साधारण ७००-८०० वर्षांपूर्वी पारशी समुदाय भारतात आला आणि मुळ भारतीय नसुनसुद्धा भारतीय बनून राहिला. भारतात सगळ्या पूजा पद्धतींना मोकळा श्वास घेता येतो, इथे फक्त एकच आचार पद्धती आहे, ती म्हणजे माणुसकी. आज आपल्या पिढीला पारशी समुदायाची नव्याने ओळख करून द्यायची गरज नाही. भीकाजी कामा किव्हा मॅडम कामा ह्या परशी समुदयातल्या स्वतंत्रता सेनानी, त्यांच्या कामाचा आवाका आपल्या परिघा बाहेरचा आहे. भारतीय स्वातंत्र्यासाठी देश-विदेशात त्याचे महत्व पटवून देऊन, भारताचा तिरंगा, देशाबाहेर त्याला त्याचा मान सन्मान मिळवून देणे ह्या साठी झटल्या. आज त्यांची गाथा.
मुंबईला एका समृद्ध पारशी परिवारात १८६१ साली २४ सप्टेंबर ला त्यांचा जन्म झाला. वडील सोराबाजी अभ्यासाने वकील तर व्यवसायाने व्यापारी होते. पारशी समाजात त्यांच्या परिवाराचा चांगला दबदबा होता. घरातले सगळे पुरोगामी विचारांचे, समाजात दबदबा, गाठीला पैसा…एक साधं, सोप्प, सरळ आणि हवं तसं आयुष्य नक्कीच जगता आलं असतं, पण तेच मुळात जगायचं नव्हतं.
१८८५ साली त्यांचं लग्न रुस्तम कामा ह्यांच्याशी झाले. लग्नगाठ तर बांधली गेली, पण मनं जुळली नाहीत, रुस्तम कामा हे ब्रिटिश धार्जिणी तर मॅडम कामा ह्यांना समाजसेवेत रस. फार सुखावह लग्न नव्हते ते.
१८८६ साली भारतात प्लेग ची साथ आली आणि भिकाजी कामांनी त्या रुग्णांच्या सेवेत स्वतःला झोकून दिले. त्यांनाही प्लेगची लागण झाली, पण उपचारांनी त्या बऱ्याच सावरल्या, पुढच्या उपचारासाठी त्यांना ब्रिटनला पाठविण्यात आले, इथे त्यांच्या आयुष्याला नवे वळण मिळाले.
भारताबाहेर त्यांची भेट श्यामजी वर्मा, दादाभाई नवरोजी ह्यांच्याशी झाली. त्यांनी भारताच्या स्वातंत्र संग्रामात उडी घेतली. भारताबाहेर राहून भारताच्या स्वातंत्र्यासाठी काम सुरू केले. लंडन मध्ये त्यांना सांगितले गेले की त्यांना भारतात एकाच अटीवर परत जाऊ देता येईल की त्यांनी कुठल्याही राष्ट्रवादी कार्यात सहभागी व्हायचे नाही, मॅडम कामांनी सरळ नकार दिला आणि त्या पॅरिस ला गेल्या. तिथून त्यांनी क्रांतिकारी पुस्तिका लिहायला सुरुवात केली, आणि ते साहित्य भारतात पाठवायची व्यवस्था पण केली. वंदे मातरम, तसेच मदन लाल धिंग्रा ह्याच्या हत्यावेर, असे अनेक साहित्य त्यांनी निर्माण केले.
२२ ऑगस्ट १९०७ साली जर्मनीत झालेल्या दुसऱ्या समाजवादी काँग्रेस अधिवेशनात कामा ह्यांनी भाग घेतला. मानवी हक्क, समानता आणि स्वातंत्र्य ह्या मुद्यावर उपस्थित लोकांना त्यांनी भारताकडे पाहायला प्रेरित केले. भारताचा स्वातंत्र्य हा हक्क आहे हे उपस्थितांना जाणवून दिले. ह्याच अधिवेशनात त्यांनी स्वतंत्र भारताचा तिरंगा फडकवला. आत्ताचा तिरंगा हा मॅडम कामा आणि इतर उपलब्ध डिझाईनचे तिरंग्याचे सुधारित रूप आहे.
मदनलाल धिंग्रानी कर्झन वाईल ह्यांची हत्या केली, त्यानंतर ब्रिटिश सरकार ने भारताबाहेरील भारतीय क्रांतिकाऱ्यांना पकडण्याची मोहीम सुरू केली. मॅडम कामा त्यावेळी फ्रांस मध्ये होत्या. ब्रिटन ने फ्रांस कडे कामांची मागणी केली, फ्रांस ने ती फेटाळली. पण पहिल्या महायुद्धात ब्रिटन आणि फ्रांस मित्र राष्ट्र झालेत आणि कामा ह्यांना योरोपमधील अनेक देशांमधून निर्वासित म्हणून हिंडावे लागले. शेवटी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना १९३५ साली त्यांना भारतात आपल्या घरी परतता आले, आणि नऊ महिन्यांनी १३ ऑगस्ट १९३६ साली त्यांचे देहावसान झाले.
कुठल्याही देशाचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि अबाधित ठेवण्यासाठी त्या देशाचे अंतर्गत धोरण तसेच इतर राष्ट्रांशी त्याचे संबंध अतिशय महत्वाचे असतात. भारताचा स्वातंत्र्य लढा जेवढा भारतात लढला गेला, तेवढाच तो भारताबाहेरील भारतीयांनी भारताबाहेर सुद्धा चालू ठेवला. प्रयत्न एकाचवेळी चहूबाजुनी झाले आणि आज आपण स्वतंत्र भारतात श्वास घेतो आहोत. ह्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी आपले सर्वस्व अर्पण केले त्या सगळ्यांचे आपण सगळेच सदैव ऋणी राहू. मॅडम कामा तुमच्या स्मरणात, सर्व भारतीयांकडून तुम्हाला कोटी कोटी नमन.
|| वंदे मातरम् ||
— सोनाली तेलंग.
२१/०६/२०२२
संदर्भ :
१. amrut mahotsav.com
२. wikipedia.com
एका घटनेने सगळा इतिहास कसा बदलला जातो त्याचे हे उदाहरण. सावरकरना बोटीने भारतात आणले जात होते. त्यावेळी मॅडम कामा फ्रांसमध्ये होत्या आणि त्यांची फ्रांसच्या राजकीय वर्तुळात ऊठबस होती व त्यांच्या शब्दाला मान होता.सावरकरना बोटीने भारतात घेऊन जात आहेत हे त्याना समजले होते. त्यामुळे त्या मारसेलीस बंदराकडे निघाल्या होत्या. मूळ योजना अशी होती की जर सावरकर फ्रांसच्या मारसेलीस बंदरात आले तर फ्रांस अधिकाऱ्याना सांगून सावरकरांना अटक करून घ्यायची कारण ती झाली असती तर त्यांना ब्रिटिश सरकारला सोपवता आले नसते. पण दुर्दैव आड आले. आणि कामांची गाडी बंदराआधीच बंद पडली आणि फ्रेंच पोलिसांनी सावरकरना ब्रिटिशांकडे सोपवले जर कामा वेळेत तिथे पोचल्या असत्या तर.