सेवा है यज्ञ कुंड, समिधा सम हम जले
यज्ञ जो करतो त्याला इप्सित फळ मिळतं, ज्याने पूजा सांगितली त्याला पुण्य लाभ होतो, पण ती समिधा…तिचं काय? ती फक्त आहुती साठीच जन्माला येते आणि आहुतीच तिच्या जीवनाची इतिसार्थकता ठरते. स्वातंत्र्य सेनानी कोणाला म्हणायचे ह्याचे निकष ठरले आहेत, जे मैदानात उतरले, ज्यांना कारावास भोगावा लागला ते स्वातंत्र्य सेनानी. पण प्रत्येक समर जेवढा मैदानात लढला गेला तेवढाच तो घरा-घरातून लढला गेला. त्या सैनिकांच्या पाठीशी ठामपणे उभे होते त्यांचे कुटुंब. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे घर तर ह्याचे शब्दशः उदाहरण आहे. सावरकर घराण्याची थोरली सून – यशोदा गणेश सावरकर
१८८५ साली त्र्यंबकेश्वर येथे फडके घराण्यात जन्माला आली ही तेजस्वी शलाका – यशोदा. वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी १८९६ साली त्या सावरकर घराण्यात थोरली सून म्हणून लग्नहोऊन भगूर ला आल्या. सौ यशोदा बाबाराव उर्फ गणेश सावरकर. घरची वतनदारी. निरक्षर यशोदाला ह्या घरात आल्यावर लिहायला-वाचायला आवर्जून शिकवले गेले. प्लेग पसरला आणि सावरकर घरावर पहिली कुऱ्हाड पडली. सासरे आणि चुलत सासरे गेले, त्याबरोबर घरची वतनदारी पण गेली. नाशिकला आले आणि बाबरावांनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. अभिनव भारत संघटनाच्या मार्फत मित्रमेळा नावाची संस्था स्थापन झाली. बाबा रावांच्या नेतृत्वाखाली त्या अंतर्गत ९ पुस्तिका छापण्यात आल्या, त्यात कवी गोविंद ह्यांच्या कवितांच्या पुस्तिकाही होत्या. त्याबद्दल बाबारावांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना काळ्यापाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. सावरकर घरावर अजून एक कुऱ्हाड पडली. येसु वाहिनींवर दोन धाकट्या दिरांची जवाबदारी आली. दोन धाकटे दीर, त्यातल्या दुसऱ्याला सुद्धा काळ्यापाण्याची शिक्षा, त्याच्या बायका आणि आपल्या दोन लेकी, येसू वहिनी सगळ्यांच्याच आई झाल्या.
घरावर येणाऱ्या सततच्या जप्त्या, इंग्रजांचा ससेमिरा सगळ्याला धीराने तोंड देणारी येसू वहिनी आता आपल्यासारख्याच इतर क्रांतिकारिंच्या बायकांची आधारस्तंभ बनली. क्रांतिकारिंच्या बायकांना ना समाजाने मदतीचा हात दिला, ना नातेवाईकांनी. सगळ्या जवळपास निरक्षर. कोणी धुण्या-भांड्यांची कामं सुद्धा देत नसे. अश्या सगळ्या निराधार स्त्रियांची येसू वहिनी आई, सखी, मार्गदर्शक बनली. स्वतःच्या घरातली वेगळी परिस्थिती नसतांनासुद्धा आत्मनिष्ठ युवती संघाची स्थापना केली. अश्या सगळ्या निराधार बायकांना दर शुक्रवारी एकत्र आणून,वर्तमान पत्र वाचून दाखवणे, त्यावर चर्चा करणे हे घडवून आणू लागल्या. स्वदेशी चळवळ चुलीपर्यत पोचवण्याचे काम येसू वाहिनींच्या मार्गदर्शना खाली ह्या संघटनेमार्फत होत होते. कवी गोविंदाच्या कविता मुखोद्गत करून त्या घरा-घरात पोचवल्या.
आपल्या समाज रचनेत विवाहित स्त्री काचेच्या बांगडी शिवाय राहणे समाज रचनेला मान्य नव्हते, पण जेव्हा त्यांना कळलं की बांगडीची काच विदेशी आहे, त्यांनी त्याचा त्याग केला. दोन वेळ खाण्याची भ्रांत, इंग्रजी हुकमशाहीचा ससेमिरा, नवरा दूर, मुली अल्पायुषी, दोन धाकट्या दिरांची आणि त्यांच्या बायकांची जवाबदारी आणि देशसेवा ही सगळी व्रत एकाच वेळी त्या माउलीने पेलली. आपल्या पतीला एकदा भेटण्याची परवानगी त्यांनी इंग्रजी सरकारला मागितली होती. सततची व्रतवैकल्ये, उपासमार, ताण ह्यात त्यांची तब्येत खालवत गेली आणि ५ फेब्रुवारी १९१९ त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मृत्यू पश्चात ३ दिवसांनी त्यांना बाबरावांच्या भेटीची परवानगी मिळाली असे पत्र आले, केवढा हा दैवदुर्विलास.
सावरकरांनी आपली कविता ‘सांत्वन’ ह्यात येसू वाहिनींच जे वर्णन केलं ते अगदी शब्दशः त्या जगल्या…
‘तू धैर्याची अससी मूर्ती | माझे वहिनी माझे स्फूर्ती |
अश्या स्फूर्तिदायी विरंगनेला माझे नमन.
— सोनाली तेलंग.
संदर्भ: तू धैर्याची अससी मूर्ती: लेखिका अपर्णा चोथे, मृत्युंजय प्रकाशन, त्या तिघी: लेखिका डॉ, सौ. शुभा साठे, लाखे प्रकाशन, स्त्रीशक्ती आणि स्वातंत्र्यलढा: लेखिका व संकलक: डॉ अर्चना चव्हाण, स्मिता कुलकर्णी, भारतीय विचार साधना पुणे.
०६/०६/२०२२.
Leave a Reply