शामराव तपास आटोपून परत आले. त्यांच्या मनात मात्र हा भोळसट दिसणारा दिनकरच या प्रकरणाच्या मागे असावा असे राहून राहून वाटत होते. बांगड्यांचे तुकडे सापडल्यापासून त्यांच्या मनात एक कल्पना घोळू लागली होती. या पूर्वीच्या अधिकाऱ्यांनी मिसिंग केस संदर्भात या भागातील आणि त्याच्या आसपासच्या भागातील सर्व मिसिंग, मर्डर, अॅक्सिडेंट केसचा धांडोळा घेतला होता पण दिनकर आणि ऐश्वर्या कोकणातल्या ज्या राजापूर भागातून आले होते त्या भागातील त्या तारखेच्या आसपासच्या अशा केसेसच्या धांडोळा घेतला तर कदाचित काही हाती लागू शकेल असे त्यांना राहून राहून वाटत होते. त्यांनी जाधवांना बोलावून राजापूर आणि आसपासच्या परिसरातील पोलीस रेकॉर्डवरच्या अशा सगळ्या केसची तपासणी करायला सांगितले. जाधवांनी बारकाईने तसा तपास केला आणि एका केसवर येताच ते चमकले! त्या केसमधल्या मर्डर झालेल्या बाईचे वर्णन ऐश्वर्याशी जुळत होते. उंची साधारण चार फूट, रंग गोरा, चेहेरा ओळखण्यासारखा नव्हता तरी मयताच्या हातात काचेच्या बांगड्या होत्या आणि त्याचे डिझाईन ‘दबंग’ बँडचेच होते! ते तडक ही सुवार्ता घेऊन शामरावांकडे गेले. लौकिकार्थाने ही कुवार्ता होती पण पोलीस तपासाच्या दृष्टीने ती सुवार्ता होती. एरवी कुवार्ता ऐकून रडे फुटते. इथे मात्र ती कुवार्ता ऐकून शामरावांच्या चेहेऱ्यावर हास्य फुलले! पोलिसांच्या आयुष्यात असेच होते. गुन्ह्याचा शोध घेताना अशा कुवार्ताच त्यांच्या साठी सुवार्ता बनतात.
“जाधव, ही केस गुहागरची आहे. ऐश्वर्या राजापुराची, दिनकरचं गाव गणपतीपुळे मग ही ऐश्वर्या गुहागरला कशाला गेली? पण अजूनही नक्की खात्री देता येत नाही. कारण या केसमध्ये मृताची ओळख पडली नव्हती. तुम्ही त्या गुहागरच्या पोलीस ठाण्याला फोन लावून द्या. मी बोलतो त्यांच्याशी.”
“जी सर” जाधवांनी फोन लावून दिला.
“इन्स्पेक्टर आबूज, गुहागर पोलीस ठाणे.’
“अरे आबूज तुम्ही? मी इन्स्पेक्टर साळुंके, ठाणे पोलीस स्टेशन बोलतोय.”
“बोला साळुंके साहेब काय सेवा करु?”
“आबूज मलाच तुमची थोडी फार सेवा करायची आहे करु ना? आबूज,
तुमच्या भागात एक मर्डर केस झाल्याचा रिपोर्ट वाचला. केस नंबर १७८०. पण त्या मयताची ओळख पटली नाही. मृत्यू श्वास गुदमरुन झाला अशी नोंद आहे. मयताचं वर्णन आमच्या एका मिसिंग केसशी जुळत आहे. मी देतो त्या पत्त्यावर चौकशी करा. निश्चित मयताची ओळख पटेल!”
“काय सांगता? साळुंके साहेब जरा नीट सांगता?”
“आबूज, आमच्या केस मधली मिसिंग व्यक्ती त्याच भागातली आहे. तिचे
वर्णन आणि मुख्य म्हणजे तिच्या हातातल्या ‘दबंग’ डिझाईनच्या बांगड्या यावरुन मला दाट संशय येतोय.”
