आपल्या विचारधारेवर ठाम असणे किती गरजेचे असते हे वारंवार ह्या सगळ्या वीरांगानांचा अभ्यास करतांना जाणवतंय. त्याशिवाय कुठलेच काम पूर्णत्वास जाणे शक्य नाही. लीला नाग रॉय ह्याचेच मूर्तिमंत उदाहरण आहे.
२ ऑक्टोबर १९०० साली त्यांचा जन्म एक उच्च मध्यम वर्गीय परिवारात आताच्या बांग्लादेश मध्ये झाला. त्यांच्या घरातले वातावरण आधुनिक आणि साधनता त्यामुळे त्यांचे लहानपण कुठल्याही बांधनाशिवाय गेले. त्यांचे वडील श्री गिरीशचंद्र नाग हे सुभाष चंद्र बोसांचे शिक्षक. आपल्या आजूबाजूला काय परिस्थिती आहे ह्याची पूर्ण कल्पना त्यांना होती. ढाका युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश घेणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या. त्यासाठी त्यांना तेव्हाच्या व्यवस्थेशी जोरदार झगडा करावा लागला, तो त्यांनी केला आणि मुलींसाठी शिक्षणाचा अजून एक मार्ग मोकळा केला.
आपल्या शिक्षणासाठी करावा लागलेला झगडा बघून त्यांना त्यांच्या कामासाठी क्षेत्र निवडणे सोपं झालं. त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी काम करायचे ठरवले आणि स्वतःला झोकून देऊन समाजसेवेचे हे व्रत हाती घेतले. नुसतेच पुस्तकी शिक्षण नाही तर शारिरिक शिक्षणावरही त्यांनी भर दिला. मुलींनी स्वतःच्या रक्षणार्थ इतरांवर अवलंबून राहणे त्यांना मान्य नव्हते. १९२१ सालच्या बंगाल मधील भीषण पुराच्या काळात, ढाका महिला मंडळ स्थापन करून, त्याच्या मार्फत नेताजींना भरपूर पैसा गोळा करून दिला.
१९२३ साली ढाका येथे दीपाली संघ स्थापन केला ज्या मार्फत स्त्रियांना लढाऊ प्रशिक्षण दिले जाऊ लागले. वीरांगना प्रितीलता वाडेद्दार ह्यांनी इथेच आपले प्रशिक्षण पूर्ण केले. असहकार चळवळीत, मिठाच्या सत्याग्रहात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला परिणाम स्वरूप त्यांना ६ वर्ष सश्रम कारावास भोगावा लागला. १९३१ साली त्यांनी पूर्णपणे महिला प्रेरित मासिक सुरू केले जयश्री या नावाने,ज्यात लेखन,संपादन, छापणे सगळी कामे महिलाच करत. १९३८ साली काँग्रेस प्लांनिंग कमिटी चा त्या भाग झाल्या आणि १९३९ साली त्यांचा विवाह अनिल चंद्र रॉय ह्यांच्याशी झाला. विवाह त्यांच्या सामाजिक कार्यात अजिबात अडथळा नाही झाला तर आता दोघेही पती-पत्नी आपल्या कार्यात अधिक जोमाने काम करू लागले.
१९४२ च्या चले जाव आंदोलनात दोघे रॉय पती पत्नी ह्यांनी हिरीरीने सहभाग घेतला आणि त्यांना कारावास भोगावा लागला. १९४६ साली त्यांची मुक्तता झाली. पण त्यांचे मासिक मात्र बंद करण्यात आले.
१९४७ साली विभाजनाच्या वेळी त्या गांधीजींना भेटल्या. सगळ्या निर्वासित हिंदूंसाठी त्यांनी अहोरात्र काम केले. इथून पुढे पण त्यांच्या कामाचा आलेख चढताच राहिला. त्यांनी महिलांसाठी सतत विशेष प्रयत्न करून काळाच्या मागणीनुसार आपले काम चालू ठेवले. सक्रिय राजकारणात भाग घेतला. १९६२ पर्यंत त्या सतत काम करीत राहिल्या, पुढे त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली.
प्रदीर्घ आजारानंतर त्यांनी जून १९७० मध्ये अनंतचा प्रवास केला. आपल्या ठाम विचारसरणीने समाजाचा फायदा करून देत अविरत समाजसेवेचे व्रत घेतलेल्या ह्या भारतमातेच्या विरंगनेला आम्हा भारतीयांकडून मांवनदना.
|| वंदे मातरम् ||
— सोनाली तेलंग.
०६/०७/२०२२.
संदर्भ :
१. विकिपीडिया
२. 17passion. com
Leave a Reply