वहिनी हे नातं किती सुंदर आहे ना? वहिनी म्हणजे कोण तर सांभाळून घेणारी, पाठीशी घालणारी, मदतीला तत्पर, आणि साथ देणारी. अशीच आहे आपली आजची वीरांगना, सगळ्या क्रांतिकारी लोकांना आपल्या वहिनीच्या ठिकाणी वंदनीय, पूजनीय वीरांगना दुर्गावती वोहरा अर्थात दुर्गा भाभी.
०७ ऑक्टोबर १९०७ साली अलाहाबाद येथे एका ब्राम्हण गुजराथी परिवारात झाला. वडील क्लेकटर ऑफिसमध्ये कार्यरत होते तर आई गृहिणी होती. घरात लाडा कोडात वाढलेल्या दुर्गावतीचा विवाह श्री भगवती शरण बोहरा ह्यांच्याशी वयाच्या ११ व्या वर्षी झाला. भगवती शरण बोहरा स्वतः क्रांतिकारी होते आणि हिंदुस्थान सोसिएलिस्ट रेव्हॅल्युशनरी संघटनेचे सक्रिय सदस्य होते. त्यांच्या सासऱ्यांना इंग्रज सरकार ने ‘राय साहेब’ ही पदवी बहाल केली होती. तरीही त्या घरातून भारतमातेच्या स्वातंत्रतेसाठी सक्रिय सहभाग नोंदवला होता.
नौजवान भारत सभा च्या त्या सक्रिय सदस्या होत्या . त्यांच्या कार्याची सुरवात अगदी लवकरच झाली होती तरी त्यांच्या कामाचा परिचय तेव्हा झाला ज्यावेळी त्यांच्या अध्यक्षतेखाली करतार सिंग सारबा (ज्यांनी वयाच्या १९ व्या वर्षी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले) ह्यांची ११ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
श्री विमल प्रसाद जैन ह्यांचा बॉम्ब बनविण्याचा कारखाना होता, ‘ हिमालयन टॉयलेट्स’ ह्या नावाखाली. दिखाव्या साठी काही और बनायचे आणि प्रत्यक्षात तिथे बॉम्ब बनविले जायचे. दुर्गा भाभी आणि त्यांचे पती श्री बोहरा दोघे जातीने तिथे मदत करायचे.
लाला लजपत राय ह्यांची लाठी चार्ज मध्ये निघृण हत्या करण्यात आली. भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांनी ह्यांचा बदला घेण्यासाठी लॉर्ड सॉंडर्स ला मारण्याचा कट रचला आणि तो यशस्वी देखील केला. आता भगतसिंगांना लाहोरहून भूमिगत व्हायचे होते. भगतसिंग ह्यांनी वेष पालटला, आपली दाढी मिशी काढून टाकली आणि दुर्गा भाभी बरोबर लाहोर हुन कलकत्त्याला प्रयाण केले. त्यांच्या बरोबर दुर्गा भाभी त्यांच्या पत्नी म्हणून गेल्या तर त्यांचा धाकटा लेक सुद्धा बरोबर होता आणि राजगुरू त्यांचे नौकर म्हणून गेले.
भगतसिंग ह्यांनी केंद्रीय संसद वर बॉम्ब हल्ला केला, त्यानंतर इंग्रज सरकारपुढे आत्मसमर्पण केले. दुर्गा भाभीनी त्यावेळी लॉर्ड हैली वर हल्ला केला, तो तर वाचला पण त्याचे इतर साथी मारले गेले. दुर्गाभाभीना अटक झाली. ३ वर्ष सश्रम कारावास भोगावा लागला.
भगतसिंग आणि त्यांच्या इतर साथीदारांच्या सुटकेसाठी त्यांनी स्वतःचे दागिने त्याकाळी ३००० रुपयाला विकले.
ह्या सगळ्या चळवळीच्या काळात त्यांनी अगदी घरातल्या मोठ्या वहिनी प्रमाणे सगळ्या क्रांतिकारकांच्या पाठीशी राहिल्या. स्वातंत्रता मिळाल्या नंतरही त्या अगदी सामान्य आयुष्य जगल्या. कुठल्याही प्रकाश झोतात यायला त्यांना आवडले नाही. लखनऊ ला त्यांनी गरीब आणि गरजू मुलांसाठी शाळा काढली. वयाच्या ९२ व्या वर्षी गाझियाबाद येथे त्यांनी शेवटचा श्वास घेतला. कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता, आपले सर्वस्व पणाला लावून त्यांनी देशसेवेचे व्रत अव्याहत चालू ठेवले.
हम करे राष्ट्र आराधना
तन से, मनसे, धनसे
तन मन धन जीवनसे
अश्या ह्या भारतमातेच्या वीरांगनेला आमचे कोटी कोटी प्रणाम.
सोनाली तेलंग
०२/०७/२०२२
संदर्भ :
१. भारत डिस्करवी
२. विकिपीडिया
Leave a Reply