भरत नाट्य मंदिर हे पुणे शहरातील एक प्रसिद्ध नाट्यगृह आहे. भरत नाट्यमंदिर हे पुण्यातील जुन्या नाट्यगृहांपैकी एक अतिशय नाट्यगृह आहे. पुणेकरांसाठी ही वास्तू म्हणजे त्यांचा अभिमान आहे.
इतिहास :
या वास्तूचे ५ संस्थापक होते, ज्यांची नावं
१) दादासाहेब फाटक
२) भाऊसाहेब दातार
३) दत्तात्रय काळे
४) अप्पा गोखले
५) दत्तोपंत परांंजपे
या सन्माननीय ५ व्यक्तिमत्वांनी १८९४ साली येथे ‘नाट्यसंशोधन मंदिर थिएटर कॉंप्लेक्सची’ स्थापना “स्टुडंंट सोशल क्लबने” केली होती. त्यावेळी हा चमू जिथे मोकळी जागा मिळेल तिथे नाट्यसादरीकरण करीत असे. पुढे बर्याच वर्षांनी म्हणजेच १९६९ मध्ये संस्थेने मोठ्या व्यावसायिक नाटकांच्या सादरीकरणासाठी नाट्यगृहाची पायाभरणी केली. १९७० साली बांधकाम पूर्ण झाल्यावर संस्थेने राज्यस्तरीय स्पर्धांमधून सहभाग नोंदवायला सुरुवात केली व नाट्यगृहात संगीत नाटकांचे प्रयोग करण्यास सुरुवात केली. त्यातील स्वयंवर , वैरीण झाली सखी, शाकुंतल, मानापमान, मृच्छकटिक, शारदा, कट्यार काळजात घुसली, सौभद्र अशी एकापेक्षा एक नावाजलेली संगीत नाटकांची निर्मीती करुन त्या नाटकांचे सादरीकरण केले.
पुढे नाट्यगृहात अनेक स्पर्धा घेण्यास प्रारंभ झाला. त्यातील पुरुषोत्तम करंडक एकांंकिका स्पर्धा, राज्यस्तरीय स्पर्धा, कामगार कल्याण स्पर्धा, फिरोदिया करंडक या स्पर्धा विशेष नावाजलेल्या स्पर्धा आहेत.
नाट्यगृहाची वास्तुकला अतिशय चोखंदळपणे केली गेलेली आहे. त्यामुळे बाल्कनीत बसलेल्या माणसाला तो रंगमंच्याच्या अगदी जवळ बसूनच नाटक पहातोय की काय असा त्याचा भ्रम होऊ शकतो. आतापर्यंत अनेक दिग्गजांनी संस्थेसाठी मोलाची कामगिरी पार पाडली आहे पण बालगंधर्व , छोटा गंधर्व, विष्णुदास भावे, केशवराव दाते, तात्यासाहेब खाडिलकर यांचं विशेष योगदान संस्थेला लाभलं व या दिग्गजांच्या रुपाने संस्थेला कलारुपी खजिनाच हाती लागला.
या नाट्यगृहाची आसन क्षमता ८५० आसनांची असून त्यातील ५२५ आसनं खाली व ३२५ बाल्कनीत अशी आहेत. मुख्य रंगमंचाची आकारमानता ३०’ * २४’ इतकी आहे. नाट्यगृहात ३ रंगभूषा कक्ष व १ अतिशय महत्वाच्या लोकांसाठी कक्ष उपलब्ध आहे.
ऑक्टोबर २०१८ ते सप्टेंबर २०१९ या कालवधीत संस्थेने १२५ वर्षपूर्ती सोहळा साजरा केला.
वास्तूत विशेष पहाण्यासारखे :
ही वास्तू म्हणजे कलाकारांच्या व अभ्यासवेड्या लोकांच्या दृष्टीने एक अनमोल गोष्टींचा खजिनाच आहे. संस्थेने अनेक जुन्या गोष्टी आपल्या संग्रही ठेवलेल्या असून त्यात अनेक चित्रांचा, जुन्या काळातील अभिनेते, अभिनेत्र्या, दिग्दर्शक, निर्माते यांंच्याबद्दल संक्षिप्त माहिती इत्यादी अनमोल ठेवींचा समवेश आहे. जुन्या काळात केल्या जाणार्या नाटकांची माहिती, विविध नाट्यसंस्था व त्यांच्या कार्याचा लेखाजोगा, त्यांची कामगिरी, जाहिराती, स्मृतीचिन्ह इत्यादींच्या संदर्भात माहितीसंग्रह आहे तर शेकडो नोट्स, कटिंग्स, चित्रं, पत्रव्यवहार, हस्तलिखित, नाटकांंच्या दुर्मीळ जुन्या जाहिराती या तर अक्षरश: मराठी रंगभूमीच्या इतिहासाची साक्ष देतात. १९३५ सालापर्यंत ४०० इंग्रजी व ३०० मराठी नाटकांच्या पुस्तकांची येथील असलेल्या वाचनालयात भर टाकण्यात आली. १९७० सालापर्यंत ती संख्या २००० पुस्तकांपर्यंत येऊन ठेपली. ही सगळी पुस्तकं थिएटरशी संबंधित आहेत. सध्या त्या संख्येने ६००० पर्यंत मजल मारली आहे.
पत्ता : १३२४, लिमयेवाडी पथ, पेरुगेट, सदाशिव पेठ, पुणे – ४११०३०
संपर्क : ०२० २४४७१६१४
— आदित्य दि. संभूस (कलाकार, दिग्दर्शक, लेखक)
खूप सुंदर पद्धतीने माहिती दिलेली आहे ? अभिमान आहे मला मी पुण्याचा असलेला
khup chhan mahiti