विकल्या गेलेली गुलाम ते बेगम हजरत महल ते स्वातंत्र्यता सेनानी एवढा मोठा प्रवास ह्यांनी आपल्या एकोणसाठ वर्षाच्या आयुष्यात पार केला. त्यांच्या मनःस्थितीचा अंदाज सुद्धा घेता येत नाही, आज हे सगळं लिहितांना. काय आयुष्य जगल्या असतील त्या स्त्रिया, आणि तरीही असं म्हणावसं वाटतं की त्याच स्त्रिया ‘आयुष्य जगल्या’, आम्ही अजूनही त्याचे अर्थ शोधतो आहे. भारतमातेच्या वीरांगना – बेगम हजरत महल.
१८२० साली अवध प्रांतातील फैजाबाद च्या एका अतिशय हालाखीची परिस्थिती असलेल्या घरात ह्यांचा जन्म झाला. त्यांचे माहेरचे नाव मूहम्मदी खातून असे होते. दोन वेळच्या खाण्याची भ्रांत असलेल्या घरात, शिक्षण, अंगाला चांगला कपडा, डोक्यावर सुखाचे छप्पर ह्या तर परिकल्पना झाल्यात. शेवटी काळाला जे मान्य असते तेच घडते, त्यांच्या आई-वडीलांनी त्यांना राजघराण्यात गणिका म्हणून विकले. इथे त्यांना ‘महक परी’ ह्या नावाने बोलावले जाऊ लागले. नाच-गाणे, इतर कामे ह्याला जगणे म्हणणे सुरू होते. त्यांच्या सौंदर्यावर भाळून त्यांना अवध चे राजा वाजीद अली शाहा ह्यांनी आपली उपपत्नी म्हणून स्वीकार केले. त्यांना एक पुत्ररत्न झाले आणि बेगम हजरत महल ह्यांचा जन्म झाला.
आता ब्रिटिश राज पूर्ण भारत भर पसरले होते. त्यांनी अवधचे राजा वाजीद अली शाहा ह्यांना अटक करून कलकत्त्याला पाठविले. अजून ही युवराज ब्रिजीस कादर अल्पवयीन होते, त्यामुळे त्यांना गादीवर बसवून बेगम हजरत महल ह्यांनी राज्यकारभाराची सूत्र आपल्या हातात घेतली. इंग्रजी हुकूमत आता अवध काबीज करायच्या तयारीत होती. बेगम अतिशय हुशार रणनीतिकार होत्या. नाना साहेबांना बरोबर घेऊन राणीने इंग्रजी हुकुमातीशी दोन हात करायची तयारी सुरू केली. महिला तुकडीचे गठन केले ज्यात ‘उदा देवी’ सारख्या लढवय्या होत्या.
१८५७ चा स्वातंत्र्य संग्राम पुकारले गेले, अवध मध्ये बेगम हजरत महल आणि त्यांच्या सैन्याने इंग्रजी सैन्यावर जोरदार हल्ला बोल केला, पहिल्या हमल्यात त्यांना माघार घ्यावी लागली, अवध मधील गोंडा, फैजाबाद, सलोन, सुल्तापुर, सितापुर, बहराईच प्रांत इंग्रजमुक्त झालेत. बेगम हजरत महल च्या कुशल नेतृत्वाने प्रभावित होऊन इतर राज्य पण त्यांच्या बरोबरीने लढले. बेगम हजरत महल स्वतः हत्तीवरून या युद्धात आपल्या सैन्याचे नेतृत्व करत होत्या. ही हार इंग्रज कसे मान्य करतील?, जास्त फौजा घेऊन इंग्रज परत आले, ह्यावेळी बेगमच्या फौजा कमी पडल्या. अवध इंग्रजांनी काबीज केले पण बेगम निसटल्या कारण त्यांना इंग्रजांचे गुलाम होणे मान्य नव्हते. जंगलात आपली वस्ती ठेवून, त्या गावा-गावातून प्रवास करत राहिल्या आणि स्वातंत्र्याची ज्योत जन-मानसात पेटवत राहिल्या. काळाला त्यांचे हे प्रयत्न पण मान्य नव्हते, इंग्रजांचा ससेमिरा टाळण्यासाठी त्यांनी शरणागती न पत्करता नेपाळ ला कूच केले. त्या तिथेच राहिल्यात आणि १८७९ साली शेवटचा श्वास घेतला. काठमांडू च्या जामा मस्जिदीत त्यांना दफन केले गेले.
इंग्रजांनी जातीयवादाचे धोरण वापरून भारताला काबीज केले हा आरोप करणाऱ्या बेगम हजरत महल ह्यांना माझी मानवंदना.
||वंदे मातरम् ||
— सोनाली तेलंग.
०८/०७/२०२२
संदर्भ :
http://xn--e4b.navbharattimes.indiatimes.com/
http://xn--f4b.inuth.com/
http://xn--g4b.wikipedia.com/
४. indianculture.gov.in
Leave a Reply