राजकारण आणि साहित्य ही खरंतर दोन विरुद्ध टोकं असं आपल्याला वाटतं. साहित्य संमेलनात राजकारण्यांचा वावर हा दरवर्षी चघळला जाणारा विषय. पण आचार्य अत्रे, ग दि माडगूळकर यासारख्या काही प्रतिथयश साहित्यिकांनी राजकारणातही त्यांची चमक दाखवली आणि यशवंतराव चव्हाणांसारख्या काही राजकारण्यांनी साहित्य क्षेत्रातही ! सावरकर तर दोन्ही क्षेत्रातले स्टार व्यक्तिमत्त्व.
साहित्याची विशेष जाण आणि साहित्यात यशस्वी वाटचाल करणारे काही पंतप्रधान आपल्याकडे होऊन गेले.
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी प्रामुख्याने आत्मचरित्र आणि इतिहास यावर लेखन केले.
पं. नेहरु ब्रिटिशांच्या तुरुंगात कारावास भोगत असताना त्यांनी कोठडीतून आपल्या कन्येला – इंदिराला – आपल्या भावना आणि विचार मोकळे करणारी विविध पत्रे लिहिली. तीच पुढे संग्रहित होऊन त्यांचे सुरेख पुस्तक तयार झाले.
पं. नेहरुंकडे अंगभूत लेखनकला होती. मात्र त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांसाठी अन्य लोकांचे साहाय्य नेहरूंना घ्यावे लागले. Glimpses of World History हा पं. नेहरूंचा इतिहास ग्रंथ जगभर चर्चिला गेला. त्यांच्याचबरोबर कारावासात शिक्षा भोगणाऱ्या अब्दुल कलाम आझाद यांची तो लिहिण्याकरता बहुमोल मदत झाली. आझाद यांना इतिहासाचे सखोल ज्ञान होते. त्यांनी पं. नेहरूंना वेळोवेळी मूल्यवान ऐतिहासिक घटनांचे संदर्भ पुरवले.
पं. नेहरुंशी तुलना करता लाल बहादूर शास्त्री आणि मोरारजी देसाई हे वृत्तीने थोडे कोरडे पंतप्रधान. त्यातल्या मोरारजींचा लौकिक रसहीन माणूस म्हणून होता. तरीही त्यांनी तीन खंडात आपले आत्मचरित्र लिहिले.
पी. व्ही नरसिंहराव हे बुद्धिवंत. त्यांनी अंधश्रद्धांवर वेळोवेळी प्रहार केले. The Insider हे त्यांचे आत्मचरित्र बरेच गाजले. बाबरी मशिद प्रकरणावर त्यांनी “Ayodha – 6 December 1992” हे पुस्तक लिहिले. त्यांनी तेलगूमध्येही बरेच लेखन केले.
अटलबिहारी वाजपेयी प्रतिभावान नेते तर होतेच पण उत्तम वक्तेही होते. त्यांच्या अंगी असलेल्या प्रतिभेला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली. त्यांनी केलेली भाषणेही काव्यात्मक असायची. मेरी इक्यावन कविताऍं, क्या खोया, क्या पाया यासारखे काव्यसंग्रह, मेरी संसदीय यात्रा, गठबंधन की राजनीति ही पुस्तके गाजली.
इंद्रकुमार गुजराल यांची गणना राजकारणातील एक सुसंस्कृत व्यक्ती म्हणून केली जाते. कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे ही सुसंस्कृतता त्यांना चिकटून आली असावी. परंतु त्यांचे आत्मचरित्र हे विशेष चमकदार ठरले नाही.
इंदिरा आणि राजीव गांधी ही दोघेही अनुक्रमे ऑक्सफर्ड आणि केंब्रिजचे विद्यार्थी. तरीही ते पुस्तक वगैरे लिहिण्यासाठी लेखणी उचलण्याच्या भानगडीत पडले नाहीत. मात्र त्यांच्यावर बरीच पुस्तके लिहिली गेली.
मनमोहन सिंग यांच्याकडे अर्थ विषयाची डॉक्टरेट आहे. ते पुस्तकी विद्वान आहेत. मात्र स्वतंत्रपणे काही लिहिण्याचा त्यांना वकूब नाही. त्यांना काव्यात रस आहे. परंतु त्यांची आवड इक्बाल या उर्दू कवीपुरतीच मर्यादित आहे. त्यांचे सर्व लिखाण हे अकॅडेमिक (पुस्तकी) स्वरूपाचे आहे आणि तेही त्यांनी भारताचे अर्थमंत्री होण्यापूर्वी म्हणजे वीसेक वर्षापूर्वीचे आहे.
सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन पुस्तके लिहिली आहेत आणि एक अनुवादित केले आहे. त्यांचे पहिले पुस्तक ‘संघर्ष मा गुजरात’ (गुजरातचा लढा) फार कमी लोकांनी वाचले आहे. हे त्यांनी आणिबाणीच्या काळात म्हणजे, ते आपल्या वयाच्या विशीत असताना, लिहिले आहे. त्यांची बाकी तीनही पुस्तके ही तशी स्वारस्यपूर्ण आहेत. त्यापैकी एक म्हणजे ‘पत्ररूप श्री गुरुश्री’. माजी सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या पत्रांचा हा अनुवाद आहे.
दुसरे पुस्तक म्हणजे एक कवितासंग्रह आहे. संग्रहाचे नाव आहे ‘आँख आ धन्य छे!’
तिसरे पुस्तक पहिल्या दोन पुस्तकांपेक्षा उजवे आहे. ते चरित्रवजा आहे. स्वतः मोदींना राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील ज्या ज्या नेत्यांनी, त्यांच्या हाताखाली काम करीत असताना स्फूर्ती दिली, त्यांची रेखाटने या पुस्तकात आली आहेत.
हा होता आपल्या काही पंतप्रधानांचा साहित्यिक आढावा.
– निनाद अरविंद प्रधान
Leave a Reply