रणरागिणी हा खिताब पटकावणे काही सोपे काम नाही, जनमानसाने त्यांच्या कामाचा आवाका पाहुनच तो खिताब त्यांना बहाल केला. आपल्या कामाबद्दल अपार श्रद्धा, आपल्या विचारांशी ठाम असलेल्या, आपल्या नावाचा वारसा पुढे चालविणाऱ्या अहिल्याबाई रांगणेकर.
५ जुलै १९२२ साली रणदिवे परिवारात अहिल्याबाईंचा जन्म झाला. वडील इन्कमटेक्स अधिकारी तर आई गृहिणी. त्यांची लहानपणीच्या आठवणी सांगतांना त्या म्हणाल्या होत्या,आमचं लहानपण बाहुली खेळण्यात कधीच गेलं नाही, तर आमच्या हातात लेखणी दिली गेली. व्यायाम शाळेत आम्ही अगदी लहानपणापासून जात असू, पोहणे, लाठी चालविणे, घोडेस्वारी त्या आपल्या भावाच्या बरोबरीने शिकल्या. त्यांना समाजसेवेचे बाळकडू घरातूनच मिळाले. त्यांचे वडील आधुनिक विचारांचे पुरस्कर्ते होते. घरातले वातावरण एखाद्या व्यक्तीच्या जडणघडणीत फार मोलाचे काम करते. अहिल्याबाई आपल्या वडिलांच्या तालमीत तयार होत होत्या. वडिलांनी त्यांचा मदतनीस म्हणून एका दलित मुलाला घरात आणले. त्या दलित मुलाला शिकवायची जवाबदारी अहिल्याबाईंवर होती. बाबासाहेब आबेडकर, आगरकर ह्यांचे त्याच्या घरात येणे जाणे. मोठी बहिणी १० वी झाली, मोठ्या भावाचे लग्न झाले, त्यांची बायको सुद्धा १० पर्यंत शिकलेली, दोघींचे नाव कॉलेजमध्ये घातले गेले. मुलींना शिकवून समाज बघडवताहेत म्हणून रणदिवे परिवारावर बहिष्कार टाकण्यात आला. पण रणदिवे मागे हटले नाहीत. एकूणच स्वतःच्या विचारांवर ठाम राहणे त्या घरात प्रत्येकाकचे स्वभाव वैशिष्ट्यच होते जणू.
१९४२ चा वणवा भारतभर पेटला. अहिल्याबाई त्यावेळी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज ला शिकत होत्या. विद्यार्थ्यांनी सुद्धा ह्यात भाग घ्यावा म्हणून सगळ्या विदयार्थ्यांना एकत्रित केले आणि “चलेजाव” चळवळीत भाग घेतला, साडे तीन महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागला. फ्लस्वरूप फर्ग्युसन कॉलेज ने त्यांना पुढील शिक्षणासाठी बंदी केली. मुंबईच्या रुईया कॉलेज मधून त्या पदवीधर झाल्यात. समाजसेवेचे बीज लहानपणीच पेरले गेले होते, आता त्या पूर्णवेळ काम करत्या झाल्या. गिरणी कामागरांसाठी, तिथल्या बायकांसाठी त्यांना बाळंतपणाची सुट्टी,भत्ता, अश्या सगळे विषय घेऊन त्या काम करत राहिल्या. १९४५ साली पी.बी.रांगणेकर कम्युनिस्ट पक्षाचे पूर्णवेळ कार्यकर्ते ह्यांच्याशी त्यांचा विवाह झाला. काम मात्र पूर्णवेळ, त्याच गतीने सुरू राहीले. भारताची स्वातंत्र्य चळवळ, गिरणी कामगारांसाठी काम असो, रेल्वेचा संप, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो किव्हा भारत-चीन युद्ध काळ असो, त्यांनी नेहमीच जीव ओतून काम केलं.
“माझी दृष्टी जरी अधू झाली असली तरी माझा दृष्टिकोन मात्र खणखणीत आहे” त्यांचं हे म्हणणं त्यांच्या कामाचा आलेख, आवेग बघता, विचारांची बैठक बघता नेहमीच स्पष्ट जाणवतं. २००९ साली ह्या तेजस्वी शलाकेने ह्या जगाचा निरोप घेतला, पण त्यांचे विचार आपल्या कामातून समाजात पेरून गेल्या. अश्या ह्या रणरागिणीला माझे नमन.
|| वंदे मातरम् ||
— सोनाली तेलंग.
३०/०६/२०२२.
संदर्भ:
१. स्त्रीशक्ती आणि स्वातंत्र्यलढा : लेखिका व संकलक : डॉ अर्चना चव्हाण, स्मिता कुलकर्णी, भारतीय विचार साधना पुणे
२. Wikipedia
Leave a Reply