“ठीक आहे, पत्ता द्या मी तपास करुन लगेच कळवतो.” साळुंकेनी राजापूरचा पत्ता दिला आणि तीन चार तासातच आबूजांचा फोन आला.
“साळुंके साहेब, मानलं यार तुम्हाला. अहो मयताची ओळख पटली. ती तुमची मिसिंगवालीच आहे.”
शामरावांनी मग ताबडतोब दिनकराला बोलावले. दिनकर येताच आतापर्यंत घेतलेला मवाळ पवित्रा त्यांनी बदलला. ते कठोरपणे दिनकरचे निरीक्षण करु लागले. एखादी मांजर उंदराकडे पहाते तसे. दिनकर जागच्या जागीच चुळबुळ करु लागला. शामराव उठले आणि त्यांनी दिनकरच्या पाठीवर जोरात थाप मारली तसा तो थरथर कापू लागला.
“दिनकर तुझी बायको सापडली. चेहेरा सडून गेला होता तिचा. फार वाईट अवस्थेत सापडली बॉडी. ती बॉडी तिथे कुणी टाकली तो पण आम्हाला सापडला. आता बऱ्या बोलाने सगळं खरं सांगता का घेऊ आत?”
“जाधव याला आत घेऊन तुमचा हिसका दाखवा. काही दया माया दाखवू नका. हड्डी पसली एक करा साल्याची.” ते ऐकताच दिनकर जाम घाबरला. रडायला लागला आणि मग त्याने ऐश्वर्याला कसे संपवले याची कहाणी सांगितली. ती अविश्वसनीय वाटावी अशीच होती. तो म्हणाला
“साहेब मीच मारलं तिला! त्या दिवशी भांडून बाहेर पडलो आणि जवळच्याच एका उडपी हॉटेलमध्ये बसलो चहा पीत. माझ्यासमोरच एक माणूस बसला होता. ओळखीचा वाटला. तो ही माझ्याकडेच पहात होता. एकदम ओळख पटली. तो माझा जुना शाळासोबती सदा होता.
“अरे सदा ना तू?”
“हो आणि तू दिनू?
“बरोबर – अरे पण सदा तू इकडे कुठे?’
“काय कामधंदा करतोस?”
“दिनू अरे आपल्याला कोण देणार काम धंदा? पण मी भंगारवाल्याचा धंदा करतोय अलिकडे.”
“भंगार? काय सांगतोस?”
“हो ना, अरे चांगली कमाई होते. नोकरीपेक्षा बरी. महिन्याकाठी आठ दहा हजाराची कमाई होते.
“काय सांगतोस?
“अरे खरंच आणि भांडवलही जास्त नाही लागत. एक हातगाडी आणि
पत्र्याचा मोठा खोका बास!”
“मग इकडे मुंबईत काय करतोस?”
