नमामो वयं मातृभूः पुण्यभूस्त्वाम्
त्वया वर्धिताः संस्कृतास्त्वत्सुताः
अये वत्सले मग्डले हिन्दुभूमे
स्वयं जीवितान्यर्पयामस्त्वयि ||
हे मातृभूमी, हे पुण्यभूमी, आम्ही तुझ्या मुली ज्यांचे तू पालन-पोषण केले, संवर्धन केले तुला नमस्कार करतो. हे वत्सले, मंगले, हिंदुभूमे तुझ्यासाठी आम्ही आपले जीवन समर्पण करतो.
प्रार्थने मध्ये शक्ती असते हे आपण जाणतोच, त्याचे फळ अजूनच उच्च होते जेव्हा प्रार्थना सामूहिक केली जाते. राष्ट्र सेविका समितीची ही प्रार्थना आजही देशातील काना-कोपऱ्यातून सामूहिक पद्धतीने गायली जाते आणि प्रत्येक सेविकेच्या मनात अनन्य समर्पण भाव जागृत करते.
कर्तृत्व, मातृत्व आणि नेतृत्व ह्याचा त्रिवेणी संगम ज्यांच्या ठायी अनुभवायला मिळाला त्या भारतमातेच्या वीरांगना वंदनीय लक्ष्मीबाई केळकर अर्थात साऱ्या देशाच्या मावशी केळकर.
०६ जुलै १९०५ साली त्यांचा जन्म नागपूर येथे दाते कुटुंबात झाला. त्यांचे वडील भास्करराव दाते पुढारलेल्या विचारांचे होते, तसेच आई यशोदाबाई सुद्धा. दोघेही टिळकांचे भक्त होते. त्यांच्या घरात केसरी चे सामूहिक वाचन चाले. त्यांच्या आई दुपारच्या वेळी आजूबाजूच्या महिलांना एकत्रित करून केसरी चे वाचन,त्यावरील लेखांवर विचार मंथन करीत. कमलताईंवर संघटनात्मक रचनेचे संस्कार अगदी लहानपणीच झाले. इंग्रजी शाळेत रुजवला जाणारा विचार आणि घरात घडणाऱ्या गोष्टी हा विरोधाभास कमलताईंना सतत खटकत होता, त्यांनी शाळेला राम राम ठोकला.
१४ व्या वर्षी त्यांचा विवाह श्री पुरुषोत्तम केळकर ह्यांच्याशी झाला आणि त्या लक्ष्मीबाई पुरुषोत्तम केळकर झाल्या. केळकरांना त्यांच्या पहिल्या पत्नीपासून मुलं होती, त्यांची एक बहीण बाल विधवा होती, लक्ष्मीबाईंच्या प्रेमळ आणि मनमिळावू स्वभावामुळे एवढ्या लहान वयात त्यांनी सगळं घर आपलंसं केलं. सांसारिक बंधनात अडकल्या तरी मनातून सामाजिक विचार कधीच दूर झाले नाही. अवकाळी वैधव्य आलं आणि सगळ्यांची जवाबदारी लक्ष्मीबाईंवर आली. लक्ष्मीबाईंनी मुलांची, नणंदेची आणि शेतीची जवाबदारी घेतली आणि अतिशय उत्तमरीत्या पार पाडली. एकदा डॉ केशव हेडगेवार ह्यांचा प्रवास वर्ध्याला असतांना लक्ष्मीबाई त्यांना जाऊन भेटल्या आणि संघाबरोबर काम करण्याची आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवली. डॉक्टरांनी त्यांना सांगितले की हे शक्य नाही,पण महिला संघटन होऊ शकते, ते तुम्ही करावं.
