भारतीयों और कुत्तो को प्रवेश नही….. किती हीन वागणूक आहे ही, अशी पाटी वाचली तर कोणाचेही रक्त खवळेल, हे तर असं झालं की आमच्याच घरात येऊन आम्हालाच प्रेवेश निषिद्ध करणारे तुम्ही कोण??? मग एक २१ वर्षाची कोवळी तरुणी जिच्यावर झाशी च्या राणींचा प्रभाव आहे त्या त्याविरुद्ध आंदोलन करणारच ना? आपल्या प्राणांची आहुती देऊन त्यांनी आपला स्वाभिमान उंच ठेवला अश्या होत्या प्रितीलता वाद्देदार.
५ मे १९११ साली एका मध्यमवर्गीय ब्राम्हण कुटुंबात चिटगांग येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील सरकारी नौकरीत क्लर्क होते. आई एक गृहिणी. त्यांच्या वडिलांनी आपल्या मुलांच्या शिक्षणात कधीच अडथळा येऊ दिला नाही. प्रितीलता मुळाच्याच हुशार होत्या. वीरांगना कल्पना दत्त ह्या त्यांच्या वर्गमैत्रीण होत्या. दोघींनाही इतर मुलींसारख्या राजकुमाराच्या कथा आवडत नसत तर त्यांच्या लहानपणाच्या आवडत्या गोष्टी म्हणजे झाशीच्या राणीच्या गोष्टी. त्या ऐकल्यावर त्यांना स्वतःच्या विचारात निडरता जाणवायची.
पुढील शिक्षणासाठी प्रितीलता कोलकत्त्याला आल्या. इथे त्यांची भेट क्रांतिकारी सूर्य सेन ह्यांच्या बरोबर झाली. तत्वज्ञान ह्या विषयात पदवीधर होऊन, त्या एक शाळेत शिक्षिका म्हणून लागल्या. आपल्या इतर सहचारी मैत्रिणींना त्या नेहमी म्हणत, फावल्या वेळात काहीतरी देशसेवेचे काम करा, स्वातंत्र्य चळवळीत भाग घ्या. क्रांतिकारी सूर्य सेन ह्यांच्या संपर्कात आल्यावर त्यांनी चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवला. जे कारावासात बंदी आहेत अश्या क्रांतिकारकांशी संपर्कात राहणे, त्यांना तुरुंगात भेटून त्यांचे मनोबल वाढविणे, निरोप नेणे-पोचवणे, बॉम्ब तयार करणे अशी सगळी कामं त्या करत.
१९३२ साली पाहाडतळी युरोपियन क्लब वर हल्ला करण्याची योजना सूर्य सेन ह्यांनी केली आणि ह्याची जवाबदारी प्रितीलता ह्यांच्यावर सोपवली. हाच तो क्लब जिथे बाहेर पाटी होती, “Indians and dogs are not allowed”. २४ सप्टेंबर च्या रात्री १०.४५ मिनिटांची वेळ निश्चित करण्यात आली. प्रितीलता एका पंजाबी युवक बनून गेल्या,तर त्यांचे इतर साथीदार वेगळ्या वेषात क्लब जवळ पोचले. आतमध्ये ४० इंग्रज उपस्थित होते. बॉम्ब ने हल्ला करण्यात आला. गोळ्या झाडण्यात आल्या. त्यात एक व्यक्ती मारला गेला तर अर्ध्याच्या वर जखमी झाले. प्रितीलता आणि त्यांचे साथीदार तिकडून बाहेर पडले, पण इंग्रजांनी दिलेल्या प्रतिउत्तरात प्रितीलता ह्यांच्या पायाला गोळी लागली, त्या पळण्यास असमर्थ ठरल्या. इंग्रजांच्या हाती पकडल्या जाण्यापेक्षा त्यांनी मरण पत्करले. पोटॅशियम सायनाईड खाऊन त्यांनी आपले जीवन देशाच्या चरणी अर्पण केले.
मृत्यू समयी त्यांच्याजवळ एक कागद सापडला, ज्यात त्यांनी आपल्या ह्या हल्ल्या विषयी लिहिले होते, त्याच बरोबर स्त्री-पुरुष भेदभाव न ठेवता सगळ्यांनी भारतमातेच्या स्वतंत्रतेसाठी ह्या चळवळीत भाग घेतला पाहिजे असेही लिहिले होते. एका २१ वर्षीय कोवळ्या मुलीचे बलिदान आपल्याला स्वातंत्र्य देऊन गेला. आपण भारतीय कायम तिचे ऋणी राहू. त्यांच्या क्रांतिकारी चळवळींमुळे त्यांची पदवी जी रोखण्यात आली होती, ती ८० वर्षानंतर त्यांना बहाल करण्यात आली.
|| वंदे मातरम् ||
— सोनाली तेलंग.
०१/०७/२०२२.
संदर्भ :
१. भारत डिस्कवरी
२. विकी पीडिया
Leave a Reply