दक्षिण भारताची झाशीची राणी असा खिताब खुद्द महात्मा गांधींनी ज्यांना दिला त्या अंजलाई अम्मल. ह्या सगळ्या मंडळींना कधीच आपल्या भविष्याची चिंता नाही जाणवली, जे होतं हातात ते सगळं समाजासाठी देतांना एका क्षणाचाही विचार दिसत नाही ह्यांच्या कृतीतून, मुक्त हस्ते त्यांनी सगळं देशसेवेसाठी अर्पण केले. कमाल….असंच म्हणावसं वाटतं जेव्हा जेव्हा अश्या गाथा वाचायला मिळतात.
१८९० साली मुदुनगर, कुदलूर तामिळनाडूतल्या एका मध्यम वर्गीय घरात अंजलाई अम्मल ह्यांचा जन्म झाला. साध्याच घरात अगदी सध्या पद्धतीने जसे चार-चौघांचे असते तसेच त्यांचे बालपण गेले. त्यांना ५ वी पर्यंत शिक्षण मिळाले. तद्नंतर समाज रूढींना अनुसरून बाल वयातच त्याचा विवाह श्री मुरुगप्पा ह्यांच्याशी झाला. ते एका पत्रिकेसाठी प्रतिनिधी म्हणून काम करत होते. म्हणजे सासरी सुद्धा फार काही असामान्य किव्हा भरभराटीची परिस्थिती नव्हती. फक्त वृत्ती मात्र नक्कीच फार मोठी होती.
१९२१ साली असहकार आंदोलना पासून त्यांचा स्वातंत्र्य संग्रामातील प्रवास सुरु झाला. दक्षिण भारतातल्या त्या पहिल्या महिला सेनानी ठरल्या. फक्त स्वतः भाग घेऊनच नव्हे तर आपली पारिवारिक भूमी, घर असं सगळं त्यांनी विकून टाकले आणि स्वातंत्र्य लढ्यासाठी मोठी राशी दिली. हे करतांना आपल्या भविष्याच काय? हा प्रश्न या माऊलीला पडला नाही. जे माझे ते देशासाठी अर्पण असाच त्याचा विचार होता. १९२७ साली नीलन ची मूर्ती हटविण्या विरुद्ध त्यांनी लढ्यात सहभाग घेतला, त्यासाठी त्यांना आणि त्यांच्या नऊ वर्षांची मुलगी अम्माकानु ला कारावास भोगावा लागला. त्यांनी आपल्या मुलीला करवासातच वाढवायला सुरवात केली, तिच्याकडून देशभक्तीचा पाठ गिरवून घेतला. गांधीजी ह्या दोन्ही स्वातंत्र्य सेनानींना भेटायला कारावासात गेले. अम्माकानू ला ते आपल्या बरोबर सेवाश्रम ला घेऊन गेले. तिचे नाव लीलावथी असे ठेवले.
मिठाचा सत्याग्रह, चले जाव आंदोलन अश्या सगळ्यात अंजलाई अम्मल सक्रिय सहभाग नोंदवला. त्यावेळी त्यांना भरपूर शारीरिक इजा सुद्धा झाली पण त्या मागे हटल्या नाहीत. १९३१ च्या अखिल भारतीय महिला कांग्रेसच्या त्या अध्यक्षा होत्या. १९३१ साली परत एकदा एका सत्याग्रहात भाग घेतला आणि त्यांना कारावास भोगावा लागला. ह्यावेळी त्या गर्भवती होत्या. प्रस्तुतीच्या वेळी त्यांना फक्त १५ दिवसांसाठी घरी पाठविण्यात आले आणि लागलीच कारावासात पाठवले गेले. आपली सश्रम कारावासाची शिक्षा पूर्ण करूनच त्यांना सोडण्यात आले.
पुढे काही दिवसांनी गांधीजींचा प्रवास त्या भागात होता, अंजलाई अम्मल ह्यांना गांधीजींना भेटण्यापासून इंग्रजांनी अटकाव केला. पण अम्मल बधल्या नाहीत, त्या घोडगाडीतून बुरखा घालून गेल्या आणि गांधींना भेटल्या. त्यांच्या या साहसी कृत्यावरूनच गांधीजींनी त्यांना ‘दक्षिणेची झाशी ची राणी’ अशा उपाधीने सन्मानित केले.
स्वातंत्र्य मिळाल्यावर सुद्धा त्यांनी आपली देशसेवा सोडली नाही. ती त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाली होती. १९४७ नंतर त्या तीनवेळा तमिळनाडू विधानसभेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या. अश्या ह्या थोर देशप्रेमी अंजलाई अम्मल ह्यांना २० जानेवारी १९६१ रोजी वयाच्या ७१ व्या वर्षी देवाज्ञा झाली.
देशासाठी आपल्या स्व चा विचार त्यागून तन, मन आणि धनाने आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या भारतमातेच्या ह्या वीरांगनेला माझी शब्द सुमानांजली.
|| वंदे मातरम् ||
— सोनाली तेलंग.
१३/०७/२०२२.
संदर्भ:
http://xn--e4b.bharatdiscovery.org/
२.agnivahnikikutpally
Leave a Reply