“स्त्री आणि पुरुष हे धर्मरूपी गरुडाचे दोन पंख आहेत. त्यामुळे स्त्रीची उन्नती व्हायलाच हवी.पंख असमान असतील तर गरुड झेप कशी घेणार?” हे स्वामी विवेकानंदांचे विचार लक्ष्मीबाईंचे प्रेरणा स्थान बनले. डॉ च्या प्रत्यक्ष सल्ल्याने आणि विवेकानंदाच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी २५ ऑक्टोबर १९३६ साली राष्ट्र सेविका समितीची स्थापना केली. महिलांनी केलेले, महिलांचे संघटन, महिलांसाठी, ज्यातून समाज बांधणी, घरा-घरातून देशप्रेम, स्वातंत्र्य चळवळीची माहिती, असे सगळे साधणार होते. राष्ट्र निर्माण हे एक दिवसात शक्य नाही, त्यासाठी प्रत्येक घरात हा विचार पोहचणे आवश्यक आहे, आणि कुठलीही गोष्ट रुजविण्याचे काम एक स्त्री अतिशय उत्तम पद्धतीने करू शकते म्हणून महिलांचे संघटन.
“जवाबदारी आणि कर्तव्य ह्यांची गल्लत करू नये. स्त्री म्हणून कुटुंब, समाज, आणि राष्ट्र याबद्दल प्रत्येक स्त्रीने आपले कर्तव्य आनंदाने निभवावे.”
“व्यक्ती-व्यक्तीवर राजकीय व सामाजिक संस्कार करून तिला एक अनुशासित सूत्रबद्ध शक्तीचे अंग म्हणून सिद्ध करायचे आहे व अशा सर्व व्यक्तींमध्ये कर्तव्यभावना, परस्पर जिव्हाळा, व सहकार्य निर्माण करणे, तसेच स्त्री हीच राष्ट्राची आधारशक्ती आहे त्यामुळे तिच्या उन्नती आणि संघटनेतून हिंदुराष्ट्र उभे राहणार, म्हणून समिती.” लक्ष्मीबाईंची समिती मागची ही भूमिका फक्त भाषणात बोलण्यापुरती नव्हती तर स्वतःच्या वागण्या-बोलण्यातून आणि कार्यातून प्रत्यक्ष आयुष्यात आणि सामाजिक आयुष्यात त्यांनी सतत उत्तमरीत्या निभावली म्हणूनच त्या कदाचित सगळ्यांच्या ‘मावशी’ झाल्या.
१९४७ ऑगस्ट च्या दुसऱ्या आठवड्यात त्या स्वतः कराचीत गेल्या, जेव्हा हिंदूंची भर दिवसा कत्तल सुरू होती. कराची विमानतळावर ‘खून से लिया है पाकिस्तान, लढ के लेंगे हिंदुस्थान’ अशा घोषणा सुरू होत्या, तेव्हा केवळ आपल्या सेविकांना आधार देण्यासाठी त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. सगळ्या सेविकांना स्वतः जातीने भेटल्या, त्यांच्याशी बोलल्या, त्यांना धीर दिला कारण तिथल्या एका सेविकेने त्यांना पत्र पाठवून बोलवलं होते. काराचीतील हिंदू परिवारांना भारतात परत आणण्यासाठी त्यांनी भरपूर काम केले.
भारत पाकिस्तान, भारत-चायना युद्ध काळातसुद्धा मावशींच्या सेविका सगळ्यांच्या मदतीला धावून येत होत्या.
स्त्री सुलभ गुणांचा वापर राष्ट्र निर्माणासाठी करणाऱ्या, स्त्रियांच्या संघटनेतून देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला घरा-घरात पोहचवणाऱ्या, स्त्री म्हणजे केवळ एक कुटुंब नाही तर राष्ट्र निर्माण करायची ताकद तिच्या ठायी आहे हे स्वतःच्या कार्यतून आदर्श ठेवणाऱ्या या भारतमातेच्या वीरांगनेला आमचे शत शत नमन.
|| वंदे मातरम् ||
— सोनाली तेलंग.
०७/०७/२०२२.
संदर्भ :
१. कर्मयोगिनी वंदनीय मौसीजी
२. दिपज्योति नमोस्तुते : सुशीला महाजन
३. स्त्रीशक्ती आणि स्वातंत्र्यलढा : डॉ अर्चना कुळकर्णी, स्मिता कुळकर्णी
४. http://xn--h4b.indusscrolls.com/
Leave a Reply