जगातील पहिल्या महिला सैन्यदलाच्या प्रमुख – कॅप्टन लक्ष्मी सहगल, आपल्या वयाच्या ९२ व्या वर्षी सुद्धा कार्यरत – डॉ लक्ष्मी सहगल, आजाद हिंद सरकारच्या पहिल्या महिला मंत्री – कॅप्टन लक्ष्मी सहगल
शिक्षणाने डॉक्टर तर मनाने कायम भारतीय ज्यांनी अविरत समाजसेवेचे व्रत घेतले आणि ते पाळले सुद्धा. चला तर मग भेटू या डॉ / कॅप्टन लक्ष्मी सहगल ह्यांना.
२४ ऑक्टोबर १९१४ साली एका तमिळ ब्राम्हण परिवारात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील व्यवसायाने वकील होते आणि मद्रास हायकोर्टात कार्यरत होते. त्यांची बहिणी म्हणजे मृणालिनी साराभाई. दोघी बहिणी काळाच्या पुढे विचार करणाऱ्या आणि अतिशय मोकळ्या वातावरणात मोठ्या झाल्या. १९३८ साली मद्रास मेडिकल कॉलेज मधून त्यांनी डॉ ही पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी स्त्रीरोग तज्ञ आणि प्रसूतीतज्ञ म्हणून पदव्या संपादन केल्या. पुढे काही वर्षे त्यांनी चेन्नईला सरकारी इस्पितळात डॉ म्हणून काम केले. त्यांचे लग्न वैमानिक श्री PKN Rao ह्यांच्याशी झाले, पण ते फार यशस्वी होऊ शकले नाही. त्यामुळेच त्यांनी भारता बाहेर जाण्याचा निर्णय घेतला, त्या सिंगापूर ला आल्या. त्याच्याहतून मोठे काम होणे होते, त्यामुळे असे घडले असावे.
सिंगापूर मध्ये अनेक भारतीय क्रांतिकारी कार्यरत होते. १९४२ साली ब्रिटिशांनी सिंगापूरवरचा आपला ताबा सोडला, जपान कडे सिंगापूर परत आले. त्यावेळी तिथल्या जखमी सैनिकांना वैद्यकीय उपचार करण्याचे काम डॉ लक्ष्मी ह्यांनी केले. सिंगापूर मधील सगळ्या भारतीय क्रांतीकारकांना भारताची सेना असावी ह्याची तीव्रतेने जाणीव होत होती. त्याचवेळी सुभाषचंद्र बोस सिंगापूरला पोचले. डॉ लक्ष्मी त्यांना भेटल्या आणि आझाद हिंद फौज मध्ये त्या सामील होऊ इच्छितात असे सांगितले. सुभाषचंद्र बोसांनी त्यांना महिला तुकडी तयार करायला सांगितले, त्याचे नाव ‘झाशीची राणी तुकडी’ असे ठेवण्यात आले, त्याच बरोबर डॉ लक्ष्मी आता कॅप्टन लक्ष्मी झाल्या. १९४४ साली जॅपनिझ सैन्याबरोबर आझद हिंद सेनेचे सैन्य सुद्धा बर्मा कडे निघाले. इंफाल ला पोचण्या अगोदरच कॅप्टन लक्ष्मी ह्यांना बर्मा मध्ये अटक झाली १९४६ पर्यत त्या तिथेच तुरुंगात होत्या. नंतर त्या भारतात आल्या.
१९४७ साली त्यांचा विवाह प्रेम कुमार सहगल ह्यांचायशी झाला, जे आझाद हिंद सेनेत मोठ्या हुद्द्यावर होते. कॅप्टन लक्ष्मी सहगल झाल्या. १९४७ च्या फाळणी मुळे परत आलेल्या नागरिकांना कॅप्टन लक्ष्मी सहगल ह्यांनी अविरत वैद्यकीय सेवा दिली. नंतरच्या काळात सुद्धा त्यांनी आपले वैद्यकीय सेवेचे व्रत अविरत सुरू ठेवले जसे की भोपाळ गॅस घटना,अनेक राजकीय / जातीय दंगे. १९९८ साली त्यांच्या सामाजिक कार्याची पोच पावती म्हणून त्यांना पद्म विभूषण ने सन्मानित करण्यात आले. तसेच २०१० साली कॅलिकट विद्यापीठातर्फे त्यांना मानद डॉक्टरेट ह्या पदवी ने सन्मानित करण्यात आले. २०१२ साली वयाच्या ९७ व्या वर्षी त्या करत असलेल्या सामाजिक कामांना पूर्णविराम लागला.
वयाकडे केवळ एक आकडा म्हणून बघू शकणाऱ्या, घेतलेला वसा समोर आलेल्या प्रत्येक परिस्थिती चालवणा ऱ्या ह्या भारतमातेच्या वीरांगनेला आमचे शतशः नमन.
|| वंदे मातरम् ||
— सोनाली तेलंग.
संदर्भ:
१. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्त्रिया : संपादक : नवाझ मोदी, अनुवाद : वासंती फडके
२. विकिपीडिया
३. inuth.com
खूप छान माहिती व लेखन