प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे स्वातंत्र्य सगळ्यात प्रिय असते. ब्रिटिशांच्या दुट्टपी धोरणामुळे भारतातील कानाकोपऱ्यातून असंतोष वाढत होता. मिदनापूर, बंगाल मधील एका छोट्याश्या गावात सुद्धा ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारला गेला, तो सुद्धा १७७१ ते १८०९ या कालखंडात. ह्या बंडाचे विशेष म्हणजे ह्याचे नेतृत्व एका स्त्री ने केले. राणी शिरोमणी.
इतिहासाच्या पानांनी आणि इतिहासकारांच्या मनानी ह्या राणीची फार दखल घेतली नाही, त्यामुळे त्यांच्या पूर्वाश्रमीच्या आयुष्याबद्दल माहिती मिळणे थोडे अवघड दिसतेय. पण त्यांचे एकूण कर्तृत्व त्यांच्या धाडसी वृत्तीचे, नेतृत्व गुणांचे आणि प्रजेसाठी झटणाऱ्या राजकर्तीचे दिसून येते. त्या निश्चितच एक धाडसी मुलगी, पतीच्या कार्याला पुढे नेणारी पत्नी आणि प्रखर राष्ट्रप्रेमी होत्या ह्यात शंकाच नाही.
कर्णगढ, तिथल्या स्थानिक लोकांच्या माहितीनुसार हे कर्णाने वसवलेले गाव. कर्णगढ चे शेवटचे राजा, राजा अजितसिंघ ह्यांच्या दोन पत्नी, राणी भाबानी आणि राणी शिरोमणी. राजा अजितसिंघ ह्यांच्या मृत्यू पश्चात राणी भाबानी आणि राणी शिरोमणी ह्यांच्या राज्य वाटले गेले कारण राजा निपुत्रिक होते. राणी भाबानी पश्चात राणी शिरोमणी ह्यांनी कर्णगढ चे नेतृत्व केले. मिदनापूर, बांकुरा, आणि मानभूम ह्या पश्चिम बंगाल मधील लहान मोठ्या गावांमधून इंग्रजी शासनाच्या शोषणकारी, भू-राजस्व नितींमुळे लोकांमध्ये मोठा असंतोष होता. शेतकऱ्यांना इंग्रजी राजवटीला दिला जाणारा ‘लगान’ आपल्या आजिविकेवर संकट वाटत होते. १७७१ ते १८०९ ह्या काळात, छोट्या छोट्या गावांमधून जसे की मिदनापूर, बांकुरा आणि मानभूम इंग्रजी राजवटी विरुद्ध लढा पुकारला गेला त्याला आज इतिहासात “चाऊर बंड” असे म्हंटले जाते. चाऊर म्हणजे बंगाली भाषेत असंस्कृत. मग अश्या असंस्कृत लोकांनी एकत्र येऊन पुकारलेले बंड. १६-१७ वर्षांचा हा संघर्ष, इंग्रजांना फार महागात पडला.
राणी शिरोमणी आपल्या भूमीच्या शेतकऱ्यांसाठी उभ्या राहिल्या आणि त्यांच्या सोबत लढल्या. म्हणूनच त्यांना मदिनापूरची “राणी लक्ष्मीबाई” असे म्हटले जाते. ह्या लढाईत बरेच इंग्रज सैनिक मारले गेले. आधीच्या छोट्या तुकडीपेक्षा इंग्रजांनी नंतर अधिक सैन्य पाठवले. राणीचे सैन्य अपुरे पडले. ही स्वाभिमानी स्त्री शेवटच्या घटकेपर्यंत लढत राहिली आणि नजर कैद झाली. असे म्हंटले जाते की राणीचा मृत्यू त्या नजरकैदेत असतांनाच झाला. हा मृत्यू नैसर्गिक नव्हता तर राणीला जीवे मारले गेले १८१२ साली. आपल्या प्रखर राष्ट्रप्रेमाची चुणूक त्यांनी त्यांच्या कामातून दाखवली त्यामुळेच इंग्रजांनी अश्याप्रकारे ‘पाठीवर वार’ करून राणीला जीवे मारले.
इतिहास आपल्या कामाची दखल घेईल किव्हा नाही ह्याची कधीच पर्वा न करता आपले राष्ट्रप्रेम, आपले राष्ट्राप्रती कर्तव्य, आपल्या कर्तृत्वातून दाखवून देणाऱ्या राणी शिरोमणी आम्हा भारतीयांना सदैव वंदनीय आहेत.
|| वंदे मातरम् ||
— सोनाली तेलंग.
संदर्भ: sahasa.in, कर्णगढ इतिहास, wikipedia. com
१३/०६/२०२.
Leave a Reply