कुठल्याही परिस्थितीवर मात करत जगणे, आपले ध्येय स्पष्ट ठेवणे, त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या मेहनतीला कायम तयार असणे आणि कधीही मागे वळून न बघणे हेच उत्तम गुण एखाद्या व्यक्तीला ‘मोठं’ बनवतात, हो ना? महात्मा गांधींचे एक सुंदर वचन वाचनात आले, Find Purpose. The means will follow. ह्या सगळ्यांना आपल्या आयुष्याचे ध्येय सापडले होते, ते जगले – वागलेही तसेच. आज भेटू या अवंतीकाबाई गोखलेंना.
१८८२ साली एका चित्पावन ब्राम्हण घरात ह्यांचा जन्म झाला. वयाच्या ९ व्या वर्षी व्यवसायाने इंजिनिअर असलेल्या बबनराव गोखलेंच्या पत्नी झाल्या. बबनराव पुढील शिक्षणासाठी इंग्लडला गेले, त्याआधीच त्यानी अवंतीकाबाईंच्या शिक्षणाचा श्रीगणेशा केला. इंग्लडहून त्यांनी ३०० पेक्षा जास्त विविध विषयांवरील पुस्तकं त्यांना पाठवली जेणेकरून त्यांचा दृष्टिकोन व्यापक होईल. अवंतीकाबाई लिहित्या-वाचत्या झाल्या. इंग्लड मध्ये स्त्रिया परिचारिकेचे शिक्षण घेऊन समाजसेवा करतात हे बबनरावांच्या लक्षात आले. त्यांनी अवंतीकाबाईंना तेच शिक्षण घ्यायला प्रेरित केले. १९०१ साली अवंतीकाबाईंनी परिचारिका प्रशिक्षण पूर्ण केले तेही वर्गात प्रथम क्रमांकाने.
१९०२ साली भारतात देवी ची साथ आली. त्याबद्दल बऱ्याच अंधश्रद्धा होत्या की देवीच्या कोपामुळे ह्या रोगाची लागण होते. अवंतीकाबाई परिचरिकेच्या कार्याबरोबरच लोकांमध्ये असलेल्या अंधश्रद्धासुद्धा दूर करण्याचे काम करू लागल्या.
बबनराव गोखले अतिशय धाडसी वृत्तीचे होते, इंग्लडहून परतल्यावर त्यांनी बडोद्याजवळ काडेपेटीचा कारखाना घातला, दुर्दैवाने त्यात स्फोट झाला, बबनरावांच्या हाताला इजा झाली, अवंतीकाबाई त्यांची सुश्रुषा करायच्या आणि कारखान्याची जवाबदारी सुद्धा समर्थपणे सांभाळत होत्या. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड जेव्हा कारखान्याला भेट द्यायला गेले, त्यावेळी त्यांनी अवंतीकाबाईंना पाहून उदगार काढले, “जर भारतीय स्त्रिया आपल्या नवऱ्याच्या बरोबरीने अशी कामे करतील तर भारत स्वावलंबी तर होईलच या शिवाय परकीय गुलामगिरीतून सुद्धा लवकरच मुक्त होईल”.
१९१३ सालापर्यंत सामान्य आयुष्य जगणाऱ्या अवंतीकाबाईंना इचलकरंजी च्या राणी बरोबर इंग्लडला जाण्याची संधी मिळाली. त्या संधीच त्यांनी सोनं केलं. तिथली इस्पितळे, बालवाड्या, स्वयंसेवी संघटना इत्यादींना भेटी दिल्या, त्यांचे कामकाज कसे चालते हे पहिले, त्यावर आपली टिप्पण काढून ठेवली. केवळ शाब्दिक कार्यामुळे स्त्रियांच्या प्रगतीसाठी समाजाचा दृष्टिकोन बदलत नाही तर त्यासाठी प्रत्यक्ष काम गरजेचे आहे, हा त्यांचा ठाम विश्वास होता.
