भारतमातेच्या वीरांगना ह्या गाथा लिहायला घेतल्यापासून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते आहे, आपण स्वतंत्र भारतात श्वास घेतो आहे, हे आपल्यावर त्या सगळ्या स्वातंत्र्य सेनानींचे, विरांगनांचे थोर उपकार आहेत. अगदी घर च्या घर स्वातंत्र्य यज्ञात समिधांसारखे आहुती देत राहिले. आपल्या स्वतःचा विचार त्यांच्या ठायी जाणवतच नाही. पुढची पिढी आपल्याला लक्षात तरी ठेवेल का हा साधासा प्रश्न सुद्धा त्यांना कधीच पडला नाही.
प्रभावती देवी, डॉ जयप्रकाश नारायण ह्यांच्या सौभाग्यवती. प्रभावती देवींचा जन्म बिहार मध्ये १९०६ साली श्री ब्रिजकिशोर प्रसाद ह्यांच्या घरी झाला. ब्रिजकिशोर जी त्याकाळचे प्रख्यात वकील होते. गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होते. त्यांचा भरभराटीचा वकिली पेश्यावर पाणी सोडून त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. प्रभावतींच्या बाल मनावर असेच संस्कार झाले.
वयाच्या १४ व्या वर्षी, १९२० साली त्यांचा विवाह डॉ जयप्रकाश नारायण ह्यांच्याशी झाला. लग्नानंतर जयप्रकाशजी आपल्या विज्ञानाच्या अध्ययनासाठी कॅलिफोर्निया येथे गेले पण मग त्यांनी मार्क्सवाद चा अभ्यास विस्कासिन ह्या विश्ववविद्यायलायतून केला. प्रभावती देवी ह्या काळात गांधी आश्रमात राहिल्या. कस्तुरबांची जणू सावली झाल्या. खादी चा वापर, प्रचार आणि प्रसार, महिलांमध्ये स्वातंत्र्य संग्रामचे बीज पेरणे अशी त्यांची कामे असत.
डॉ जयप्रकाश नारायण आले तेच मुळी क्रांतिकारी ही उपाधी घेऊन. गांधीजींच्या वचना खातर प्रभावती देवी आणि डॉ जयप्रकाश नारायण ह्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत स्वतःचा परिवार पुढे वाढवायचा नाही असे ठरवले. केवढा मोठा त्याग हा. आपलं आयुष्य पूर्णपणे देशासाठी समर्पित केले.
प्रभावतींनी असहकार आंदोलन, मिठाचा सत्याग्रह, चले जावं चळवळ ह्या सगळ्यात सक्रिय सहभाग नोंदवला. त्याच्या परिणाम स्वरूप त्यांना अनेकदा जेलयात्रा भोगावी लागली. प्रत्येकवेळी कारावसातून सुटून आल्यावर त्या पुन्हा तेवढ्याच हिरीरीने दुसऱ्या चळवळीत त्यांचा सहभाग नोंदवायच्या. ह्या सगळ्या काळात त्या नेहरू परिवाराच्या पण नजीक आल्या. त्यांचे लक्ष्य कायम देशसेवा हेच राहिले. स्वातंत्र्य मिळाल्या नंतर सुद्धा त्यांचे काम सतत सुरू राहीले. त्या सर्वोदय आंदोलनात सुद्धा काम करत होत्या. पटण्याला ‘महिला चरखा समिती’ स्थापन करून त्या अनुषंगाने महिलांमध्ये काम करीत राहिल्या.
अर्पित होउनि जावे। विकसित व्हावे॥
परिसरातल्या अणुरेणूतुन। अविरत वेचुनि तेजाचे कण।
रसगंधांशी समरस होऊन। हृदयकमल फुलवावे
असं काहीसं आयुष्य प्रभावतीदेवी जगल्या आणि १५ एप्रिल १९७३ साली कॅन्सर शी झुंज देता देता त्यांनी ह्या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या कार्याला आम्हा भारतीयांचे शत शत प्रणाम.
|| वंदे मातरम् ||
— सोनाली तेलंग.
१४/०७/२०२२.
संदर्भ:
१.Biography of Prabhavati devi : winentrance.com
२.amritmahotsav.nic.in
http://xn--f4b.wikipedia.org/
Leave a Reply