स्वतःच्या विचारांची दिशा कळणे, त्यावर निर्णय घेता येणे, आणि घेतलेला निर्णय निभावून नेणे हे एका नेत्याच्या अंगी असावे असे गुण आहेत. ह्या गुणांचा वापर समाजाच्या कल्याणासाठी करावा हे मात्र त्यांच्यावरच्या संस्कारांचा भाग आहे. भारतमातेच्या वीरांगना दुर्गाबाई भागवत ह्या असेच एक मूर्तिमंत उदाहरण आहेत.
१५ जुलै १९०९ साली त्यांचा जन्म राजमुन्द्री, आंध्रप्रदेश येथे एक सामान्य ब्राम्हण कुटुंबात झाला. घरातले वातावरण साधारण त्या काळाला साजेसे होते. दुर्गाबाईंचे लग्न वयाच्या ८ व्या वर्षी एका जमीनदार घराण्यात श्री सुब्बा राव ह्यांची लावून देण्यात आले. दुर्गाबाईंचे शिक्षण सुरू झाले, वयाच्या १२ व्या वर्षी त्यांनी शाळेला राम राम ठोकला कारण त्यांना इंग्रजीतुन शिक्षण मान्य नव्हते. विचारांची स्पष्टता ह्यालाच म्हणतात. पुढे जाऊन त्यांनीच एक मुलींची शाळा राजमुन्द्री येथे सुरू केली जिथे शिक्षण हिंदी भाषेतून दिले जाऊ लागले. पुढे तरुण वयात त्यांना लग्नाचा खरा अर्थ कळला आणि त्यांनी सुब्बा राव ह्यांना स्पष्ट सांगितले की नवरा-बायको म्हणून आपली जोडी योग्य राहणार नाही, मी नांदायला येऊ शकत नाही. त्यांच्या या निर्णयात त्यांचे वडील, मोठा भाऊ ह्या सगळ्यांनी केवळ संमतीच नाही दर्शविली तर त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. दुर्गाबाईंनी समाजसेवेत स्वतःला झोकून दिले.
१९२३ साली काँग्रेस चे अधिवेशन त्यांच्या गावी झाले. त्यावेळी दुर्गाबाई तिथे कांग्रेस कार्यकर्त्या म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या कडे खादी प्रदर्शनात कोणीही विना तिकीट प्रवेश करणार नाही ही जवाबदारी दिली होती. त्यांनी अगदी नेहरूंना सुद्धा तिकीट दाखवे पर्यंत सोडले नाही. त्या महात्मा गांधींच्या अनुयायी होत्या. असहकार आंदोलन,मिठाची चळवळ अश्या सगळ्यात सक्रिय सहभाग नोंदवला, परिणामी १९३० ते १९३३ च्या दरम्यान त्यांना ३ वेळेस कारावास भोगावा लागला. कारावासात सुद्धा त्या इतर महिलांशी संवाद साधणे, त्यांच्या शैक्षणिक भूक जगविणे, त्यांना सामाजिक जाणिव करून देणे अशी सगळी कामे करत राहिल्या.
पुढे कारावसातून सुटून आल्यावर त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. BA, MA आणि नंतर कायदे शिक्षण पूर्ण करून त्या स्वतः वकिली व्यवसाय करू लागल्या.
दरम्यान च्या काळात त्यांचा विवाह तत्कालीन अर्थ मंत्री आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर श्री CD देशमुख ह्यांच्याशी झाला. दोघेही सम विचारीन आणि समाजसेवेला बांधून घेतलेले आयुष्य छान जगले. जरी त्यांचा पहिला विवाह सफल नाही झाला, तरी श्री सुब्बा राव ह्यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या पत्नीचा संभाळ दुर्गाबाईंनी आनंदाने केला, एवढेच नाही तर त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण पण दिले.
स्वातंत्र्योत्तर काळात त्याचे समाजसेवेचे व्रत अव्याहत सुरू होते. त्या भारताच्या संविधान संघटनेच्या एक घटक होत्या. त्याचबरोबर प्लॅनिंग कंमिशन च्या सुद्धा घटक होत्या. त्याचबरोबर अंध समाधान संघटनेच्या अध्यक्षा राहिल्या. त्यांच्या आणि तत्कालीन इतर विचारवंतांच्या विनंती वरून फॅमिली कोर्ट ऍक्ट १९८४ मध्ये सुरू करणयात आले जेणेकरून स्त्रियांना योग्य व वेळेत न्याय मिळेल. त्याचबरोबर आंध्र महिला सभा, सामाजिक विकास परिषद ह्यां संघटना त्यांच्या विचारातून उभ्या झाल्यात. त्यांच्या कामाचा आवका बघता त्यांना पद्म विभूषण ने सन्मानित करण्यात आले.
९ मे १९८१ वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पूर्ण जीवनच समाजाच्या कल्याणासाठी वाहून देणाऱ्या भारतमातेच्या ह्या वीरांगनेला माझी शब्द सुमानांजली.
|| वंदे मातरम् ||
— सोनाली तेलंग.
१०/०७/२०२२
संदर्भ :
http://xn--e4b.winentrance.com/
http://xn--f4b.amritmahotsav.com/
३.wikipedia
Leave a Reply