नवीन लेखन...

भारतीय विज्ञान तंत्रज्ञान-गरुड भरारी

व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेला सोनालिका यांचा लेख


स्वदेशी म्हणजे जे काही आहे ते सारे माझ्या देशाचे. मग ते आचार असोत, विचार असोत, संस्कार असोत, संस्कृती असो. असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे आपल्या देशाने आपली नाममुद्रा उमटवलेली नाही. आपण केलेल्या प्रत्येक संशोधनात भारतीयत्वाची झलक दिसते. कारण तो आपला तसा संस्कार असतो, तो आपला भारतीय बाणा असतो.

जेव्हा आपण स्वदेशी विचार याचा विचार करतो, तेव्हा विज्ञान तंत्रज्ञान आणि तेही देशी विज्ञान तंत्रज्ञान याचा अभ्यासपूर्ण आलेख पाहिला तर ऊर अभिमानाने भरून येतो. कारण हे ज्ञान आजचे नाही त्यालाही मोठी परंपरा लाभली आहे.

 

प्राचीन भारतीय विज्ञान

विज्ञान-तंत्रज्ञानाची माहिती संपूर्ण जगाला पाश्चिमात्य देशांकडून समजली हे म्हणणे अत्यंत चुकीचे आहे. कारण जवळपास पाच हजार वर्षांची परंपरा असलेल्या आपल्या देशाने हे ज्ञान केव्हाच अवगत केले होते. अगदी साधे उदाहरण द्यायचे तर विमानाचा शोध युरोपने लावला म्हणतात पण मुंबईत १८९५ मध्ये शिवकर बापूजी तळपदे यांनी विमानाचे उड्डाण केले होते. ते विमान १५०० फूट उंचीपर्यंत गेले. त्या विमानाचे नाव ‘मरुत्सखा’ असे होते. न्या. महादेव गोविंद रानडे, बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड तिसरे हे या उड्डाणावेळी उपस्थित होते. तळपदेंनी मृत्यूपर्यंत हे विमान स्वतःच्या घरी जपून ठेवले होते. असे असतानाही विमानाचे तंत्रज्ञान काय ते केवळ युरोपियनांनाच ठाऊक होते, असे कसे म्हणता येईल? इसवी सन पूर्व सहाव्या शतकात सुश्रुताला प्लास्टिक सर्जरीचे तंत्र ठाऊक होते. मूलभूत विज्ञानातही भारतीयांनी मोठे योगदान दिले होते. अणूची संकल्पना महर्षी कणाद यांनी इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात मांडली. ग्रीक तत्त्ववेत्ते ल्युसिपस आणि डेमोक्रायटिस यांनीही या संकल्पना मांडल्या. मात्र, त्या कणादांनंतर आणि कणादांनी मांडलेली संकल्पना या दोघांपेक्षाही अधिक प्रगत होती, असे मानले जाते. ‘शून्य आणि अनंत या परस्परांच्या पूर्ण विरोधी संकल्पना आहेत’, याची माहिती युरोपियनांपूर्वी हजारो वर्षे आधी भारतीयांना होती.

गुरुत्वाकर्षाचा सिद्धांत ब्रह्मगुप्तानेच प्रथम मांडला. वस्तू जमिनीवर पडतात, कारण त्यांना आकर्षून घेणे हा पृथ्वीचा स्वभाव आहे, असे ब्रह्मगुप्त म्हणतो. उणे अंकांची संकल्पनाही त्यानेच गणितात आणली. आर्यभटानेही (पाचवे शतक) आपल्या कारकिर्दीत मौलिक संशोधन केले आहे. पृथ्वी गोल आहे आणि ती स्वतःच्या अक्षाभोवती फिरते हा सिद्धांत प्रथम त्याने मांडला. ग्रह चल असतात आणि तारे अचल असतात. ग्रह सूर्यप्रकाश परिवर्तित करतात, हेही त्याने सांगितले. पायथागोरसचा सिद्धांतही त्यांनी प्रथम मांडला. प्राचीन भारतीय वैज्ञानिक आणि त्यांचे शोध यांची यादी अशी भरपूर वाढवता येईल. या यादीचा उल्लेख करण्याचा हेतू वंश श्रेष्ठत्व किंवा इतिहासाचे गुणगान करणे हा नाही. तर, प्राचीन भारतात विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यकशास्त्र, भाषाशास्त्र अत्यंत प्रगत होते, याकडे लक्ष वेधण्याचा आहे.

