आपल्या दुःखाला कवटाळून जगण्यापेक्षा, दुसऱ्यांच्या कामात हातभार लावणे केव्हाही योग्यच नाही का? देणाऱ्याने देत जावे….अश्याच जगल्या वीरांगना ननीबाला देवी.
१८८८ साली हावडा येथे एका ब्राम्हण परिवारात त्यांच्या जन्म झाला. काही कळायच्या वयाच्या आत त्यांचा वयाच्या ११ व्या वर्षी विवाह सुद्धा झाला.जेमतेम ५-६ वर्षांचा संसार आणि त्यांना वैधव्य आलं. नशिबाला दोष देत त्या नक्कीच रडत बसू शकल्या असत्या, पण त्यांनी हा मार्ग दूर केला. आता हाती आलेल्या वेळेचा सदुपयोग करणे हातात होते, त्यांनी अभ्यासाला सुरवात केली. एका मिशनरी शाळेत त्यांनी इंग्रजी भाषा शिकण्यासाठी प्रवेश मिळवला. विचार साधर्म्य असणे शक्यच नव्हते, त्यांनी आपल्या शिक्षणाला राम राम ठोकला. आपला दूरचा भाचा श्री अमरेंद्र नाथ चटोपाध्याय जे युगांतर ह्या क्रांतिकारी संघटनेचे प्रमुख होते त्यांच्याशी ननीबाला देवींचा संपर्क झाला आणि क्रांतीची नवी वाट मिळाली.
क्रांतीचे काम किव्हा देशसेवेचे व्रत हे काही आपल्या इतर व्रतवैकल्या सारखे नाही ना, ते सतत, अविरत चालू ठेवावे लागते, कामे सुद्धा ठरलेली नसतात, जे पडेल ते काम करत राहणे. एक क्रांतिकारी श्री रामचंद्र मजुमदार एकदा तुरुंगवासात होते, अटक झाली तेव्हा ते आपल्या जवळचे पिस्तुल कुठे लपवले आहे हे आपल्या सहकाऱ्यांना सांगू शकले नाही. ननीबाला देवींने प्रवाहा विरुद्ध जायचे ठरवले. त्यांनी श्री रामचंद्र मजुमदार ह्यांची पत्नी बनून त्यांना भेटायला जाणे सुरू केले. हळूच बोलण्यातून त्यांनी माहिती पुरवली आणि ननीबाला देवींनी ती माहिती योग्य व्यक्तीपर्यंत पोचती केली. अनेक क्रांतीकारकांना हक्काचे घर होते देवी ननीबाला ह्यांचे घर. त्यांच्यावर पोलिसांची पाळत वाढू लागली. ननीबाला कलकत्त्याहून लाहोर ला रवाना झाल्या.
तिकडे त्यांची तब्येत बिघडली आणि त्या पोलिसांच्या हाती लागल्या. तिथल्या पोलिसांना ननीबाला देवींकडून कुठलीही माहिती काढता आली नाही,त्यांना पेशावरच्या जेल मध्ये पाठविण्यात आले. तिथे त्यांचा अतोनात छळ करण्यात आले. आपल्यावर व इतर क्रांतीकारकांना होणाऱ्या अनन्वित छळाचा विरोध करण्यासाठी ननीबाला घोष ह्यांनी तुरुंगात उपोषण सुरू केले. २१ दिवसाच्या उपोषणाचे फ्लस्वरूप त्यांना आणि इतर क्रांतिकरकांना होणाऱ्या कष्टात थोडीतरी सवलत मिळाली. १९१९ साली दोनवर्षांच्या सश्रम कारावसानंतर त्यांना मुक्त करण्यात आले, पण आता समाजात त्यांना जागा नव्हती. अत्यंत हलाखीच्या परीस्थित त्यांचे दिवस काढणे सुरू होते, त्यातच त्यांना आजाराने पछाडले, एका साधूने त्यांच्यावर उपचार केले, त्या आजारातून बऱ्या झाल्या आणि त्या साधूच्या प्रभावामुळे त्यांनी सुद्धा संन्यास घेतला. १९६७ साली त्यांनी आपला देह ठेवला.
कुठल्याही अपेक्षा न ठेवता, समाजसेवेचे व्रत हाती घेतलेल्या ह्या वीरांगानेला आमचे कोटी कोटी प्रणाम.
— सोनाली तेलंग.
०४/०७/२०२२.
संदर्भ :
१. भारातडीस्कॉवेरी
२. स्त्रीशक्ती – एक समांतर शक्ती
३. राधिकारंजन ब्लॉगस्पॉट
Leave a Reply