भर समुद्रात ४३८ दिवस एकाकी राहून जिवंत परतलेला जोस अल्वारेंगा…
अत्यन्त प्रतिकूल अशा परिस्थितीत किंवा ज्या ठिकाणी सर्व उपाय खुंटलेले आहेत आता आपले अस्तित्व पुढे टिकवून ठेवणे, जगणे अशक्य आहे अशा प्रसंगांमधून जेव्हा माणसे जिवंत परत येतात आणि सामान्य जीवन जगतात तेव्हा आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. जर जगण्याची प्रबळ इच्छा असेल तर कोणत्याही आव्हानांचा सामना करत कठीण परिस्थितीतून सुखरूप बाहेर पडता येते. भर समुद्रात ४३८ दिवस एकाकी राहून जिवंत परतलेला जोस अल्वारेंगा…
जोस अल्वारेंगा या मच्छीमाराची कथा अशीच आहे.एका मेक्सिकन मच्छिमाराची बोट समुद्रामध्ये भरकटल्यानंतर त्याच्या जवळ खाण्यापिण्यासाठी होते फक्त कासव, समुद्रपक्षी, मासे, पावसाचे पाणी आणि स्वतःचे मूत्र!
जोस अल्वारेंगा हा अनुभवी मच्छिमार होता. त्याने आपल्या आयुष्याची कित्येक वर्षे समुद्रामध्ये मासेमारी करण्यात घालविली होती. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी तो कॉर्डोबा नावाच्या एका नवशिक्या सहकाऱ्यासोबत बोट घेऊन प्रशांत महासागरामध्ये मासे पकडण्यासाठी निघाला. ह्या दोघांनी पुढच्या २-३ दिवसांसाठी लागणारी सामग्री बरोबर घेतली होती. मासेमारीला सुरुवात करून अवघे काही तासातच त्यांनी ५०० किलोहुन अधिक मासळी पकडली. दोघेही खूप खुश होते.
पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकणारा नव्हता. अचानक भयंकर वादळाला सुरुवात झाली. जोरजोरात पाऊस कोसळू लागला. त्यांनी लगबगीने किनारा गाठायचा प्रयत्न केला. पण वादळामध्ये रस्ताच सापडत नव्हता. जोरदार पावसामुळे किनारा दिसायचा बंद झाला आणि त्यांची बोट खोल समुद्रामध्ये भरकटत जाऊ लागली. हे वादळ पुढे ५ दिवस तसेच सुरु राहिले.
वादळामुळे बोटीला खूपच मार बसला. बोटीवरची सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद झाली, मोटर वाहून गेली. त्यांनी रेडिओवरून स्वतःच्या मालकाशी संपर्क करायचा प्रयत्न केला. पण त्यांचे अचूक स्थान निश्चित न करता आल्यामुळे आणि वादळ दीर्घकाळ टिकल्यामुळे बचाव पथक माघारी परतले. दोन्ही मच्छिमार समुद्रामध्ये बुडून मृत्यू पावले असतील असा समज करून त्यांनी शोधकार्य थांबविले.
बोटीवर असलेले खाद्य अवघ्या काहीच दिवसांत संपले. पावसाचे पाणी साठवून त्यांनी ते प्यायला सुरुवात केली. खूप दिवस पाऊस न पडल्यास त्यांना स्वतःचे मूत्र पिऊन किंवा माश्यांचे रक्त पिऊन दिवस ढकलावे लागायचे. ( समुद्राच्या पाण्याचा एक थेंब म्हणजे 0.001 ग्रॅम मीठ. आपले शरीर या सोडियमला सहन करण्याइतपत सक्षम नसते. मूत्रपिंडावर दबाव येऊन ते निकामी होण्याची शक्यता , मज्जासंस्थेचा नाश, अंतर्गत अवयवांना विषबाधा, निर्जलीकरण अशा अनेक शक्यता असतात त्यामुळे अत्यन्त संकटात सुद्धा हे पाणी माणूस पिऊ शकत नाही ) जोस अल्वारगेन्गा हा एक तरबेज मच्छिमार होता. मासे, कासव आणि समुद्रपक्षी ह्यांना तो अगदी शिताफीने पकडायचा.