स्वातंत्र्याच्या साठ वर्षांत भारताने विज्ञान-तंत्रज्ञान आणि अवकाश क्षेत्रात प्रगतीची मोठी झेप घेतली आहे. सॉफ्टवेअर क्षेत्रात तर भारताचा दबदबा आहे. शिवाय स्वतंत्र उपग्रह तयार करून ते सोडण्यापर्यंतचे तंत्रज्ञान देशाने विकसित केले आहे. या प्रगतीचा हा आढावा.

तंत्रज्ञानाच्या विश्वात भारताला पाचवा सर्वात शक्तिशाली देश म्हणून ओळखले जाते. अजूनही विकसित देशात आपली गणना केली जात असली तरी आण्विक शस्त्र संपन्न देशात आपले स्थान वरच्या क्रमांकावर आहे. १८ मे १९७४ रोजी पहिलं भूमिगत परीक्षण करून आण्विक शक्ती बनणारा देश म्हणून दर्जा भारताने मिळवला. पण तेव्हा हे स्पष्ट केले होते की, भारताचा आण्विक कार्यक्रम केवळ शांतिपूर्ण कार्यांसाठी असेल आणि हे परीक्षण हे केवळ भारताला ऊर्जेच्या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी करण्यात आले आहे. त्यानंतर ११ आणि १३ मे १९९८ साली भारताने पोखरणमध्ये पाच आण्विक परीक्षणे केली. ज्यामुळे आपला देश हा आण्विक शक्तिसंपन्न देशांच्या रांगेत येऊन बसला.

ह्या व्यतिरिक्तही आणखी अशा अनेक गोष्टी केल्या भारताने ज्यामुळे आज तो जगातील सर्वात शक्तिशाली देशांपैकी एक आहे.

Atomic Clock:

भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) ने एक Atomic Clock विकसित केले आहे. ज्याचा वापर नेविगेशन सॅटेलाईटमध्ये केला जातो. ज्यामुळे नेमका लोकेशन डेटा मिळतो. ह्याआधी इस्रोला नेविगेशन सॅटेलाईटसाठी युरोपियन एरोस्पेस मॅन्युफॅक्चरर एस्ट्रीयम कडून Atomic Clock विकत घ्यावे लागत होते. Atomic Clock च्या निर्मितीनंतर इस्रो जगातील त्या अंतराळ संस्थांमध्ये सामील झाला आहे ज्यांच्याजवळ ही टेक्निक आहे.

सरस्वती सुपर क्लस्टर:

भारतीय अंतराळ वैज्ञानिकांच्या एका समूहाने आकाशगंगेचा एक खूप मोठा समूह ज्याला सुपर क्लस्टर म्हणतात तो शोधून काढला होता. ज्याला ‘सरस्वती’ हे नाव देण्यात आले. ह्या सुपर क्लस्टरचा आकार हा अब्जावधी सूर्याएवढा आहे. इस्रोने एका रॉकेट मधून १०४ उपग्रह प्रक्षेपित करून एक विश्वविक्रम बनवला आहे. हे करणारा भारत जगातील एकमेव देश आहे . ध्रुवीय अंतराळ प्रक्षेपण यान पीएसएलव्ही- उ३७ ने सर्वात आधी कार्टोसॅट श्रेणीच्या उपग्रहांना कक्षेत प्रवेश करवला. ह्या नंतर उर्वरित १०३ नॅनो उपग्रहांना ३० मिनिटांच्या आत कक्षेत प्रवेश मिळवून दिला. ह्यात ९६ उपग्रह हे अमेरिकेचे होते. एका वेळी सर्वात जास्त उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विक्रम आतापर्यंत रशियाच्या अंतराळ एजन्सीकडे होता जो आज भारताच्या नावे आहे.

