वेष बदलून दारुगोळा एका ठिकाणून दुसरी कडे पोहोचवणे, निरोपाची देवाण-घेवाण करणे आणि हे सगळं करणे आपल्या जीवचा धोका पत्करून. अश्या अनेक रणरागिणी आपल्या मायभूमीच्या कन्या होऊन गेल्यात. त्यांच्या बलिदानाची सर कशालाच येणार नाही. आज भेटू या कल्पना दत्त जोशी.
त्यांचा जन्म २७ जुलै १९१३ साली श्रीपुर गावात (आत्ताचे बांग्लादेश) चिटगांग शहरात एका मध्यम वर्गीय परिवारात झाला. वडील सरकारी नौकरीत आणि आई घर सांभाळायची. आपलं शालेय शिक्षण पूर्ण करून त्या कलकत्त्याला महाविद्यालयीन शिक्षणासाठी आल्या आणि हे त्यांच्या जीवनातले मोठे वळण ठरले. इथे त्या अनेक क्रांतिकारकांच्या संपर्कात आल्या. कालांतराने महाविद्यालयात त्या ‘छात्री संघ’ जो महिला विद्यार्थिनींच्या संघ होता त्याचा भाग बनल्या. ही एक क्रांतिकारी संघटना होती ज्यात बिना दास, प्रितीलता वाद्देदार अश्या सगळ्या क्रांतिकारी त्यांच्या सखी, मार्गदर्शक बनल्या.
सूर्य सेन ब्रिटिश चिटगांग शास्त्रागार लूट जी १८ एप्रिल १९३० साली झाली त्याचे प्रमुख आणि महान क्रांतिकारी होते. कल्पना त्यांच्या संपर्कात आल्या. त्या Indian Republican Army च्या चिटगांग शाखेच्या सदस्या झाल्या. सूर्य सेन ह्यांनी १९३१ साली चिटगांग येथील युरोपियन क्लब वर हल्ला करण्यासाठी त्यांची नियुक्ती केली. हमल्याच्या ८ दिवस आधी ठिकाणची पाहणी करतांना त्यांना पोलिसांनी पकडले पण ह्यावेळी कुठलाही गुन्हा त्यांच्यावर दाखल होऊ शकला नाही, त्या जामिनावर लगेचच सुटल्या आणि ताबडतोब भूमिगत झाल्या. कारावास फार मोठा नव्हता, पण लढा अजूनही सुरूच होता. पुरुष वेष परिधान करून त्या घराच्या बाहेर पडल्या आणि आपल्या क्रांतिकारी दलाला जाऊन भेटू लागल्या. दारुगोळा पोहोचवणे, बॉम्ब तयार करणे, निरोप देणे अशी सगळी कामे करतांना त्या पुरुषवेशात वावरत. इंग्रजांना सुगावा लागलाच आणि १९३३ साली त्यांना आणि त्यांच्या क्रांतिकारी सहकाऱ्यांना अटक झाली.
क्रांतिकारी सूर्य सेन आणि त्यांचे साथी ह्यांना फासावर चढवले गेले तर कल्पना दत्त ह्यांना आजन्म कारावासाची शिक्षा झाल. त्यावेळी त्या फक्त २१ वर्षाच्या होत्या.
१९३९ साली गांधीजी आणि रवींद्रनाथ टागोर ह्यांच्या विशेष प्रयत्नांनी त्यांना मुक्त करण्यात आले. त्यानंतर त्यांनी आपला अभ्यास पूर्ण केला. १९४३ साली त्यांचा विवाह कम्युनिस्ट नेता पूरनचंद जोशी ह्यांच्याशी झाला. संसाराची जवाबदारी स्वीकारल्यावरही त्यांच्यातली कार्यकर्ती सदैव जागृत होती. बंगालमध्ये पडलेला दुष्काळ, बंगालची फाळणी अश्या सगळ्या कामात त्यांचा सक्रिय सहभाग होता.
वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांना देवाज्ञा झाली. हाडाची कार्यकर्ती कधीही परिस्थितीला घाबरून मागे हटत नाही तर सदैव कार्यतत्परच राहते, परिस्थितीशी दोन हात करायला, ध्येयप्राप्ती हाच त्यांचा अंतिम उद्देश असतो, ह्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे वीर क्रांतिकारी कल्पना दत्त जोशी ह्या आहेत. अशा रणरागिणीला माझा नमस्कार.
— सोनाली तेलंग.
१५/०६/२०२२
संदर्भ :
१. Wikipedia.com
2. Bharatdiscovery.org
3. Amritmahotsav.nic.in
Leave a Reply