स्वतंत्र भारतातल्या पहिल्या महिला मुख्य मंत्री – सुचेता कृपलानी
अखिल भारतीय महिला काँग्रेस च्या स्थापक – सुचेता कृपलानी
संविधान सभा सदस्य – सुचेता कृपलानी
आपली ओळख आपल्या कामातून उभ्या केलेल्या भारतमातेच्या वीरांगना सुचेता कृपलानी
२५ जून १९०८ साली पंजाब अंबाला येथे एका बंगाली ब्रम्हओ परिवारात त्यांचा जन्म झाला. सुचेता मुजुमदार अतिशय हुशार, आपल्या विचारांशी ठाम तरीही मृदू स्वभावाच्या होत्या. अगदी लहानपणी त्या थोड्या एकट्या राहत, बुजऱ्या स्वभावाच्या होत्या, पण वेळेबरोबर आणि बदलणाऱ्या परिस्थिती बरोबर त्यांनी स्वतःला घडवलं. पुढे जेव्हा कुठलाही राजनैतिक निर्णय घेण्याची वेळ येई, त्यावेळी मात्र त्या कधीही हृदयाने विचार न करता अतिशय कोठारपणे आणि बुद्धीला प्राधान्य देऊन विचार करत. त्यांचे वडील जरी इंग्रजांच्या सरकारात काम करत होते तरी मनाने ते राष्ट्रवादी होते. तेच गुण सुचेता मध्ये आले.
त्यांचे शिक्षण दिल्ली, लाहोर अश्या ठिकाणी झाले. वयाच्या २१व्या वर्षी त्यांना स्वातंत्र्य संग्रामात उडी घ्यायची होती, पण त्याचवेळी त्याच्या वडिलांचा आणि बहिणीचा मृत्यू झाला,घराची जवाबदारी त्यांच्यावर आली. बनारस हिंदू युनिव्हर्सिटी मध्ये त्या शिकवू लागल्या.
दरम्यानच्या काळात त्यांच्या विवाह श्री जे. बी. कृपलानी ह्यांच्याशी झाला. ह्या दोघांच्या विवाहाला त्यांच्या घरच्यांपासून गांधीजींपर्यत सगळ्यांचा विरोध होता, पहिले कारण श्री कृपलानी सुचेताजींपेक्षा २० वर्षांनी मोठे होते आणि दुसरे कारण श्री कृपलानी गांधीजींचा उजवा हात म्हणवले जात आणि त्यांना असे वाटले की एकदा का लग्न झाले की कृपलानींचे देशसेवेतील लक्ष कमी होईल, त्यावर सुचेता म्हणाल्या, “की तुम्ही असा विचार करा की आता तुम्हाला २ नाही तर ४ हात मिळतील कामाला.” त्या जसं बोलल्या तसंच वागल्या. लग्ना नंतर त्यांनी स्वतःला पूर्णपणे देशसेवेच्या कामात झोकून दिले.
१९४० साली त्यांनी अखिल भारतीय महिला काँग्रेस ची स्थापना केली. त्याच्या माध्यमातून देशातील महिलांना स्वातंत्र्य संग्रामात भाग घ्यायला प्रेरित करणे, महिलांचे संघटन मजबूत करणे इत्यादी कामे केली. १९४२ च्या चले जावं आंदोलनात त्यांनी सक्रिय भाग घेतला, परिणामस्वरूप त्यांना १ वर्ष सश्रम कारावास भोगावा लागला. तुरुंगातून आल्यावर त्या पूर्णवेळ गांधींबरोबर विविध चळवळीत काम करत होत्या. देशाच्या विभाजनाच्या वेळी सुद्धा त्यांनी गांधींबरोबर पूर्णवेळ काम केले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर चीन युद्धाच्या वेळीसुद्धा त्यांनी त्यांची राजनैतिक जवाबदारी सांभाळत आपल्या मनाच्या जवळचे काम म्हणजे देशसेवा सतत करत राहिल्या.
१९६३ ते १९६७ त्यांनी उत्तर प्रदेश च्या मुख्यमंत्री म्हणून धुरा सांभाळली. १९७१ पर्यत त्या विविध राजनैतिक जवाबदाऱ्या सांभाळत होत्या. १९७१ साली त्यांनी राजकारणातून संन्यास घेतला. कुठे थांबायचे हे फार कमी लोकांना कळते, कदाचित सुचेतजींना भविष्य समजले होते. १९७४ साली दिल्ली येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
आपल्या कामातून आपली प्रतिमा बनवणाऱ्या, अगदी लहान वयातच मोठ्या जवाबदाऱ्या पार पडणाऱ्या, आपल्या वागण्या-बोलण्यातून देशातील महिलांचा सन्मान वाढविणाऱ्या भारतमातेच्या ह्या वीरांगनेला माझी शब्दसुमानांजली.
|| वंदे मातरम् ||
— सोनाली तेलंग.
०५/०७/२०२२.
संदर्भ :
१. Bharatdiscovery.org
२. Wikipedia.org
३. inuth.com
Leave a Reply