हम को जो करना था हमने किया…. किती शक्तीशाली वाक्य आहे हे, हे नुसतेच शब्द नव्हे तर ही कृती आहे. जी कुठल्याही परिस्थितीशी समझोता न करता केली गेली, वारंवार केली गेली. इतक्या पक्क्या विचारांच्या होत्या आपल्या भारतमातेच्या वीरांगना राजकुमारी गुप्ता.
१९०२ साली कानपुर येथे, एका किराणा मालाच्या दुकानदाराच्या घरात ह्या तेजस्वी शलाकेचा जन्म झाला. स्त्री तेव्हा परदा प्रथा पाळत असत. तेव्हाच्या समाज रचनेनुसार त्यांच्या शिक्षणाचा प्रश्नच नव्हता, १३ व्या वर्षी त्यांचा विवाह मदन मोहन गुप्ता ह्यांच्याशी करण्यात आला जे स्वतः क्रांतीकारी होते, महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित होते. दोघेही पती पत्नीने देशसेवेचे व्रत घेतले.
पुढे जाऊन राजकुमारी गुप्ता सशस्त्र क्रांतीच्या पुरस्कर्त्या झाल्या. हिंदुस्थानी सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (HRA) च्या सदस्या झाल्या, त्या चंद्रशेखर आझाद ह्यांच्या संपर्कात आल्या. निरोप आणि शस्त्र दोन्ही गुप्तता राखत एकीकडून दुसरीकडे पोचवणे अशी कामे त्या करू लागल्या. हे करतांना त्यांच्या सासरच्या मंडळींनासुद्धा ह्याबद्दल माहिती होऊ दिले नाही. आपल्या कपड्यांच्या आत शस्त्र लपवून त्या अगदी सहज एका ठिकाणाहून दुसरीकडे पोचवत असत. काकोरी रेल लूट मध्ये त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. दारुगोळा पोचवणे,निरोप सांगणे. इंग्रजांचा पाठलाग सुरु झाला आणि एकदा शेतातून शस्त्र घेऊन जात असतांना त्यांना अटक करण्यात आली.
त्यांच्या परिवाराने त्यांच्याशी कुठलाही संबंध नाही असे वर्तमान पत्रात छापून जाहीर केले. १९३०, १९३२ आणि १९४२ असे अनेकदा राजकुमारी गुप्ता ह्यांनी देशसेवेच्या व्रतासाठी तुरुंगवास भोगला. घरच्यांपासून तुटल्या पण हाती घेतलेला देशसेवेचा वसा टाकला नाही. आपले नाव इतिहासात येईल किव्हा नाही, आपल्या कार्याची नोंद ठेवली जाईल की नाही हे प्रश्न त्यांना कधी पडलेच नसावेत.
त्या ठामपणे आपली भूमिका मांडताना सांगत, की आम्ही वरून जरी गांधीवादी वाटत असलो तरी आम्ही आतून क्रांतिवादी आहोत. इतक्या प्रखर राष्ट्रसेविकेला आमचे शत शत नमन.
|| वंदे मातरम् ||
— सोनाली तेलंग.
संदर्भ:
१. inuth.com
२. wikipedia
Leave a Reply