोबरच असा का वागत असले. माझ्यासमोर आता फक्त एकच पर्याय शिल्लक राहिलेला होता आणि तो पर्याय म्हणजे स्वतः आदित्य. मला माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे फक्त न फक्त तोच देऊ शकत होता. याच कारण म्हणजे, मला आदित्य बद्दल एक गोष्ट पहिल्यापासून माहिती होती. ती गोष्ट म्हणजे आदित्यच्या रागाबद्दल, त्याला येणारा राग हा जरी लवकर येत असला तरीही त्याचा हा राग जास्त काळ टिकत नसे. त्यामुळे मला तर हाच पर्याय योग्य वाटत होता .मी माझी पावले आदित्य ज्या दिशेने गेला आहे त्या दिशेकडे वळवली.

मी माझ्या चालण्याचा वेग वाढविण्याचा प्रयत्न करत होतो . कारण आदित्य थोड्यावेळापूर्वी रागाच्या भरात झटपट पावले टाकत माझ्या समोरून गेलेला होता. काही कळायच्या आधीच तो माझ्या नजरेसमोरून दिसेनासा झालेला होता. मी त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावरील फक्त रागाचे हावभाव टिपण्यात यशस्वी झालेला होतो. या सर्व परिस्थितीवरून सहज लक्षात येत होते की, आदित्य आत्तापर्यंत खूप लांब पोचलेला असले. या विचाराने मी ही माझ्या चालण्याचा वेग वाढवू लागलो. मला काहीही करून त्याला गाठायचे होते. या सर्व परिस्थितीबद्दल त्याच्यासोबत चर्चा करायची होती. मी एवढ्या वेळात बरच अंतर चालत येऊन कापलेले होतं, तरीसुद्धा  मला आदित्य कुठेही दिसत नव्हता. लांबपर्यंत पाहिलं तर कुणीच दिसत नव्हतं. मला अस थांबून चालणार नव्हतं. या विचाराने मी माझा चालण्याचा वेग अजूनच वाढवला. सकाळची  6  वाजण्याची वेळ असल्याने हवेत गारवा अजून टिकून होता.  जवळच असलेल्या झाडांवर बसलेल्या पक्षांचा किलबिलाट कानावर ऐकू येत होता. माझा चालण्याचा वेग आणि पावलांचा टप-टप आवाज तेथील वातावरणात घुमत होता. या घुमणाऱ्या आवाजामुळे झाडांवरती किलबिलाट करणाऱ्या पक्षाचा आवाज थोड्या क्षणांसाठी शांत होत होता. काही पक्षी अशा घुमणाऱ्या आवाजाला घाबरून लांब उडून  जात होते. मी इथल्या या निसर्गरम्य सर्व गोष्टींकडे  फारस लक्ष देण्याचा प्रयत्न न करता चालतच राहिलो .

माझ्या चालण्याच्या जास्त वेगामुळे मी शेवटी यशस्वी झालेला होतो. समोर पाहिल्यावर अस जाणवत होतं की, थोड्या लांबच्या अंतरावर कुणीतरी चालत जात आहे. तो नक्कीच आदित्य असणार यात काही शंका नव्हती. कारण एवढ्या सकाळच्या वेळी या ठिकाणी सहसा कुणी फिरकत नसायचं. तो जरी माझ्यापासून लांब होता तरीपण त्याच्या चालण्याचा वेग मंदावला आहे असं जाणवत होते. त्यामुळे  मी अजून भरभर चालू लागलो. मी चालत असताना त्याला हाक मारण्याचा प्रयत्न करत होतो. अंतर जास्त असल्यामुळे माझा आवाज त्याच्यापर्यंत पोहचत नसावा. जेव्हा तो माझ्यापासून काही क्षणाच्या आणि हाकेच्या अंतरावर असल्याचे पाहून मी शेवटी त्याच्यामागे पळत सुटलो. मी  त्या क्षणी स्वतःला धावत जाण्यापासून रोखू शकलो नाही. धावत असताना मी त्याला आवाज देण्याचा प्रयत्न करत होतो. जसा की खो खो च्या खेळामध्ये एकमेकांना जसा खो देतात तसा तो माझा आवाज ऐकल्यावर चालायचं बंद करून आहे त्याच जागेवरती उभा राहिला. मला येथे पाहून तो आश्चर्यचकित झाला आहे, हे त्याच्या चेहऱ्यावरील हावभावावरून स्पष्ट जाणवत होत. कारण तोही मनातल्या मनात विचार करत असेल की, कधीच कुणाशी स्वतःहून न बोलणाऱ्या या मुलाने मला आज असा अचानक आवाज का दिला असावा. मी त्याच्यासमोर येऊन उभा राहिल्यावर  तो माझ्याकडे गंभीर चेहरा करून पाहू लागला .