तासामागून तास जाऊ लागले, दिवसामागून दिवस जाऊ लागले, महिन्यांमागून महिने सरू लागले पण त्याना किनारा काही सापडत नव्हता. कोणतीही बोट किंवा विमान पण दृष्टीपथात पडत नव्हते आणि जरी पडले तरी सगळी उपकरणे खराब झाल्यामुळे संपर्क करता येत नव्हता. एव्हाना दोघांनाही कळून चुकले होते कि आता परत घरी जाण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. या अथांग समुद्रामध्येच भरकटत असताना एखाद्या दिवशी मृत्यू कवटाळेल अशी अगतिक परिस्थिती निर्माण झालेली होती
जोस स्वतःला दिवसभर कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये गुंतवून ठेवायचा पण कॉर्डोबा मात्र निराशेच्या गर्तेत लोटला जात होता. त्याचा परिणाम त्याच्या प्रकृतीवर होत होता. ४ महिने समुद्रामध्ये अडकून पडल्यामुळे आणि रोज रोज कच्चे अन्न खावे लागत असल्यामुळे तो वैतागला आणि त्याने खाणेपिणे सोडून दिले. काही दिवसांमध्ये त्याचा भुक आणि निर्जलीकरणामुळे मृत्यू झाला.
आपल्या सहकाऱ्याचा अशा प्रकारे झालेला मृत्यू बघून जोसला जबर मानसिक धक्का बसला. त्याने कॉर्डोबाचा मृतदेह ५-६ दिवस तसाच ठेवला. काय करावे त्याला सुचेना. त्याच्या मनात पण आता आत्महत्येचे विचार यायला लागले. पण त्याने मनाशी काही तरी दृढनिश्चय केला आणि सहकाऱ्याचा मृतदेह पाण्यात फेकून दिला.
पुढे अजून ७ – ८ महिने तो समुद्रामध्ये असाच भरकटत होता. तब्बल ४३८ दिवसानंतर त्याला पहिल्यांदा आशेचे किरण दिसू लागले. समोरच मार्शल बेटाचा किनारा दिसत होता. लगबगीने तो किनाऱ्यावर पोचला आणि तेथील एका झोपडीचे दार ठोठावले. झोपडीतील माणसांना सुरुवातीला तो जे सांगत होता त्यावर विश्वास बसेना. पण नंतर त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्याला घरी सुखरूप पाठविण्याची
व्यवस्था केली.मेक्सिकोच्या ज्या गावातून त्याने प्रवास सुरू केला होता तेथून तो चक्क 9650 किलोमीटर दूर अंतरावर येऊन पोचला होता.
अश्या प्रकारे प्रतिकूल परिस्थितीमध्ये, नैसर्गिक आव्हानांचा सामना करत जोस अल्वारगेन्गाने भरकटलेल्या अवस्थेत समुद्रामध्ये सर्वांत जास्त काळ जिवंत राहण्याचा विक्रम केला आणि जर जगण्याची प्रबळ इच्छा असेल तर कोणत्याही आव्हानांचा सामना करत कठीण परिस्थितीतून सुखरूप बाहेर पडता येते हे पण सिद्ध केले.
आपण आपल्या कम्फर्ट झोन मध्ये मश्गुल असल्याने जीवन मरणाचा संघर्ष आपल्यासाठी फक्त कथा कविता आणि मनोरंजनाचा विषय किंवा फारतर चित्रपटाचा विषय असू शकतो. त्यामुळे साधे-साधे अडचणीचे प्रसंगसुद्धा आपण अत्यन्त आक्रस्ताळेपणाने किंवा चीडचीड करत हाताळतो. सहज आणि संघर्षरहित जीवनाची इतकी सवय आपण स्वतःला लावून घेतली आहे की घरात भाजीपाला नसेल , किराण्यातला एखादी वस्तू सम्पली असेल तरी आपण कासावीस होतो. कोरोना सारख्या संकटाने घरात बंदिस्त झालेले अनेक आत्मे लहानसहान गोष्टींसाठी तळमळतांना पाहिलं की अशा गोष्टींची आठवण होते.
जर जोस अल्वरेंगा त्या बोट मध्ये 438 दिवस जिवंत राहू शकतो, तर हे लॉकडाऊन दिवसांवर गेलंय. आपल्याकडे अन्न पाण्याचा स्त्रोत पण आहे. मग घरात बसून जगायला काय हरकत आहे.
असो…!! हसत जगा, मजेत जगा, आणि घरात रहा..
— संतोष द पाटील
Leave a Reply