दिनांक ३ मार्च १९७७ रोजी भारतीय बुद्धिबळ ग्रॅंडमास्टर अभिजीत कुंटे यांचा जन्म झाला.
अभिजीत कुंटे हे ग्रँडमास्टर किताब मिळविणारे ते पहिले पुणेकर आणि दुसरे महाराष्ट्रीय व भारताचे ४ थे बुद्धिबळपटू होत. अभिजित यांची बहीण मृणालिनी कुंटे यादेखील प्रसिद्ध बुद्धिबळपटू आहेत. सुरुवातीला मृणालिनी यांचा सराव होण्यासाठीच त्यांच्या आई-वडिलांनी अभिजितला बुद्धिबळ खेळण्याची सवय लावली. पुण्याच्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या अभिजित कुंटे यांनी लौकिक शिक्षणातही ’मॅनेजमेंट सायन्स’ या अभ्यासक्रमात विशेष श्रेणीसह पदव्युत्तर पदवी मिळवलेली आहे. वयाच्या ११ व्या वर्षापासून अभिजित यांनी बुद्धिबळाच्या पटावर राष्ट्रीय स्तरावर यश मिळवण्यास सुरुवात केली. पुण्यातील ’फडके मार्गदर्शन केंद्रात’ अभिजित यांनी बुद्धिबळाचे धडे घेतले. अभिजित यांची कारकीर्द घडण्यामध्ये त्यांची आई-वडील-बहीण यांच्यासह मोहन फडके व इंटरनॅशनल मास्टर अरुण वैद्य यांचा मोठा वाटा आहे. कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात अत्याधुनिक साधने (संगणक, लॅपटॉप, इंटरनेट… इ.) नसतानाही कुंटे यांनी यश मिळवले हे विशेष. पुस्तकातील सैद्धांतिक माहितीवरून पुस्तकी चाली खेळण्यपेक्षा, अनियमित चाली रचणे, नैसर्गिक खेळाला महत्त्व देऊन उत्स्फूर्त खेळावर भर देणे या पद्धतीने बुद्धिबळ खेळण्यावर कुंटे अधिक भर देतात. बारा वर्षांखालील गटाचे एक राष्ट्रीय विजेतेपद, चौदा वर्षांखालील गटाचे राष्ट्रीय विजेतेपद दोन वेळा,सोळा वर्षांखालील गटाचे एक राष्ट्रीय विजेतेपद -अशी अनेक विजेतीपदे १९८८ ते १९९३ या काळात अभिजित यांनी मिळवली. त्याचबरोबर वीस वर्षांखालील गटाचे राष्ट्रीय विजेतेपद सलग तीन वेळा (१९९५ ते १९९७) मिळवण्याचा राष्ट्रीय विक्रम त्यांच्या नावावर आहे. राष्ट्रीय ’अ’ बुद्धिबळ या सर्वोच्च स्पर्धेचे विजेतेपदही कुंटे यांनी आत्तापर्यंत दोन वेळा (१९९७ व २०००) मिळवले आहे. त्यांनी ’इंटरनॅशनल मास्टर’ हा किताब १९९७ मध्येच मिळवला होता. आशियाई कुमार बुद्धिबळ स्पर्धेत (१९९७) सुवर्णपदक, कॉमनवेल्थ बुद्धिबळ स्पर्धेत २००० मध्ये रौप्य व २००३ मध्ये कास्य पदक; ब्रिटिश बुद्धिबळ स्पर्धेत सर्वोच्च स्थान (२००३) कॅनडातील आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये २ वेळा प्रथम क्रमांक, कालिकत येथील ग्रॅडमास्टर स्पर्धेतील विजेतेपद (१९९८) असे आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशही अभिजित कुंटे यांनी आत्तापर्यंत प्राप्त केले आहे. गेली अनेक वर्षे कुंटे यांचे एलो रेटिंग (आंतरराष्ट्रीय मानांकन गुण) सातत्याने २५५० च्या आसपास राहिले आहे. अभिजित कुंटे यांनी वयाच्या २३ व्या वर्षी, २००० साली ’ग्रॅडमास्टर’ हा किताब प्राप्त केला. (ग्रॅडमास्टर – हा किताब आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संस्थेच्या (फिडे) वतीने दिला जातो. हा किताब मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्य राखून, विशिष्ट मानंकन गुण मिळावावे लागतात.) महाराष्ट्रात बुद्धिबळाबाबत प्रेरणा, औत्सुक्य व पार्श्र्वभूमी निर्माण करणार्या) अभिजित कुंटे यांना राज्य शासनाने ’श्री शिवछत्रपती पुरस्कार’ (१९९८-९९) देऊन गौरवले आहे.
बुद्धिबळ खेळाचा विचार करता अभिजित यांनी गेली अनेक वर्षे महाराष्ट्राचा झेंडा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर सतत उच्चस्थानावर फडकवत ठेवला आहे. गेली अनेक वर्षे अभिजित जागतिक स्तरावर पहिल्या १५० बुद्धिबळपटूंत स्थान टिकवून आहेत. २६०० फिडे मानंकन गुण मिळवून ’सुपर ग्रॅडमास्टर’ हा किताब प्राप्त करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा आहे, व त्या दृष्टीने ते वाटचाल करत आहेत. हे यश प्राप्त केल्यानंतर समाजकारणात व राजकारणात सहभागी होऊन सामन्य माणसासाठी विधायक कार्य करण्याचेही त्यांनी मनापासून ठरवले आहे. फक्त खेळाडू म्हणून न चमकता, या खेळाचा प्रसार करण्यात कुंटे यांचे मोलाचे योगदान आहे. प्रशिक्षक म्हणून अनेक खेळाडू घडवितानाच बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन-संघटन, अनेक खेळाडूंशी एकाच वेळी बुद्धिबळ खेळण्याचे उपक्रम, अशा मार्गानी अनेक विद्यार्थाना या खेळाची गोडी लावण्यासाठी ते प्रयत्नशील राहिले आहेत. अभिजीत कुंटे यांची पुण्यात अँकाडमी असून पुण्यासारख्या शहरात गेल्या काही वर्षात बुद्धिबळ संस्कृती निर्माण करण्यात कुंटे यांचा महत्त्वाचा वाटा असून, त्यांच्या यशातून अनेक युवा बुद्धिवळपटूंनी प्रेरणा घेतली आहे. सध्या ते इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. नुकतीच अभिजित कुंटे यांची अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी आणि मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. अभिजीत कुंटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
संकलन. संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.
अभिजीत कुंटे यांच्या अँकाडमीची वेबसाईट. https://www.kuntechessacademy.com/
Leave a Reply