“अरे काय झालं तुला?

      असा का धावत पळत आला आहेस?

      तुला काही झालंय का”?

       (थोड्या गंभीर स्वरात )

त्याच्या अशा बोलण्याकडं माझ अजिबात लक्ष गेलं नाही, कारण मीच खूप आश्चर्यचकित झालेला होतो .थोड्यावेळापूर्वी मी ज्या आदित्यला रागाच्या भरात चालत जाताना पाहिलेलं होतं आणि आत्ता  ज्या आदित्यला समोर पाहतोय, त्यामध्ये मला खूप फरक जाणवत होता. व्यक्ती जरी एकच असली तरी या क्षणी मला आदित्यची दोन रूपे दिसत दिसत होती.  काही वेळापूर्वी  रागाच्या भरात वेगाने चालत जाणारा आणि मला काही कळायच्या आधीच काही क्षणांत माझ्या नजरेपासून दिसेनासा झालेला हा आदित्य यावेळी खूप शांत भासत होता, जस काही झालेच नाही. त्याच्या चेहऱ्यावर कुठेही राग दिसत नव्हता. राग पूर्णपणे गेलेला होता. मला आता  या मुलाची कमालच वाटायला लागली होती . तेवढ्याच तो जरा थोड्या मोठ्या आवाजात माझ्याशी बोलू  बोलला.

 “ये हॅलो कुठे हरवलास? मी तुझ्याशी बोलतोय”?

त्याच्या या मोठ्या आवाजाने मी भानावरती आलेलो होतो. मी त्याला हसत म्हणालो.

अरे आदित्य, मी कुठेही हरवलेलो नाहीये. मी धावण्याचा सराव करत होतो तेवढ्याच तू चालत जाताना दिसलास. मी तुला आवाज देण्याचाही प्रयत्न करत होतो; पण तू माझा आवाज नीट ऐकला नाहीस वाटतं, म्हणून मी तुझा पाठलाग करत धावत-पळत इथपर्यंत आलो .

माझे हे खोट बोलणं त्याच्यापुढे बहुधा खपलं असावं. तोही हसत बोलला. “बर ठीक आहे. मला पण जास्त चालण्यामुळे खूप  कंटाळा आला आहे आणि आज मला जरा जास्तच बोरिंग वाटत आहे. बर झालं तू भेटलास ते. आपण थोडावेळ इथेच थांबून विश्रांती घेऊया.”

(अस बोलत असताना अचानक त्याने माझ्या हाताला पकडलं आणि मला खाली बसवून तोही माझ्यासोबत बसला.)

मी –    अरे आदित्य तुझे ते दोघे मित्र तुझ्याबरोबर आज आले नाहीत का? दररोज तर तुम्ही तिघे एकत्रच येता ना? आज सूर्य पश्चिमेकडे उगवला आहे की काय?

         (माझ्या आशा बोलण्यामुळे तो जरा भडकला होता, पण मी शेवटी विनोद केल्यामुळे माझे हे बोलणे त्याने जास्त  मनाला लावून न घेता तो बोलू लागला.)

