भारतीय स्त्रीचे जीवन फारच साचेबद्ध होते. आपल्या दाराच्या उंबरठ्या बाहेरच आयुष्य फार कमी बघितलं होतं त्यांनी. पण जेव्हा स्वातंत्र्य संग्रामची पुकार झाली त्यावेळी भारतीय स्त्री सगळी बंधने झुगारून बाहेर पडली. समर्पण हा आम्हला शिकवला गेलला, आमच्यात रुजवला गेलला संस्कार तेव्हा उफाळून आला असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. अश्या अनेक वीरांगना भारतमातेच्या पोटी जन्मला आल्या आहेत. काळाच्या पडद्याआड त्या हरवून जाणार नाही ना म्हणून हा लेखन प्रपंच.अन्नपूर्णा महाराणा ह्या ओडिशा येथील वीरांगनेचे आज संस्मरण.
३ नोव्हेम्बर १९१७ साली त्यांचा जन्म एका स्वातंत्रता लढ्यात स्वतःला पूर्णपणे वाहून घेतलेल्या घरात झाला. त्या वीरांगना रमादेवी आणि स्वातंत्र सेनानी गोपबंधु चौधरी ह्याच्या दुसऱ्या अपत्य. गोपबंधूंनी आपली सरकारी नौकरी सोडून स्वातंत्र्य संग्रामाला वाहून घेतले. संस्कार तेच झाले बाल मनावर. घरातल्या गप्पांचे विषय तेच, त्यामुळे दुसरा विचार अन्नपूर्णा ह्यांना माहितीच नव्हता. वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. गांधींच्या विचारांनी त्या प्रभावित होत्या. पुरी ते भद्रक अशी गांधीजींनी १८० किलोमीटर ‘हरिजन पद यात्रा’ काढली होती, त्यात अन्नपूर्णा देवींनी ओडिशा येथून भाग घेतला. आपल्या वयाच्या पलीकडे जाऊन त्या विचार करत होत्या, काम करत होत्या. इंग्रजी हुकमती विरुद्ध जो लढा लढला जाई, त्यात अन्नपूर्णा सक्रिय सहभाग नोंदवत. लहान मुलांसाठी असलेली ‘बानर सेना’ च्या त्या कार्यकर्त्या बनल्या. बानर सेने अंतर्गत त्या मुख्य प्रवाहत चालणाऱ्या कामाला साहाय्याक म्हणून काम चालत असे.
१९३० साली मिठाच्या सत्याग्रहाच्या वेळी त्यांना पहिल्यांदा कारावास भोगावा लागला. सहा महिने कारावासात काढल्यावर आता अन्नपूर्णा अजूनच कट्टर इंग्रज विरोधी आणि तेवढ्याच कट्टर देशप्रेमी झाल्या. १९३१ पासून युवा कार्यकर्ता म्हणून त्या अजून जवाबदरीने आणि जोखिमपूर्ण कामे करू लागल्या.
१९४२ सालचे चले जावं आंदोलन असो वा सविनय अवज्ञा अभियान अन्नपूर्णा महाराणांची कामगिरी वाखाणण्या सारखीच होती. ह्या सगळ्या काळात त्यांना अनेकदा जेल यात्रा करावी लागली. प्रत्येकवेळी कारावसातून मुक्त झाल्यावर त्यांचा इंग्रजद्वेष आणि देशप्रेम दुपटीने वाढत होते. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्या कटिबद्ध होत्या. वेग-वेगळ्या कॉन्ग्रेसच्या सभांना त्या आवर्जून उपस्थित राहत.
१९४२ साली त्यांनी सरत चंद महाराणा ह्यांच्याशी विवाह केला. हा विवाह त्याकाळच्या समाज रचनेला अनुसरून नव्हता कारण तो एक आंतरजातीय विवाह होता. सरत चंद देखील आधुनिक विचारांचे होते, त्याचबरोबर देशसेवा आणि समाज उत्थान असा व्यापक विचार करणारे होते. त्यांनी ओडिशा भागात मुल-शिक्षा सगळ्यांना मिळावी ह्यासाठी फार मोठे काम केले. हा विवाह अन्नपूर्णांच्या समाजकार्यात अडथळा नव्हे तर पोषकच ठरला. दोघेही पूर्ण समर्पण भावनेने वेग-वेगळी सामाजिक कामे करत राहिलेत.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा अन्नपूर्णा ह्याचे काम सुरूच राहिले. विनोबा भावेंनी सुरू केलेली ‘भूदान चळवळ’ असो, वा कुठलेही जातीय दंगे किव्हा कुठलीही नैसर्गिक आपत्ती, अन्नपूर्णा त्याठिकाणी स्वतः हजर असत. तळागाळातील लोकांपर्यत त्या पोचल्या आणि त्यांनी प्रत्येकाच्या समस्या केवळ समाजवूनच घेतल्या असं नाही तर त्यावर काम केले. १९७१ चे बांग्लादेश मुक्ती संग्राम असो वा १९७५ ची इमर्जन्सी, अन्नपूर्णा सतत कार्यशील राहिल्या. चंबलच्या खोऱ्यात राहणाऱ्या डाकुंना पुनर्वासित करण्यासाठी महाराणा खूप झटल्या. अंतिम फायदा समाजाचाच व्हावा, देशात सुराज्य स्थापन व्हावे ह्यासाठी त्या आजीवन झटत राहिल्या.
समाजकार्य करून त्या थांबल्या नाहीत, तर येणाऱ्या पिढीसाठी इतिहासाची दखल घेता यावी म्हणून त्यांनी लिखाणाला वेळ दिला. गांधीजी आणि विनोबा भावेंचे लिखाण त्यांनी उडिया भाषेत अनुवादित केले. चंबल च्या खोऱ्यात काम करतांनाचे आपले अनुभव त्यांनी शब्दबद्ध करून ठेवले तसेच स्वातंत्रता संग्रामातले आपले अनुभव सुद्धा शब्दांकित केले. हे त्यांचे लिखाण येणाऱ्या पिढीसाठी नक्कीच प्रकाशवाटांचे काम करतील ह्यात शंका नाही.
वयाच्या ९६ व्या वर्षी, ३१ डिसेंम्बर २०१२ साली अन्नपूर्णा महाराणा ह्यांनी या जगाचा निरोप घेतला. आपले संपूर्ण आयुष्य सहजच दुसऱ्यांसाठी वेचणाऱ्या ह्या भारतमातेच्या विरांगनेला आम्हा भारतीयांचे शत शत नमन.
|| वंदे मातरम् ||
— सोनाली तेलंग.
१८/०७/२०२२.
संदर्भ:
http://xn--e4b.magzines.odisha.com/
http://xn--f4b.agnibaan.com/
http://xn--g4b.thebetterindia.com/
http://xn--h4b.wikipedia.com/
Leave a Reply