Grand old lady……असा खिताब जेव्हा जनतेकडून स्वेच्छेने बहाल केला जातो, तेव्हा त्याचा अर्थ त्या व्यक्तीचे कर्तृत्व उत्तुंग आहे. श्रीमती अरुणा आसफ अली. फार मोठ्या वर्तुळात न राहता ही मोठे कर्तृत्व केले जाऊ शकते ह्याचे मूर्तिमंत उदाहरण. छोट्या छोट्या कृतीतून आपण मोठे कार्य उभे करू शकतो हे अरुणा ने त्यांच्या कृतीतून दाखवून दिले.
१६ जुलै १९०९ साली कालका, पंजाब येथे एका बंगाली परिवारात त्यांचा जन्म झाला. सधन, सुशिक्षित घरातील एक मुलगी. त्यांचे वडील सफल व्यवसायिक, एक काका प्रोफेसर आणि एक काका अतिशय सुरवातीच्या काळातले सिनेमा दिगदर्शक. आपल्या शिक्षणानंतर सुरवातीला काही काळ त्यांनी कलकत्त्याच्या गोखले मेमोरियल शाळेत शिक्षिका म्हणून काम केलं. एका स्त्रीच आयुष्य म्हणून बघितलं तर किती सरळ, साधं, सोपं आयुष्य वाटतंय ना. सगळं कसं अगदी आखीव-रेखीव. पण मुळातच आयुष्याकडून काहीतरी वेगळं अपेक्षित असतं तेव्हा हे आखीव-रेखीव आयुष्यच जास्त कठीण वाटू लागतं.
१९२८ साली अलाहबादच्या एका कार्यक्रमात त्यांची भेट आसफ अली तेव्हाचे कांग्रेस चे नेते, ह्यांच्याशी होते आणि त्या लग्न बंधनात अडकायचे पक्के करतात. १९२८ साली लग्न होतं आणि माहेर त्यांच्यासाठी कायमच तुटतं. वडीलांना आधीच देवाज्ञा झाली होती आणि इतर काकांनी ह्या विवाहाला मान्यता दिली नाही.
एका शांत चाललेल्या आयुष्याला कलाटणी मिळते. लग्नानंतर अरुणा काँग्रेस च्या कार्यकर्ता होतात आणि त्यांचा सक्रिय सहभाग महात्मा गांधींच्या दांडी यात्रेत नोंदवतात. १९३० साली ब्रिटिश सरकारने सगळ्यांना अटक केली. १९३१ साली गांधी-इर्विन करारानुसार सगळ्या राजनैतिक कैद्यांना सोडण्यात आले, पण अरुणा ला नाही कारण त्या भटक्या (vagrant) पद्धतीचे जीवन जगतात हे न पटणारे कारण काढून. कारागृहातील इतर महिलांनी अरुणा ला सोडेपर्यत आम्ही पण बाहेर जाणार नाही असे म्हणून कारागृहातून बाहेर येण्यास नकार दिला. अखेर महात्मा गांधींच्या सांगण्यावरून अरुणाला जेल मधून सोडण्यात आले.
१९४२ भारत छोडो आंदोलनाने सगळ्या देशभरात जोर धरला होता. मुंबईला ला काँग्रेस चे अधिवेशन झाले. त्यात हा प्रस्ताव सर्वसंमतीने पुढे नेण्यात आला. अर्थात ब्रिटिश सरकार खवळले आणि सगळ्या बड्या नेत्यांची पाठवणी कारागृहात झाली. ८ ऑगस्ट ला सगळ्या नेत्याची रवानगी कारागृहात झाली आणि अरुणाने ९ तारखेचे सत्र स्वतः अध्यक्षस्थानी राहून पूर्ण केलं आणि मुंबईच्या गोवलिया टॅंक मैदानावर काँगेसचा झेंडा फडकवला. ही एका अर्थाने ‘भारत छोडो आंदोलनाची’ नांदी ठरली. प्रत्यक्ष नेतृत्वाचा आभाव असुनसुद्धा भारत छोडो आंदोलनाने सगळ्या भारत भर पेट घेतला.
अरुणा च्या नावाने अटक वॉरंट निघाला, पण त्या तात्काळ भूमिगत झाल्या. त्यांची सगळी स्थावर मालमत्ता विकण्यात आली. या काळात काँग्रेस नेते श्री राम मनोहर लोहिया ह्यांच्या समवेत त्यांनी कांग्रेस चे पत्रक ‘इन्कलाब’ चे संपादनाचे काम केले. १९४४ सालच्या आपल्या एका लेखातून त्यांनी भारतातल्या सर्व तरुणांना स्वातंत्र्य क्रांती मध्ये सक्रिय सहभाग घेण्यास प्रोत्साहित केले. हिंसक क्रांती किव्हा अहिंसक क्रांती ह्या वादात न पडता आता कृतीची वेळ आली आहे असं सणसणीत वक्तव्य करून युवकांना जागृत केलं. तेव्हाच्या ब्रिटिश सरकार ने त्यांच्याबद्दल बातमी देणाऱ्याला ५००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले. ह्या काळात त्यांची तब्येत खालावली. तरीही डॉ जोशी ह्यांच्या दवाखान्यात भूमिगत राहूनच इलाज केला गेला. गांधीजींनी त्यांना स्वतःच्या हाताने एक पत्र लिहून पाठविले, स्वतःला सरकारला समर्पण करण्यास सांगितले, आणि मिळणारी रक्कम हरिजन समाजाच्या भल्यासाठी वापरण्यास सांगितले. अरुणा आसफ अली ह्यांनी समर्पण केले खरे, पण जेव्हा १९४६ मध्ये त्यांच्या नावाचा वॉरेट मागे घेण्यात आला. अरुणा आसफ अली ह्यांना महात्मा गांधी ह्यांच्या टीकेचे अस्त्र परत एकदा सहन करावे लागले जेव्हा त्यांनी royal Indian naval mutiny ला समर्थन केले.
खडतर प्रवासानंतरही आणि स्वातंत्र्या नंतरही अरुणा आसफ अली ह्यांनी देशाची सेवा करण्याचे काम सोडले नाही. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांना देवाज्ञा झाली. समाजसेवेसाठी सदैव तत्पर, भारतीय सर्वश्रेष्ठ नागरी पुरस्कार भारतरत्न (१९९७) च्या मानकरी, आंतरराष्ट्रीय लिनन शांती पुरस्कार (१९६४) च्या मानकरी भारतमातेच्या वीरांगानेला माझे नमन.
— सोनाली तेलंग.
संदर्भ: Great Women of Modern India: Aruna Asat Ali: Deep&Deep publication, 1993, En-academic.co, wikipedia.com
०७/०६/२०२२.
Leave a Reply