आदित्य – “त्यांचे ते दररोजच असत यार .मग मीही खूप बोललो त्या दोघांना आणि त्यांना तसेच मागे सोडून एकटाच पुढे चालत  निघून आलो. आता येत असतील चालत माघून.”

आदित्यच्या अशा बोलण्यातून मला असे जाणवलं की तो माझ्यापुढे आता व्यक्त होत आहे. मलाही हेच हवे होतं. कारण मलाही त्याला काही प्रश्न विचारायचे होते. पण कसे विचारू ते समजत नव्हतं. नक्की कोठून विचारायला सुरवात करू हाच प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला होता .पण तो आता व्यक्त होतोय याची जाणीव झाल्यामुळे मला थोडा धीर सापडला होता. मी या गोष्टीचा लगेच फायदा घेऊन त्याला सरळ विचारून टाकलं .

अरे आदित्य मघाशी तू खूप रागाने चालत येत होतास. मला माहितीये तुमची भांडणे झाली असणार. तुला एवढ्या पटकन राग का येतो? ते दोघे तर तुझे जिवलग मित्र आहेत ना, मग त्यांच्यावर कशाला रागवायचं आणि सारख-सारख भांडण करून काय मिळतं तुला? भांडणेही करतोस आणि थोड्या दिवसानंतर पुन्हा त्यांच्याशी पहिल्यासारखं बोलतोस. जस काय इथून मागे तुमच्यामध्ये काहीच भांडणे झालीच नव्हती. याला नक्की कोणती भांडणे म्हणायची? तू त्यांच्याशी सतत एवढा का भांडत असतोस . नक्की काय कारण आहे, मला खूप विशेष वाटत यार तुमच्या या मैत्रीचं अन खासकरून तुझं. मी विचारलेल्या या सर्व प्रश्नांबद्दल तुला काहीतरी वाटत असेलच की?

मी हे सर्व त्याच्यासमोर बोलून रिकामा झालेला होतो. एवढ्या वेळ मनात साठवलेलं एका क्षणात त्याच्यासमोर बोलून टाकलं होतं. माझ बोलणं जेव्हा सुरू झालं तेव्हापासून ते जेव्हा माझे बोलणं थांबलं तोपर्यंत त्याचं लक्ष माझ्या बोलण्याकडेचं होत. मी हे सर्व त्याला विचारत असताना त्याच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची भावना उमटली नाही हे त्याच्याकडे  पाहून स्पष्ट जाणवत होतं. याच्या जागेवर जर दुसरा कुणी मुलगा असता तर त्याला माझ्या बोलण्याचा लगेच राग आला असता. पण आदित्यकडे पाहुल मला असं काहीच जाणवत नव्हतं. उलट तो हसत-हसत माझ्याशी बोलू लागला .

