१९९४ सालातील गोष्ट आहे. ‘ऑल दि बेस्ट’ या नाटकाचे प्रयोग सर्वत्र हाऊसफुल्ल होत होते. मला मोहन कुलकर्णीने बालगंधर्वला जाऊन त्यातील कलाकारांचे फोटो काढून डिझाईन करायला सांगितले. मी प्रयोग सुरू होण्यापूर्वीच कलाकारांना भेटून त्या चौघांचेही स्टेजवर फोटो काढले. त्यावेळी माझी पहिल्यांदा ‘भरत भेट’ झाली. भरत जाधव, अंकुश चौधरी, संजय नार्वेकर आणि संपदा जोगळेकर अशा चौघांचेही फोटो काढून पेपरसाठी डिझाईन्स केली. पुढे या नाटकाचे विक्रमी संख्येने प्रयोग झाले. निर्मात्याने पुणे व मुंबईसाठी कलाकारांचा, स्वतंत्र संच ठेवला होता. या नाटकाने ‘भरत जाधव’ला नाव, कीर्ती व ऐश्र्वर्य मिळवून दिले.
महेश टिळेकरने ‘अबोली’ नावाची एक टेलिफिल्म केली होती. त्यामध्ये निळू फुले, संपदा जोगळेकर, भरत जाधव व इतर कलाकार होते. तिचं स्थिरचित्रण करण्यासाठी अशाच थंडीच्या दिवसात मी सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या एका खेडेगावातील लोकेशनवर गेलो होतो. शुटींग सकाळी आठला सुरु झालं होतं.. मला जायला थोडा उशीर झाला.. तोपर्यंत भरत जाधवचा सीन शूट झालेला होता.. साधा झब्बा व धोतर नेसलेल्या अभिनेत्याची व माझी, ती दुसरी ‘भरत-भेट’ होती..
१२ डिसेंबर १९७३ रोजी जन्म झालेल्या या ‘भरतपर्वा’ची कारकिर्द १९८५ पासून सुरु झाली, ती आजपर्यंत… त्याने ८५ चित्रपट, ८ दूरचित्रवाणी मालिका व ८,५०० हून अधिक विविध नाटकांचे प्रयोग केले आहेत..
भरतच्या ‘सही रे सही’ने इतिहास रचलेला आहे. एकाच वेळी चार भूमिका सादर करुन वर्षभरात ५६५ प्रयोग करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये या नाटकाची नोंद झालेली आहे!! मराठी चित्रपट कलाकारांमध्ये स्वतःची ‘व्हॅनिटी’ व्हॅन बाळगणारा हा पहिला कलाकार आहे..
त्याची सुरुवात झाली ती शाहीर साबळे यांच्या ‘लोकधारा’ मधून.. ऑल दि बेस्ट नंतर भरतने अनेक नाटकांमधून कामं केली. नंतर चित्रपट केले. खतरनाक, खबरदार, गलगले निघाले, गोंद्या मारतंय तंगडं, चालू नवरा भोळी बायको.. नंतरच्या आलेल्या ‘जत्रा’ मधील ‘कोंबडी’च्या गाण्याने भरत रसिकांच्या मनात पुरेपूर ‘भरला’!!
दरवर्षी त्याचे नवीन चित्रपट येतच राहिले.. २००७ च्या ‘बकुळा नामदेव घोटाळे’ मधील त्याची दात पुढे असलेल्या, स्त्रीलंपट सरपंचाची भूमिका ही केवळ अविस्मरणीय अशीच आहे..
२०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शिक्षणाच्या आयचा घो’ चित्रपटातील मुलाच्या ‘बापा’ची भूमिका लक्षणीय ठरली आहे.
‘वन रुम किचन’ चित्रपटातील चाळ संस्कृतीतून वन रुम किचनची स्वप्नं पहाणारा, त्याचा मध्यमवर्गीय नायक हृदयस्पर्शी आहे.
सुमारे वीस वर्षे अनेक चित्रपटांतून कामं केल्यानंतर, भरत पुन्हा रंगमंचाकडे वळला आहे.. आता पुन्हा ‘सही रे सही’ सुरु होईल.. मदन सुखात्मे, रंगा, गलगले आणि दामू या चार भूमिकेतील ‘भरत-भेट’ घेण्यासाठी रसिकांची प्रचंड गर्दी नक्कीच उसळेल…
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
१२-१२-२१.
Leave a Reply