भारतात पहिले रेडिओ स्टेशन १९२३ साली अस्तित्वात आले. ज्याला आपण आकाशवाणी नावाने ओळखतो ते अस्तित्वात आले २३ जुलै १९२७ ला मुंबई येथे तर २६ ऑगस्ट १९२७ साली कलकत्ता येथे सुरू करण्यात आले हे सर्वश्रुत आहे. इतिहासाची पानं चाळतांना असं वाचनात आलं की २७ ऑगस्ट १९४२ साली भारतात गुप्त रेडिओच्या माध्यमातून देशभरातल्या क्रांतीकारकांना पहिला संदेश प्रसारित केला गेला. हा रेडिओ कोणी सुरू केला, त्याच पुढे काय झालं, हे सांगायला येणार आहेत आपल्या पुढच्या वीरांगना डॉ उषा मेहता.
२५ मार्च १९२० साली सुरत, गुजराथ येथील छोट्याशा सरस गावात एका गुजराथी परिवारात उषा मेहता ह्यांचा जन्म झाला. ह्या तेजस्वी शलाका वयाच्या अवघ्या ५ व्या वर्षी गांधीजींना भेटल्या आणि त्यांना जगण्याचे उद्दिष्ट जणू गांधीजींनी त्या भेटीतच दिले.
वयाच्या ८ व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला,सायमन कमिशन विरुद्ध, उषाजींचे वडील जज्ज होते, त्यामुळे त्यांना उषाजींचा अश्या सगळ्या आंदोलनातून भाग घेणे पसंत नव्हते, पण हे फारच थोडे दिवस, १९३० साली ते निवृत्त झाले आणि उषाजींचा रस्ता मोकळा झाला. १९३२ साली त्या सगळ्या परिवारा बरोबर मुंबईला आल्या आणि त्यांच्या कार्याला अजूनच मोकळा मार्ग मिळाला. त्या आपल्या इतर सवंगड्यांसोबत कारागृहात असलेल्या क्रांतिकारकांना भेटायला जात, त्यांना गुप्त वार्तपत्र, इतर साहित्य पोहोचवत आणि त्यांचे निरोप बाहेरील व्यक्तींना देत. अगदी लहान वयातच त्यांनी गांधीजींचे अनुयायी होणे स्वीकारले त्याचबरोबर आजन्म ब्रम्हचारी राहण्याचे ठरविले, आपल्या कार्यासाठी. आपलं शिक्षण त्यांनी तत्वज्ञान हा विषय घेऊन पूर्ण केलं. पुढचे शिक्षण मात्र त्यांनी अर्ध्यातच सोडलं, कारण आता देश त्यांना बोलावत होता, ‘भारतछोडो आंदोलन’ सर्वदूर पेट घेत होतं.
९ ऑगस्ट १९४२ भारताच्या स्वातंत्रता आंदोलनातील महत्वाचा टप्पा. पूर्ण भारतभर विविध ठिकाणी तिरंगा फडकविण्याची मोहीम हातात घेतली गेली. प्रत्यक्ष ९ ऑगस्ट च्या आदल्या दिवशी मात्र सगळ्या प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली. तरीही क्रांतीकारकांच्या पुढच्या फळीने ही चळवळ उचलून धरली आणि पूर्ण केली.
१४ ऑगस्ट १९४२ साली उषाजी आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी काँग्रेस गुप्त रेडिओ स्टेशन सुरू केले. त्याची सुरवात उषाजींच्या आवाजाने झाली, ‘हा काँग्रेस रेडिओ आहे ४२.३४ मिटर्स भारतातून’. ह्या वरून गांधीजींचे विचार, इतर मोठ्या नेत्यांचे विचार, देशभक्ती पर गाणे, कविता इत्यादी प्रसारित केले जायचे. इंग्रजांच्या तावडीतुन बचाविण्यासाठी हे आपल्या रेडीओची जागा जवळपास रोज बदलायचे. एवढी काळजी घेऊनसुद्धा इंग्रजांच्या हाती हे प्रकरण लागले. १२ नोव्हेम्बर १९४२ साली उषाजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अटक झाली आणि ४ वर्ष सश्रम कारावास दिला गेला. ह्याचा खटला सुरू होता, त्यावेळी उषाजींना, आमिष दाखविले गेले, की तुम्ही ‘भारत छोडो’ आंदोलनातून दूर व्हा तुम्हाला उच्च शिक्षणासाठी विलायतेला पाठवू, त्यांना एकांतवासात ठेवले गेले तरीही त्या बधल्या नाहीत. जेव्हा कोर्टात त्यांना जज ने सांगितलं की त्यांना प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणे बंधनकार नाही,तर त्यांनी पूर्ण सुनावणीभर मूक राहणं पसंद केलं, एकही प्रश्नांच उत्तरं दिल नाही की आपल्या बचावासाठी सुद्धा काहीच बोलल्या नाही. १९४६ साली त्यांची सुटका झाली. फक्त तीन महिने गुप्त रेडिओ चे काम झाले, पण त्याने देशातील क्रांतीकारकांना मोठा फायदा झाला आणि त्यासाठी उषाजींनी ४ वर्षाचा कारावास भोगला.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी आपला अभ्यास पूर्ण केला, आणि गांधींच्या राजकीय व सामाजिक विचारधारेवर आपले डॉक्टरेट पूर्ण केले. स्वातंत्र्या नंतरच्या काळात सुद्धा त्यांनी समाजसेवा, गांधी विचारसरणीचा पुरस्कार, प्रचार, आणि लेखन सुरूच ठेवले. १९९८ साली त्यांना पद्म विभूषण ने सन्मानित करण्यात आले.
आपल्या विचारांवर ठाम, ध्येयाशी एकनिष्ठ असं आयुष्य जगून २००० साली त्यांनी शेवटचा श्वास घेतला. आपल्या मृत्यूच्या अगदी २ दिवस आधी ‘भारत छोडो’ आंदोलनाच्या वर्षगाठ समारोहात सुद्धा त्यांनी भाग घेतला होता. स्वतःशीच वचनबद्ध असलेल्या, ध्येयनिष्ठ आयुष्य जगलेल्या अशा तेजस्वी शलाकेला माझी शब्दसुमनांजली.
|| वंदे मातरम् ||
— सोनाली तेलंग.
संदर्भ:
१. inuth.com
२. विकिपीडिया
Leave a Reply