लक्ष्मीरहल्या चन्नम्मा रुद्रमाम्बा सुविक्रमा
निवेदिता सारदा च प्रणम्या मातृदेवताः ||
मातृ देवता म्हणून प्रातःस्मरणीय राणी चेन्नमा. कर्नाटकातल्या कित्तुर राज्याच्या राणी चेन्नमा. इंग्रजांविरुद्ध १८२४ साली सशस्त्र लढा देणाऱ्या राणी चेन्नमा.
कर्नाटकची ‘लोकनायिका’ राणी चेन्नमा.
१४ नव्हेंबर १७७८ साली एका लिंगायत कुटुंबात राणी चेन्नमा ह्यांचा जन्म झाला. कर्नाटक राज्यातील बेळगाव मधील अगदी छोट्याश्या काकाटी गावात. लहानपणापासूनच त्यांना, घोडेस्वारी, तलवार चालविणे, नेमबाजी ह्या सगळ्यांचे शिक्षण देण्यात आले आणि वयाच्या १५ व्या वर्षी त्यांचा विवाह मल्लसर्जा ह्यांच्याशी झाला. त्या कित्तूर ला आल्या कित्तूर च्या राणी म्हणून.
विधात्याने आयुष्य अगदी सरळ साधं आखून दिलेलेच नाही ह्या सगळ्या वीरांगनांचे, १८१६ साली महाराजा आणि १८२४ साली त्यांच्या एकुलत्या एक मुलाचे निधन झाले. कित्तूर च्या संपूर्ण राज्याची जवाबदारी राणींवर आली. त्या घाबरल्या मुळीच नाही, फक्त आयुष्याने कलाटणी घेतली. राज्यासाठी वारसदार म्हणून राणींनी शिवलिंगप्पा ह्यांना दत्तक घेतले. इंग्रजांचे लक्ष कित्तूर वर केंद्रित झाले.
इंग्रजी कायद्याप्रमाणे जे राजा निपुत्रिक जातात, त्यांच्या नंतर इंग्रज हुकूमत त्या राज्याचा कारभार बघणार. दत्तक मूल ते मनात नव्हते. कित्तूर आता इंग्रजांच्या राजवटी खाली जाऊ नये, म्हणून राणी चेन्नमा ह्यांनी वेळेतच तेव्हाचे लेट्युनंट गव्हर्नर एल्फिस्टन ह्यांना पत्र लिहून आपला मुद्दा मांडला, पण इंग्रजांचे लक्ष्य तर संपूर्ण भारत गिळंकृत करण्याकडे असतांना चालून आलेली सुवर्णसंधी कशी सोडणार? पत्राच्या उत्तरादाखल इंग्रजी सैन्याला पाचारण करण्यात आले. वीस हजारच्या वर सैन्य आणि दारुगोळा घेऊन इंग्रजी सैन्याने कित्तूरवर हल्ला केला. राणी चेन्नमा आणि त्यांच्या सैन्याने ह्या हल्ल्याचे जोरदार प्रतिउत्तर दिले. इंग्रजांना नुसतीच हार पत्करावी नाही लागली तर त्यांचे मोठे अधिकारी मारले गेले, त्याचबरोबर दोन इंग्रज अधिकाऱ्यांना युद्धबंदी बनवले गेले. इंग्रज अधिकारी कॅपलीन ह्यांच्याशी तहात हे बंदी सोडले गेले की युद्ध समाप्त होईल आणि कित्तूर स्वतंत्र राहील. पण आपला शब्द पाळतील ते इंग्रज कसले? त्यांनी फिरून वार केला. राणी चेन्नमांनी प्रयत्नांची शर्थ केली, तरीही त्या युद्ध बंदी झाल्या. त्यांना बेळहोगळ किल्ल्यात युद्धबंदी म्हणून ठेवले गेले. त्यांच्या पश्चात त्यांचे सेनापती संगोली रायन्ना ह्यांनी युद्ध चालू ठेवले पण तेही मारले गेले. कित्तूर पराभूत झाले. राणीचे दत्तक पुत्र शिवलिंगप्पा यांनाही वीरमरण आले. राणी युद्ध कैदेत असतांना २१ फेब्रुवारी १८२९ साली वीरगतीला प्राप्त झाल्या.
इंग्रजांविरुद्ध लढा किती काळापासून चालला होता, त्याचे उदाहरण म्हणजे कित्तूरचा लढा आणि राणी चेन्नमा आहे. चला आज परत एकदा ह्या मातृशक्तीला वंदन करू या.
|| वंदे मातरम् ||
— सोनाली तेलंग.
संदर्भ :
१. भारत एकात्मता स्तोत्र : डॉ हरिशचंद्र
२. en.wikipedia.com
Leave a Reply