वयाच्या १३ व्या वर्षी आपण काय केलं? हा प्रश्न आजची गाथा लिहितांना खूप टोचला. एखादी व्यक्ती वयाच्या १३ व्या वर्षी शाळा सुरू करू शकते की, स्त्री – पुरुष समानता ह्यावर विचार करू शकते, धर्मांतरण ह्या विषयावर स्पष्ट वक्त्यव्य देऊ शकते. ज्वलंत विचारशक्ती आणि निडर स्वभावाचा परिचय देणाऱ्या भारतमातेच्या वीरांगना चंद्रप्रभा शईकियानी
१६ मार्च १९०१ साली आसाममधील कमरूप शहरातील डोईसिंगरी गावाचे सरपंच रतीराम मजुमदार ह्यांच्याकडे चंद्रप्रिया मजुमदार तथा चंद्रप्रभा शईकीयांनी ह्यांचा जन्म झाला. वडील रतीराम आणि आई गंगाप्रिया स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते, दोन्ही मुलींनी शाळेत जाऊन शैक्षणिक धडे गिरवावे अस त्यांना वाटलं आणि चंद्रप्रभा व त्यांची बहीण राजनीप्रभा (ज्या पुढे जाऊन आसाम मधील पहिल्या महिला डॉ झाल्या), चिखलातून वाट तुडवत, घरापासून काही किलोमीटर दूर मुलांच्या शाळेत शिक्षणासाठी जाऊ लागल्या. त्या शाळेत मुली नव्हत्याच, स्त्री आणि पुरुषांबद्दल समाजात समानता नाही, ह्याची पहिली ठिणगी चंद्रप्रभा ह्यांच्या मनात तेव्हाच पडली. वयाच्या १३ वय वर्षी आपल्या घराजवळ त्यांनी एका मोडक्या छताखाली मुलींसाठी शाळा सुरू केली. जिथे त्या आणि त्यांची बहिणी शाळेत शिकलेले मुलींना शिकवत. तेव्हाचे शाळा निरीक्षक श्री नीलकंठ बरुआ ह्यांचे चंद्रप्रभा देवींच्या ह्या धडपडीकडे लक्ष गेले आणि त्यांनी दोघी बहिणींना पुढल्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळवून दिली.
शिष्यवृत्ती मिळवून दोघी बहिणी नागाव मिशनरी शाळेत पुढील शिक्षणासाठी आल्या. हिंदू आणि ख्रिश्चन मुलांमधील वागणुकीतला फरक सुद्धा त्यांना त्रासदायक होता. हिंदूंना वसतिगृहात राहण्यास परवानगी मिळत नसे, त्याविरुद्ध सुद्धा चंद्रप्रभा देवींनी आवाज उठवला, आणि हिंदूंना वसतिगृहात प्रवेश मिळवून दिला. त्याचबरोबर ख्रिश्चनांनी चालवलेले धर्मांतरण वर सुद्धा त्यांनी आपली ठाम मत ठेवले आणि त्याविरुद्ध वेळोवेळी आवाज उठवला. वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी विद्यार्थ्यां समोर ‘अफू’ च्या व्यसनाधीनतेवर भाषण करून सभा काबीज केली.
इतक्या सगळ्या अन्याया विरुद्ध काम करणाऱ्या चंद्रप्रभादेवी आपल्या भारतमातेला पारतंत्र्यात कसे बघू शकणार? असहकार चळवळ,मिठाचा सत्याग्रह अश्या सगळ्यात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. त्यासाठी कारावास सुद्धा भोगला. महिलांनी स्वातंत्र्य संग्रामात सक्रिय सहभाग नोंदवावा ह्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. त्याच्याच फलस्वरूप ‘आसाम प्रादेशिक महिला समिती’ १९२६ मध्ये स्थापन केली. ज्यामार्फत महिलांच्या प्रश्नांवर काम करणे, त्यांच्यासाठी शिक्षण आणि व्यवसाय उपलब्ध करणे, बाल विवाह रोकणे ह्या सगळ्या गोष्टींवर काम सुरू केले. त्यांनी हातमाग आणि हस्तकला ह्याचे महत्व महिलांना पटवून दिले व त्यावर काम करायला प्रवृत्त केले.
समाजसेवेत आपला सक्रिय सहभाग नोंदवण्या बरोबरच त्यांचे सृजनशील मन कोमेजू दिले नाही, त्यांनी हातात लेखणी धरली आणि त्याच्या जोरावर महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडली. त्यांच्या मृत्यच्या काही महिने पहिले त्यांना पद्मश्री ने सन्मानित करण्यात आले. १३ मार्च १९७२ रोजी वयाच्या ७१ व्या वर्षी चंद्रप्रभा शईकीयानी ह्यांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली. अन्यायाविरुद्ध मग तो स्त्री-पुरुष समानतेचा असो, स्त्री शिक्षणाचा असो, बाल विवाह असो, धर्मांतरण असो किव्हा स्वातंत्र्य संग्राम असो, आपल्या लिखाणातून, आपल्या कार्यातून त्याविरुद्ध आवाज उठवणारऱ्या आणि बदल घडवून आणणाऱ्या ह्या भारतमातेच्या वीरांगनेला माझे शत शत नमन.
|| वंदे मातरम् ||
— सोनाली तेलंग.
१२/०७/२०२२.
संदर्भ :
१.indianculture.gov.in
२.amritmahotsav.nic.in
http://xn--g4b.inuth.com/
http://xn--h4b.wikipedia.com/
Leave a Reply