जीएसएलव्ही एमके-३:

भारतीय अवकाश संशोधन संस्थेतर्फे इंडियन सॅटेलाईट लाँच व्हेईकल (एसएलव्ही) प्रकल्प १९७० मध्ये सुरू करण्यात आला. त्यावेळी या प्रकल्पाचे प्रमुख होते डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम. या प्रकल्पांतर्गत पहिले एसएलव्ही श्रीहरिकोटा येथे दहा ऑगस्ट १९७९ मध्ये लाँच करण्यात आले. हे व्हेईकल लाँच झाल्यानंतर भारत अशी क्षमता असणाऱ्या मोजक्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसला. यानंतर प्रगत होत गेलेल्या तंत्रज्ञानानिशी यातही प्रगती होत गेली. एसएलव्हीनंतर आगमेंटेड सॅटेलाईट लाँच व्हेईकल (एएसएलव्ही) आले. त्यानंतर पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल (पीएसएलव्ही) आले आणि आता नुकतेच जीओसिंक्रोनाईज सॅटेलाईट लाँच व्हेईकल जीएसएलव्ही आले. अवकाश संशोधनात आणि तंत्रज्ञानात भारत आता आघाडीचा देश आहे. लाँच व्हेईकल टेक्नॉलॉजी, ते उपग्रहांची रचना, ते तयार करणे, त्यांचा वापर या सर्व क्षेत्रात भारताने प्रावीण्य मिळविले आहे. संपर्क, प्रसारण, हवामान, आपत्कालीन व्यवस्थापन, टेलिमेडिसीन या क्षेत्रात भारताने उपग्रहांचा नेमका वापर केला आहे.

जीएसएलव्ही एमके-३ च्या प्रक्षेपणाला स्पेस टेक्नोलॉजीमध्ये एक मोठा बदल घडवून आणणारे मिशन म्हणून बघितलं जात आहे. हे रॉकेट अंतराळात ४ टनपर्यंतच्या वजनाच्या सॅटेलाईट्सला घेऊन जाऊ शकते. तर पृथ्वीच्या कमी उंचीवरील कक्षेपर्यंत ८ टन वजन घेऊन जाण्याची क्षमता ठेवते.

आता भारताने या क्षेत्रात पुढचे पाऊल टाकताना चांद्रयान आणि मंगळयान २ चे यशस्वी उड्डाण करून आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवली आहे.

जगातील सर्वात लहान सॅटेलाईट:

तामिळनाडू येथील पल्लापत्ती येथे राहणारा १८ वर्षीय रिफत शाहरुखने जगातील सर्वात लहान सॅटेलाईट बनवला आहे. ६४ ग्रामच्या ह्या सॅटेलाईटला Kalamsat हे नाव देण्यात आले आहे. हा सॅटेलाईट बनविण्याकरिता २ वर्षांचा कालावधी लागला असून त्यासाठी १ लाख रुपयांचा खर्च आला. ह्या सॅटेलाईटचा उद्देश 3D प्रिंटर कार्बन फायबरच्या परफॉर्मेन्सना प्रदर्शित करणे आणि तापमान आणि रेडीएशनला रेकॉर्ड करणे असेल. ह्याचीही २४० मिनिटे अवधी असेल.

परम: भारताचा पहिला स्वदेशी सुपर कॉम्प्युटर:

संगणक क्षेत्रातही भारताने दबदबा निर्माण केला आहे. अमेरिकेने महासंगणक देण्याचे नाकारल्यानंतर भारतात सीडॅक या संस्थेतर्फे महासंगणकांची परम मालिका तयार करण्यात आली आणि अमेरिकेला भारताची बौद्धिक ताकद दाखवून दिली गेली. डॉ. विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली या संगणकाची निर्मिती करण्यात आली. त्यावेळी अशक्य वाटणारे हे काम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले. सध्या या मालिकेतील परम पद्म संगणक तयार करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त परम १०००० आणि परम ९००० हे महासंगणक आहेत.

