१९८८ आणि २००१ साली असे दोनदा भारत सरकारने राणी अवंतीबाईंच्या सन्मानार्थ डाक तिकीट काढले. जबलपूर मधील एका धरणाचे नाव त्यांच्या सन्मानार्थ ठेवले गेले आहे. तरीही अवंतीबाई लोधी तथा राणी अवंतीबाई कुठे स्मरणात आहेत? त्यांच्या बद्दलची माहिती मध्यप्रेदेशातल्या लोकगीतातून जास्त ऐकायला मिळते. लोककथेतून आणि लोक गीतातून ज्या गोष्टी इथवर चालत आल्या त्यांना आता दस्तावेजात घेऊन येणे गरजेचे आहे, नाहीतर असे सगळे वीर आणि वीरांगना इतिहासाच्या पोटात गडप होतील.
१६ ऑगस्ट १८३१ रोजी अवंतीबाईंचा जन्म लोधी, राजपूत परिवारात झाला. लहान वयातच त्यांचा विवाह रामगढ चे राजा लक्ष्मण सिंघ चे सुपुत्र श्री विक्रमाजीत सिंघ ह्यांच्याशी झाला. १८१७ ते १८५१ लक्ष्मण सिंघ ह्यांनी राजकारभार पहिला. त्यांच्या मृत्यू पश्चात विक्रमाजीतांकडे राजकारभार आला. पण विक्रमाजीत मूलतः संत वृत्तीचे होते, त्यामुळे राणी अवंतीबाई लोधी आपल्या राज्याचा कारभार अतिशय कुशलतापूर्वक पाहत होत्या. त्यांची दोन्ही अपत्ये श्री अमन सिंघ आणि श्री शेर सिंघ दोघेही अजून लहानच होते. इतक्यात राजा विक्रमाजीत ह्यांचा मृत्यू झाला. इंग्रजांनी आपले हातपाय संपूर्ण भारतभर पसरवायला सुरवात केली होतीच, त्यांच्या नियमानुसार ज्या राज्यात राज्यकर्ते वयाने लहान आहेत, ते राज्य इंग्रजांच्या अधीन राहणार. रामगढ ची परिस्थिती पण वेगळी नव्हती. इंग्रजांनी रामगढ कडे कूच केले.
रामगढच्या लोकांचा विश्वास राणी अवंती बाईंनी आपल्या कुशल नेतृत्वामुळे जिंकला होता. राणीने आपल्या प्रजाजनांनमध्ये स्वातंत्र्याचे बीज पेरले होते. इंग्रजी राजवटी विरुद्ध काम सुरू केले होते, शेतसारा इंग्रजांना न देण्याचा हुकूम काढला होता. प्रजा आणि आसपासचे छोटे छोटे राजे देखील राणी च्या नेतृत्वा खाली इंग्रजांना परतवून लावायला तयार झाले होते. १८५७ चे समर शिंग फुंकले गेले होते. आता हे कुठल्याही एकट्या-दुकट्या राज्यांच्या हाताचे राहिले नाही तर आसपासचे सगळे राजे एकत्र येणे गरजेचे होते. राणीने आसपासच्या क्षेत्रातील राजे, जमीनदार, मालगुजार अश्या सगळ्यांचे गुप्त क्षेत्रीय संमेलन आयोजित केले. एकत्र येऊ तरच स्वराज्य टिकून राहिल हे राणीने ओळखले होते. या गुप्त क्षेत्रीय संमेलनासाठी निमंत्रण देतांना राणीने एक पत्र आणि दोन काळ्या बांगड्या सगळ्यांना प्रसादाच्या रूपाने पाठविल्या आणि पत्रात लिहिले की, ‘इंग्रजांविरुद्ध संघर्षाला तयार व्हा नाहीतर बांगड्या घाला’. पत्र सौहार्दाचे आणि एकजुटतेचे प्रतीक होते तर बांगडी हे पुरुषार्थ जागरूत करायचे साधन. परिणाम स्पष्ट होता, सगळे एकत्र आले.
जसे देशातील काही भागात क्रांतीला प्रारंभ झाला तसाच तो मध्यप्रदेशात पण झाला. अवंती बाईंनी खैरी, मंडला येथे इंग्रजी सैन्याशी दोन हात केले. इंग्रजांनी राणीला फार महत्व दिले नाही त्यामुळे व्हायचे तेच झाले आणि राणी अवंती बाईंनी मंडला इंग्रजी प्रशासनातून मुक्त केले. पण नाग डिवचला गेला होता. आता इंग्रजांनी वाढीव सैन्य घेऊन परत एकदा रामगढ कडे कूच केले, ह्यावेळी राणीचे सैन्य कमजोर पडले. मोडेन पण वाकणार नाही ह्या म्हणीला सार्थ करत राणीने इंग्रजांपुढे शरणागती पत्करण्याचे नाकारले, आणि युद्धात स्वतःच्या पोटात तलवार खुपसून मृत्यू ला जवळ केले. २० मार्च १८५८ साली ह्या वीरांगनेने राणी दुर्गावती ने सांगितलेले वचन “हमारी दुर्गावती ने जीते जी वैरी के हाथ से अंग ना छुये जाने का प्रण लिया था. याद रहे”. पूर्ण केले.
स्वतःच्या राज्यासाठी, स्वतःच्या आणि आपल्या देशाच्या स्वतंत्रतेसाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणाऱ्या राणी अवंती बाई लोधी ह्यांना आमचा मानाचा मुजरा.
|| वंदे मातरम् ||
— सोनाली तेलंग.
११/०७/२०२२.
संदर्भ :
http://xn--e4b.amritmahotsav.com/
२. Wikipedia
http://xn--g4b.feminisminindia.com/
Leave a Reply