सधन परिवारात जन्म नंतर तितक्याच तोडीच्या परिवारात लग्न, १८९३ साली जन्माला आलेल्या एका स्त्रीचा विचार केला तर आयुष्य फार सुंदर आहे, साधं आहे,सोप्प आहे. पण ह्या सगळ्यांच्या पलीकडे आयुष्य आहे, गुलामगिरीत जगणे अन्याय आहे, समाजाचे आपण देणे लागतो, त्याच्या साठी काम करणं आपलं कर्तव्य आहे, आपल्या देशाचा स्वाभिमान प्रत्येक नागरिकाने बाळगला पाहिजे हाच विचार सर्वोतोपरी आहे, असं मानणाऱ्या आहेत आपल्या भारतमातेच्या वीरांगना जानकीदेवी बजाज.
१८९३ साली मध्यप्रदेश येथे एका सधन मारवाडी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. माहेरी ‘लक्ष्मी पाणी भरत होती’ आणि मानाचीही श्रीमंती होती. त्यांच्या घराचे दार गरजूंसाठी सतत उघडे असत. श्रीमंती चा असा थाट असूनही असे म्हंटले जाते की त्यांची आई मैनादेवी ह्या साधपणाचे मूर्तिमंत उदाहरण होत्या.
अश्या जानकीदेवीचे लग्न वयाच्या आठव्या वर्षी श्री जमनालाल बजाज ह्यांच्याशी झाले. सासर सुद्धा ऐश्वर्य संपन्न मिळाले त्याचबरोबर मानाची श्रीमंती सुद्धा होतीच. जानकीदेवी मध्यप्रदेशातून विदर्भातील वर्धा येथे आल्या. बजाज परिवाराचे आत्मिक गुरू विनोबा भावे होते, त्याच प्रमाणे श्री जमनालाल बजाज स्वतः गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होते. जानकीदेवी आपल्या पतीच्या पावलावर पाऊल टाकून काम करू लागल्या. सुरवात आपल्या सोन्याच्या आभूषणांच्या दानाने केली. मग स्वदेशीचा प्रचार सुरू झाला आणि विदेशी वस्तूंचा त्याग. विदेशी वस्तूंच्या होळीसाठी जानकी देवींनी आपले व घरातले सगळे विदेशी कपडे टाकून दिले, आणि स्वतः सूत कातून खादी चा वापर, प्रचार आणि प्रसार सुरू केला.
हरिजन वस्त्यांमधून काम, त्यांना समान हक्क, मंदिरात प्रवेश, महिलांचे शिक्षण, परदा प्रथा बंद करणे, गो सेवा इत्यादी सगळ्या कामात जानकीदेवी पुढे असत. १९४२ च्या चलेजाव आंदोलनात सुद्धा त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. त्यासाठी त्यांना कारावास सुद्धा भोगावा लागला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर सुद्धा त्यांच्या राहणीमानात काहीच बदल झाला नाही. त्या तितक्याच साधे आयुष्य जगल्या. विनोबा भावेंच्या ‘भूदान’ चळवळीत सुद्धा त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. ग्राम सेवा ह्या प्रकल्पात सुद्धा त्या पूर्ण हिरीरीने काम करत राहिल्या.
१९५६ साली भारत सरकारने त्यांना पद्म विभूषण ह्या भारतीय सन्मानाने सन्मानित केले. १९७९ साली त्यांनी ह्या जगाचा निरोप घेतला. मनातून देशसेवा, समाजकल्याण, देशप्रेम असेल तर तुम्ही किती काम करू शकता हे जनाकीदेवींचा जीवनपट उलगडून पाहता दिसून येतं.
अश्या सधन संपन्न घरातल्या असूनही फक्त बोलण्यासाठी किव्हा दिखाव्यासाठी नाहीतर त्यांनी गांधीजींचा मंत्र ‘साधी राहणी उच्च विचार’ हे आपले जीवन आदर्श मानले आणि तश्याच आजीवन जगल्या.
अश्या ह्या भारतमातेच्या वीरांगनेला आमचे कोटी कोटी नमन.
|| वंदे मातरम् ||
— सोनाली तेलंग.
०९/०७/२०२२.
संदर्भ :
http://xn--e4b.jamnalalbajajfoundation.org/
http://xn--f4b.bharatdiscovery.org/
http://xn--g4b.inuth.com/
Leave a Reply