भारताला स्वातंत्र्य मिळाले ते काही मोजक्या स्वातंत्र्य सैनिकांच्या आहुतीने नाही तर त्यासाठीचा लढा हा विविध स्तरावर लढला गेला, देशात-परदेशात, प्रत्येक्ष मैदानावर तर कधी लिखाणातून, कधी समाज जागृतीसाठी विविध उपक्रमातून तर कधी तू लढ मी पाठीशी आहे असा आधारस्तंभ होऊन. सगळ्या स्तरावर लढाई लढली गेली. आज भेटू या बसंती देवी ह्यांना.
२३ मार्च १८८० साली ह्यांचा जन्म बद्रीनाथ हलदर (दिवाणजी – एका मोठ्या जमीनदार परिवाराचे) ह्यांचे घरी आसाम येथे. घरची सधन स्थिती, शिक्षणात अडथळा नाही, बसंती देवी अतिशय समृद्ध घरात लहानाच्या मोठ्या झाल्या. आपल्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्या कलकत्याला आल्या, आणि तिथे त्यांची भेट देशबंधु चित्तरंजन दास ह्यांच्याशी झाली. वयाच्या १७ व्या वर्षी त्या लग्न बंधनात अडकल्या. खऱ्या अर्थाने देशसेवेसाठी मुक्त झाल्या असं म्हंटल तर चूक ठरणार नाही.
देशसेवेचे व्रत घेतलेल्या बसंती देवी आणि चित्तरंजन दास ह्यांना तीन मुलं झाली, पण त्यांच्या कार्यात कुठेच अडथळा आला नाही. आपल्या पतीबरोबर त्यांनी ‘असहकार आंदोलन’, ‘भारत छोडो’ ‘खिलाफत चळवळ’ अश्या सगळ्या कामात सक्रिय सहभाग नोंदवला. पुढे येणाऱ्या काळात त्यांनी आपल्या नणंदा उर्मिला देवी आणि सुनीता देवी ह्याच्या बरोबर ‘नारी कर्म मंदिर’ ची स्थापना केली. हे एक प्रशिक्षण केंद्र होतं, नव्याने क्रांतीत उडी घेणाऱ्या महिलांसाठी. विविध क्रांतिकारी चळवळीसाठी लागणार पैसा मग त्यात सोन्याचे दागिने असो किव्हा पैसा असो, गोळा करणे ह्यात त्यांचा हातखंडा होता. असहकार चळवळ सगळीकडे पेट घेत होती, त्याचाच एक भाग म्हणजे स्वदेशी, खादी प्रचार आणि विदेशी वस्तूंची होळी. कलक्त्याच्या रस्त्यावर उतरून बसंती देवींनी खादी विकली आणि त्यासाठीच त्यांना तुरुंगवास झाला.
आता तर खऱ्या अर्थाने आयुष्याने नागमोडी वळण घेतले.१९२१ साली दास बाबूंना अटक झाली. बसंती देवी त्याने खचल्या नाहीत तर, त्यांनी दास ह्याचे ‘बंगाल कथा’ ह्या साप्ताहिक प्रकाशनाची सगळी जवाबदारी स्वतःवर घेतली. त्याचबरोबरीने बंगाल प्रदेश काँग्रेस चे काम सुद्धा अव्याहत पणे सुरू ठेवले. १९२५ साली दास बाबूंचा मृत्यू झाला. सुभाष चंद्र बोस जे दास बाबूंना आपले राजीकय विषयाचे गुरू मानत आता बसंती देवी ने स्वतःच्या कामातून हे स्थान कमावले. आता बोस बाबू बसंती देवींशी ह्या सगळ्या विषयावर चर्चा करत. सुभाष बाबू बसंती देवींना आपली ‘दत्तक आई’ म्हणायचे.
दास बाबूंच्या मृत्यू नंतरही त्यांचे देशसेवेचे, समाजसेवेचे व्रत अखंड चालत राहिले. लाला लजपतराय ह्यांच्यावर जेव्हा लाठीचार्ज झाला आणि त्यात त्यांना वीरमरण आले, तेव्हा बसंती देवी खवळून उठल्या. त्यांनी भारतातल्या तरुणांना आव्हान केले, देशसेवेसाठी, अश्या निस्पृह क्रांतिकारकांच्या बलिदान व्यर्थ जाऊ नये यासाठी.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावरही त्यांचे समाजकार्य तसेच सुरू राहिले. १९७३ साली त्यांना पद्म विभूषण ने सन्मानित करण्यात आले. स्त्री शिक्षण ह्यावर त्यांनी सगळ्यात जास्त काम केले. एक ध्येयाने प्रेरित ह्या पती-पत्नीच्या जोडीला आमचे सादर नमन.
|| वंदे मातरम् ||
— सोनाली तेलंग.
२३/०६/२०२२
संदर्भ :
१. विकिपीडिया
२. amrutmahotsav.com
Leave a Reply