“हो वाटतं ना . तू विचारलेल्या प्रश्नांबद्दल मला खूप काही वाटतं. सुरुवातीला मलापण तुझ्यासारखे प्रश्न पडायचे. पण या प्रश्नांची उत्तरे शोधायला एवढं जड गेलं नाही. कारण काही प्रश्नांची उत्तरे ही आपल्या जवळच असतात. आपण मात्र त्यांची उत्तरे भलतीकडेच शोधत बसतो. खूप शोधून सुद्धा यां प्रश्नांची उत्तरे कुठेच सापडली जात नाहीत, अन मग कायमची प्रश्न बनून आपल्या समोर उभी राहतात. मी ही खूप विचार करायचो. मला एवढ्या लवकर राग का येतो?  खर तर तो राग नसतोच मुळीच. तो तर  माझा एक रुसवा असतो, आणि खास करून त्या दोघांवरती. मी त्या दोघांव्यतिरिक्त कुणावरही रागवत नाही; अन रुसूनही बसत नाही. भांडणे सुद्धा त्या दोघांव्यतिरिक्त कुणाशीही करत नाही. भांडणे  झाल्यावर पुन्हा थोड्या दिवसानंतर मी त्यांच्या बरोबर पहिल्यासारखा बोलू लागतो. कारण त्यांनाही माहितीये हा आदित्य आमच्याशिवाय जास्त दिवस राहू शकत नाही. या गोष्टीची आम्हा तिघांना पहिल्यापासूनच जाणीव आहे. एक सांगू का तुला? मी त्या दोघांबरोबर किती भांडणे केली आहेत हे सांगता पण येऊ शकत नाही. तरीपण मी त्यांच्याशी एकदा भांडणे झाल्यावर पुन्हा थोड्या दिवसानंतर पुन्हा पहिल्यासारखा बोलतो. मला एकदाही आठवत नाहीये, की मी माझ्या या चुकांबद्दल त्यांच्याजवळ ‘सॉरी’ बोललो असेल. कारण पुन्हा त्यांच्याशी बोलण्यासाठी मला सॉरी बोलण्याची कधीच गरज भासली नाही. हा पण या सॉरी च्या ऐवजी ते दोघे मला मस्करीने दोन चार शिव्या देऊन रिकामे होतात अन आमचं पुन्हा पहिल्यासारखं बोलणं, खेळणं, एकत्र फिरणं चालू होत. तुला अजून एक सांगू का? मला तर अस वाटत की,  या जगात फक्त ‘मैत्री’ हेच एक अस नाते आहे की ज्यामध्ये आपण मित्रांशी हक्काने भांडू शकतो. एवढं भांडण होऊन सुद्धा ते मित्र, आपण त्यांच्याजवळ पुन्हा पहिल्यासारखा बोलायला गेल्यावर त्यावेळी ते आपल्याकडून ‘सॉरी’ ची अपेक्षा करत नाहीत,  हा पण त्या सॉरी च्या ऐवजी दोन-चार शिव्या  मात्र नक्की देतील. शिव्या देऊन झाल्यानंतर  थोड्यावेळाने गळ्यात पडतील. मस्करीने  एखादी चापट सुद्धा मारतील, पण नाराज काही होणार नाही, हे मात्र खरं. आता हेच बघ ना, घरी वडिलांबरोबर भांडण झाल्यावर वडील घराबाहेर काढतात, आईबरोबर भांडण झाल्यावर आई थोडा वेळ जेवणच देत नाही, भावाशी भांडण झाल्यावर भावाचा मार खावा लागतो. बहिणीशी भांडण झाल्यावर बहीण नाराज होते किंवा रुसून बसते. तुझ्या लक्षात येत असेल ना मला काय म्हणायचं आहे ते. जिथे रक्ताचं नात सुद्धा कमी पडते तिथे या मैत्रीचं नात नेहमी वरचढ असलेले दिसून येत. त्यामुळ मी त्यांच्याशी एवढं भांडतो, बोलण बंद करतो. शेवटी घरामध्ये असल्यावर मी घरच्यांचा असतो, पण जेव्हा मी घराबाहेर पडतो तेव्हा मी फक्त मित्रांचा असतो. यामुळं कधीना कधी आम्ही पुन्हा पाहिल्यासारख बोलणारच असतो हे त्या दोघांना पक्के ठाऊक आहे.

माझ्याशी एवढे सगळे बोलत असताना त्याला समोरून हेमंत आणि प्रणय येत असल्याचे दिसले. त्याने त्याचं बोलण. मधेच थांबवून, “आता जातो मी घरी” अस बोलून माझा निरोप घेतला आणि  “मी तुला जे काही सांगितलं आहे ते कुणालाच सांगू नकोस”,  हे सांगायलाही तो विसरला नाही …………….

– अक्षय चव्हाण 

Avatar
About Akshay M Chavan 1 Article
Savitribai Phule Pune university student of journalism and mass communication

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..