परम १०००० हा हवामानाचा अंदाज, रिमोट सेन्सिंग, ड्रग डिझाईन आदी कामे करतो.

आर्यभट्ट

१९ एप्रिल १९७५ भारताचा पहिला उपग्रह ‘आर्यभट्ट’ जो सोव्हिएत संघाद्वारे प्रक्षेपित करण्यात आला होता. ह्याचे नाव गणितज्ञ आर्यभट्ट ह्यांच्या नावावर ठेवण्यात आले होते. पण ह्या उपग्रहाने पाचव्या दिवशी काम करणे बंद केले. तरीदेखील भारतासाठी ही खूप आनंदाची बाब होती, कारण हे भारतासाठी एक मोठं यश होतं. आर्यभट्ट भारतीय अंतराळ अनुसंधान संगठन ह्यांच्याद्वारे एक्स-रे खगोलशास्त्र, एरोनॉमिक्स आणि सौर भौतिकशास्त्रात प्रयोग करण्यासाठी बनविण्यात आला होता.

भारताच्या वैज्ञानिकांनी लावलेल्या या आणि अशा अनेक शोधांमुळे तंत्रज्ञान विकास आणि तंत्रज्ञान उपयोगितेच्या बाबतीत भारत अव्वल स्थानी आहे आणि अजूनही संशोधन सुरू आहे.

एक गोष्ट नक्की की, या साऱ्या संशोधनात आपल्या शास्त्रज्ञांनी आपले स्वदेशीपण कुठे हरवले नाही. त्याचा विसर पडू दिला नाही. मी केलं यापेक्षा माझ्या देशासाठी केलं ही त्यांची भावना होती. तो त्यांचा स्वदेशी बाणा होता. वीस-बावीस वर्षांपूर्वी भारताची दक्षिण ध्रुवावर अंटार्क्टिका खंडातील पहिली मोहीम गेली. तिथल्या एका भूप्रदेशाला मोहिमेतल्या शास्त्रज्ञांनी ‘दक्षिण गंगोत्री’ नाव देऊन टाकले.

हिमालयातल्या एका भागाचे ‘गंगोत्री’ नाव अंटार्क्टिकापर्यंत कसे गेले? ते शास्त्रज्ञांच्या मनात होते. शास्त्रज्ञांबरोबर गेले. नाव देताना त्यांना प्रथम तेच आठवले. एखादे भारतीय नाव मनात राहणे, नवीन गोष्टीसाठी ते वापरावेसे वाटणे यातून भारतीय बाणा व्यक्त होतो. भारतीयांनी महा-संगणक बनवला की तेव्हा त्यांना ‘परम’ हेच नाव सुचले. भारतीयांनी अत्याधुनिक क्षेपणास्त्रे बनवली. त्याला त्यांनी ‘पृथ्वी’, ‘नाग’, ‘त्रिशूल’, ‘पिनाक’ अशी नावे दिली; रशियन अवकाशयानातून अंतराळवीर राकेश शर्मा अंतरिक्षात गेला. तिथून पृथ्वीकडे पाहिल्यावर ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा’ ही ओळ त्याला आठवली. हा भारतीय बाणा.

भारतीयांनी बनवलेल्या रणगाड्याला ते ‘विजयंता’ म्हणतात. भारतीयांनी बनवलेल्या उपग्रहांना ते ‘भास्कर’, ‘आर्यभट्ट’ अशी नावे देतात. आपल्या कृतीला सर्व भारतीयांना आपली वाटतील अशी नावे सहज सुचतात; हा भारतीय बाणा आहे. आपल्या स्वबळावर, स्वकर्तृत्वावर आपण ही गरुड भरारी घेतली आहे, त्याचा सार्थ अभिमान आपण बाळगलाच पाहिजे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..