“ह्या इंग्रजी सरकारचे डोके तर ठिकाणावर आहे ना?”
“ने मजसी ने परत मातृभूमीला….”
“राष्ट्रस्वातंत्र्य द्या, हिंदभूला नवे!
धर्म-स्वातंत्र्य तें हिंदभूला हवे!
ज्ञानस्वातंत्र्य ती प्रार्थुनी मागते!
हिंदभू वांछिते सकल स्वातंत्र्य तें!”
लेखणीची धार ही नेहमीच आपले काम चोख बजावत आली आहे. आपल्या स्वातंत्र्य संग्रामात या लेखणीने खूपच मोलाची कामगिरी बजावली आहे, मग ती टिळकांची लेखणी असो ज्यांनी केसरीच्या अग्रलेखातून इंग्रजी सरकारला खडसावून विचारले, किव्हा सावरकरांची लेखणी जिने प्रत्येक भारतीयांच्या मनात घर केले. मराठीतील राष्ट्रकवी कवी गोविंद ह्यांच्या कविता क्रांतिकारकांसाठी स्फूर्तिगीते ठरल्या. अश्याच आहेत आजच्या आपल्या असमी कवियत्री कुंतला कुमारी सबत.
८ फेब्रुवारी १९०० साली त्यांचा जन्म जगदलपूर येथे एका ब्राम्हण परिवारात झाला. ह्यांच्या जन्मआधीच त्यांच्या पालकांनी ख्रिस्त धर्म स्वीकारला. वडील डॅनियल सबत हे व्यवसायाने वैद्य होते तर आई मोनिका सबत गृहलक्ष्मी होत्या. कुंतला देवीच्या जन्मानंतर लगेचच सबत परिवार बर्मा ला स्थलांतरित झाले. तिकडे त्यांच्या वडिलांनी दुसरे लग्न केले आणि कुंतलादेवी आईबरोबर खुरदा येथे परत आल्या. स्त्री शिक्षणाला काहीही महत्व नसतांना कुंतलादेवीच्या आईंच्या अग्रहास्तव कुंतलादेवींचे शिक्षण अतिशय उत्तम प्रकारे झाले. त्या डॉक्टर झाल्या. त्याच बरोबर त्या बहुभाषी होत्या. त्यांना ओडिया, हिंदी, बंगाली, इंग्लिश आणि ब्राम्हीस भाषा अवगत होत्या.
त्या निष्णात डॉक्टर होत्याच त्याशिवाय मनातून समाजसेविका होत्या. त्यांच्या प्रत्येक कामातून, लिखाणातून ह्याची जाणीव होत राहते. १९२८ साली त्यांचा विवाह त्यांचेच गुरू श्री कृष्णा प्रसाद ब्रम्हचारी ह्यांच्याशी झाला. त्या दिल्ली निवासी झाल्या.
गांधीजींच्या प्रभावामुळे कुंतलादेवी ह्यांनी आपल्या लेखणीतून इंग्रजांविरुद्ध लिखाण करायला सुरुवात केली. त्यांच्या लिखाणाचे मुळ उद्दिष्ट युवकांना प्रेरित करणे, भारतमातेच्या स्वतंत्रते बद्दल लिहिणे, क्रांतीकारकांना प्रेरणा देणे हेच होते. समाजातील चुकीच्या रूढी जसे की, बाल विवाह, विधवा विवाह, स्त्री शिक्षण, जातीय वादा विरुद्ध सुद्धा त्यांनी आपले प्रखर मत आपल्या लेखणीतून प्रकट केले. भारती तपोवन संघ ची स्थपना केली जेणेकरून ओडिया साहित्य प्रकाशात येईल, त्याचे संवर्धन होईल. १९३८ साली वयाच्या केवळ ३८ व्या वर्षी त्यांना देवाज्ञा झाली.
लेखणीच्या साह्याने जी युद्ध लढली जातात, ते नेहमीच समाज प्रवर्तक ठरतात. समाजाला नवीन विचार, प्रेरणा देणारे ठरतात. आपल्या लेखणीचा समाजहितासाठी वापर करणाऱ्या ह्या भारतमातेच्या विरांगनेला माझे कोटी कोटी नमन.
|| वंदे मातरम् ||
सोनाली तेलंग
२७/०६/२०२२
संदर्भ:
१. inuth.com
२. wikipedia.com
Leave a Reply