“इथल्या घाऊक व्यापाऱ्यांकडे थोडं काम होते ते संपले. आज संध्याकाळच्या एस.टी.ने परत जाणार गुहागरला.” तो असे म्हणाला आणि त्याच क्षणी माझ्या मनात ती अभद्र कल्पना शिरली. सदाबरोबर माझ्या बायकोचे भंगार धाडून द्यायची. मी त्याला म्हणालो, सदा माझं एक काम करशील? चांगली बिदागी देईन. तो हो म्हणाला, मग मी माझी कल्पना त्याला सांगितली तसा तो जाम घाबरला. नाहीच म्हणत होता. पण शेवटी मी त्याला पटवले की यात त्याला काहीच धोका नाही. सगळे काम मीच करणार आहे. त्याने फक्त भंगाराचे पोते गुहागरला न्यायचे आणि आजुबाजूला कुठेतरी टाकून द्यायचे. कोणाला काही पत्ताच लागायचा नाही. शेवटी तो कबूल झाला. मी त्याला संध्याकाळी साडेतीन चार वाजता ये म्हणून सांगितले. मग मी घरी गेलो. ऐश्वर्याची धुसफुस चालूच होती. मी म्हणालो, “ऐश्वर्या तूम्हणतेस तर आपण जाऊ पिक्चरला चल लवकर जेवणं आटपू. थोडी झोप काढू आणि जाऊ. ती पण खूष झाली. जेवण करुन आम्ही थोडे लवंडलो. तिचा डोळा लागताच मी उशी घेतली. तिच्या तोंडावर घट्ट दाबून धरली! तिची झोप उडाली! ती जोरजोराने हातपाय झाडून उशी दूर करण्याचा प्रयत्न करु लागली पण माझ्या अंगात राक्षस शिरला होता! त्या धडपडीत कॉटच्या लोखंडी बारवर तिचा हात आपटला आणि २,४ बांगड्या फुटल्या! काही क्षणातच ती गार झाली! नवीन फ्रीजचे मोठे प्लास्टिकचे कव्हर पडले होते. मी तिचे पाय दुमडून एक चादरीत तिला गुंडाळले. मोठ्या प्लॅस्टिकच्या कव्हरमध्ये ती बॉडी महत्प्रयासाने घातली आणि सदाची वाट पहात बसलो.
सदा चार वाजता आला. येताना दोन मोठी गोणती घेऊन आला. ते प्लॅटिकचे गाठोडे आम्ही गोणत्यात घातले. वरुन दुसरे गोणते घालून दोरीने गाठोडे बांधले. दोघांनी ते गाठोडे बाहेर काढले. सदा एक हातगाडी घेऊन आला होता. तिच्यावर ते चढवले आणि तो एस.टी.स्टँडवर निघून गेला. वर्ल्ड कप मॅचमुळे आजूबाजूला कोणी चिटपाखरुही नव्हते आणि असले तरी आमच्या कोकणातली माणसं अशी गाठोडी घेऊन नेहमीच गावाकडे जात असतात. त्यामुळे कुणाला काही आश्चर्य वाटण्याचा संभव नव्हता. पुढे ठरल्याप्रमाणे सदा ते गाठोडे एस.टी च्या टपावर टाकून गुहागरला पोचला आणि ठरल्याप्रमाणे त्याची विल्हेवाट लावली. तसा त्याचा मला फोनही आला. मग मी सहजच चौकशी करतो असे दाखवून रोज विचारायला यायचो. माझ्या प्लॅनप्रमाणे सगळे चालू होतं. पवार साहेबही ही केस बंद करण्याचा विचार करत आहेत असे मला समजलं होतं. पण आपण आलात आणि आपल्याला चार बांगड्यांचे तुकडे सापडले तेव्हा मी जरा हादरलो. परंतु गुन्हा इथे ठाण्यात आणि बॉडी तिकडे गुहागरात त्यामुळे मी निश्चित होतो. पण आपण कसा तपास लावलात हे मला समजत नाही. बांगडीचे तुकडे कॉटवर आणि खाली पडले होते. पण मी ते सगळे गोळा करुन फेकून दिले होते. पण फरशीच्या फटीत काही तुकडे असतील हे माझ्या लक्षात आले नाही. तरीही ते सापडले म्हणून माझा गुन्हा सिध्द होईल असे मला वाटत नाही. असो, रागाच्या भरात मी फार मोठा अपराध केला आहे. मिळेल ती शिक्षा भोगायची माझी तयारी आहे.’
“दिनकर त्या चार बांगडीच्या तुकड्यांच्या सुतावरुनच मी तुला ऐश्वर्याच्या भेटीसाठी स्वर्गात पाठवणार आहे. अर्थात तुला स्वर्गात जागा मिळणार नाही उलट बांगडीच्या सुतावरुन तू नरकात मात्र नक्कीच जाणार!”
–विनायक अत्रे
Leave a Reply