आपण संस्कारावर नेहमी बोलतो, संस्काराचे महत्व देखील जाणतो, काय आहे संस्कार म्हणजे , तर फक्त तुमच्या आचरणाची पद्धत. ती कशी तयार होते, तर आपल्या घरातील, समाजातील, परिवारातील मोठ्यांच्या अनुकरणाने. आजच्या वीरांगना दुकडीबाला ह्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यांचे वडील स्वतः क्रांतिकारी नसले तरी त्यांच्या मनात क्रांतिकारकांबद्दल प्रचंड सहानुभूती होती, ते त्यांच्या कामाचा आदर करायचे. एखादी गोष्ट आपण स्वतः करत नसलो तरी, जे करताहेत त्यांना सहायक भूमिका निभावणे सुद्धा एकप्रकारे देशसेवाच आहे.
१८८७ साली झाऊपाडा ह्या बंगाल मधील छोट्याश्या गावात एका गरीब परिवारात त्यांचा जन्म झाला. शिक्षण तर शक्यच नव्हते, त्यामुळे लक्ष्मी आणि सरस्वती दोघीही नाराज. त्यांचे वडील निलमणी चटोपाध्याय ह्यांना क्रांतिकारकांविषयी प्रचंड सहानुभूती होती. दुकडीबाला ह्यांच्यावर संस्कार इथून सुरू झाले.
क्रांतीकारकांचे त्यांच्याकडे बरेच येणेजाणे असत. एकदा ज्योतिष घोष नावाचे क्रांतिकारी त्यांच्याकडे मुक्कामाला होते. नलिन बाबू ह्या नावाने त्यांनी दुकडीबाला ह्यांच्या घरी प्रवेश केला. ते व्यायाम वर्ग घेत असत. तिथे शारीरिक प्रशिक्षणा सोबतच लाठी चालविणे, सुरा चालविणे, इत्यादींचे प्रशिक्षण पण दिले जाऊ लागले. दुकडीबाला रोज हे सगळं एकचित्ताने बघत असत, त्यांना त्यात रुची निर्माण झाली. आपल्या भाच्याला त्या म्हणाल्या, की मला सुद्धा हे सगळं शिकायचे आहे, त्यावर त्यांचा भाचा त्यांना म्हणाला, मावशी ह्या सगळ्यासाठी आधी वाचता-लिहिता यायला हवे. त्यांना ही गोष्ट मानला लागली, आधी त्यांनी आपल्या भाच्याकडून लिहायला आणि वाचायला शिकून घेतले, मग व्यायामाचे सगळे प्रकार, लाठी चालविणे, सुरा चालविणे सगळे शिकून घेतले. एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत तर त्यांनी आपल्या भाच्याकडून पिस्तुल चालविणे पण शिकून घेतले. त्या सगळ्याप्रकारे स्वतःला तयार करत होत्या, जणू पुढे काय होणार ह्याची कल्पना त्यांना आली होती.
पुढे त्यांचा विवाह फणीभूषण चक्रवर्ती ह्यांच्याशी झाला. ते सुद्धा ह्या सगळ्या कामात दुकडीबाला देवी ह्यांना मदत करू लागले. त्यांच्या भाच्यासाठी आपल्या मावशीचे घर हक्काचे ठिकाण झाले, जिथे तो स्वतः लापायचा, आपली शस्त्र संपदा लपवायचा. श्री हरिदास दत्त नामक एक क्रांतिकारी होते. त्यांनी एकदा वेशभूषा बदलून एका शस्त्र कंपनी च्या गोदमातून २०० शस्त्र असलेली एक पेटी चोरली आणि ती दुकडीबाला ह्यांच्या घरी ठेवली. कालांतराने त्यातील बरेचसे शस्त्र आपल्या इप्सित स्थळी पोचले. तरी काही दुकडीबाला ह्यांच्या घरी होतेच. इंग्रज क्रांतिकारकांच्या मागावर नेहमीच असत. असेच एकदा ते तपास करत करत दुकडीबाला ह्यांच्या घरी पोचले. तिथे त्यांना काही शस्त्र सापडलीत आणि दुकडीबाला देवी ह्यांना अटक करण्यात आली.
त्यांना प्रचंड यातना दिल्या गेल्या जेणेकरून त्या आपल्या अन्य साथीदारांची नावं सांगतील, पण दुकडीबाला इंग्रजांच्या जाचापुढे बधल्या नाहीत. त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही, की एकही माहिती फुटू दिली नाही. त्यांना अडीच वर्षांचा सश्रम कारावास देण्यात आला.कारावासात असतांना सुद्धा त्यांनी कधीही तक्रार केली नाही. त्यांच्या वाटेला नेहमीच इतरांपेक्षा जास्त कठीण कामं येत गेली आणि त्या करत गेल्या. त्यांच्या यातना ननी बाला घोष (ज्या स्वतः क्रांतिकारी होत्या आणि सश्रम कारावासाची शिक्षा भोगत होत्या) ह्यांना पाहवल्या गेल्या नाहीत. त्यांनी भूक हडतला केला आणि दुकडीबाला ह्यांचे श्रम थोड्याप्रमाणात कमी झाले.
कारावसातून मुक्त झाल्यावर सुद्धा, त्यांनी त्यांचे समाजसेवेचे व्रत सुरूच ठेवले. मानव जातीच्या कल्याणासाठी त्या सतत काम करत राहिल्या. २८ एप्रिल १९७० साली त्यांना देवाज्ञा झाली. व्यक्तीला कुठल्याही विषयात जिज्ञासा असली तर ती किती मोठं कार्य करू शकते हे आपल्या वीरांगना श्रीमती दुकडीबाला देवी ह्यांच्या विषयी अभ्यास करतांना जाणवते. त्यांच्या ८३ वर्षाच्या आयुष्याची आपल्या इतिहासात दखल घेतली गेली नाही हे दुःख आहे. आज त्यांना आपल्या लेखणीच्या माध्यमातून मी नमन करते.
— सोनाली तेलंग.
०३/०७/२०२२.
संदर्भ :
१. 17passion.com
२. विकिपीडिया
Leave a Reply