आयुष्याला कलाटणी मिळणं अजूनही बाकी होतं. १९१६ साली लखनऊ काँग्रेस अधिवेशनात त्यांची भेट गांधीजींशी झाली आणि त्यांच्या समाजकार्याला नवी दिशा मिळाली. ‘चंपारण्य’, बिहारमधील अतिमागसलेला भाग. तिथल्या ‘बेटिया राजाने’ इंग्रजांकडून कर्ज घेतले होते, त्याबदल्यात तिथला भूभाग इंग्रजांना हस्तांतरित करण्याचे कबूल केले. इंग्रजांनी तिथल्या शेतकऱ्यांना ‘निळी ची लागवड’ करण्याची सक्ती केली. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे अतिशय हानिकारक होते. गांधीजी ह्या साठीच चांपरण्यात पोचले, त्यांच्याबरोबर अवंतीकाबाई होत्या. निरक्षरता, अज्ञान आणि आरोग्याची हानी या विरुद्ध लढा पुकारला गेला. स्वच्छतेची प्रात्यक्षिके करून दाखविणे, स्त्री शिक्षणाचा प्रचार-प्रसार करणे, समाजप्रबोधन करणे अवंतीकाबाई करत होत्या, जे अतिशय अवघड काम होते.
त्यानंतर १९१८ साली त्यांनी ‘हिंद महिला समाजाची’ स्थापना केली. महिलांचे शिक्षण, त्यांचे आर्थिक स्वावलंबन, स्वच्छता इत्यादी सगळ्या गोष्टी हिंद महिला समाजच्या माध्यमातून त्यांनी यशस्वीपणे हाताळल्या. महिलांसाठी काम करण्याची त्यांची धडपड आणि वृत्ती यामुळे १९२४ साली त्या मुंबई महानगपालिकेतून निवडून आल्या, पहिल्या महिला सदस्य झाल्या.
गांधींनी १९३० साली सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली, मिठाचा सत्याग्रह केला, त्यावेळी अवंतीकाबाई, कमलादेवी चटोपाध्याय अश्या सगळ्या महिला कार्यकर्ता त्यांच्याबरोबर होत्या. आता स्वातंत्रता आंदोलन सर्वदूर पेट घेत होते. देशाच्या कानाकोपऱ्यातून विविध उपक्रम राबवले जात होते. पहिल्या गोलमेज परिषदेवर भारताने बहिष्कार टाकला आणि त्यानंतर २६ ऑक्टोबर रोजी आझाद मैदानावर ध्वजारोहण करण्याचे ठरले. अवंतीकाबाई १३ व्या तुकडीचे नेतृत्व करत होत्या. त्यांनी सकाळी ८.१५ ला ध्वजारोहण केले. दुसऱ्या दिवशी पालिकेच्या सभेला हजर असतांना त्यांना अटक झाली आणि ६ महिने कैद व ४०० रुपये दंड करण्यात आला.
कैदेतून मुक्त झाल्यावर सुद्धा खादीचा प्रसार, विदेशी सामानावर बहिष्कार, दारूबंदी, अवंतीकाबाईंची ही कामे सुरूच होती. १९३२ मध्ये इंग्रजांनी मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटी अवैध घोषित करून सगळ्या नेत्यांना अटक सुरू केली. अवंतीकाबाई परत एकदा गजाआड झाल्या.
१९३३ साली त्यांच्या यजमानांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी सक्रिय राजकारणाला राम राम ठोकला. हिंद महिला समाज त्यांच्या घरातच होते त्यामुळे त्याचे काम मात्र सुरूच ठेवले. त्यानंतर १९४७ साली त्यांना कॅन्सर आणि त्यांच्या यजमानांना अर्धअंगवायूचा झटका आला. अवंतीकाबाई स्वतः वैद्यकीय उपचारांनी बऱ्याच सावरल्या आणि आपल्या यजमानांनी सुश्रुषा करून त्यांचाही जीव वाचवला. स्त्री शिक्षण, महिला स्वावलंबन, अस्पृश्यता निवारण, स्वदेशी प्रचार, दारूबंदी, खादी प्रचार, हे त्यांचे समाजकार्य मात्र अहोरात्र सुरूच राहिले. २६ मार्च १९४९ साली त्यांचे देहावसान झाले.
१९१९ मध्ये अवंतीकाबाईंचे नाशिकला झालेले भाषण लोकमान्य टिळकांनी ऐकले, त्यावर ते म्हणाले ‘महाराष्ट्राची सरोजिनी आता तयार झाली आहे’. प्रखर देशभक्ती, रक्तात भिनलेले समाजकार्य, प्रचंड अभ्यासू वृत्ती, अनुशासनप्रिय व्यक्ती अश्या अवंतीकाबाईंना आमचे शत शत नमन.
— सोनाली तेलंग.
२०/०६/२०२२
संदर्भ :
१. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्त्रिया : संपादक – नवाझ मोदी, अनुवाद – वासंती फडके
२. गांधीजींच्या पट्टशिष्या : रोहिणी गवाणकर
Leave a Reply