निर्माणों के पावन युग में, हम चरित्र निर्माण न भूलें।स्वार्थ साधना की आंधी में, वसुधा का कल्याण ना भूलें ।।
भारत निर्माण होत होता, देश म्हणून आणि आपण भारतीय देशवासी म्हणून. किती महत्वाचा काळ होता तो. एकाच वेळी दोन पातळ्यांवर काम अपेक्षित होते आणि ते केले ही जात होते. स्वराज्य आणि सुराज्य (अर्थात रामराज्य) हे एक लक्ष्य त्यावेळी प्रत्येक स्वातंत्र सेनानी च्या मनात होते. प्रत्येक जण आपापल्या परीने खारीचा वाटा उचलत होते, काम पुढच्या पायरीवर आणून ठेवत होते. स्वार्थ साधनेपेक्षा वसुधेचे कल्याण करणारे लोक नेहमीच प्रातः स्मरणीय असतात हे निश्चित. आज भेटू या अशाच एका वीरांगनेला श्रीमती यशोधरा दसप्पा.
२८ मे १९०५ साली बंगलोर येथे श्रीमती यशोधरा दसप्पा ह्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील म्हणजे प्रसिद्ध समाजसेवक KH Ramaiah. घरातले वातावरण बुद्धीला आणि मनाला चालना देणारे त्यामुळेच यशोधरा जींचे संगोपन हे समाज कल्याणासाठीच झाले असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. त्यांचे पुढील कार्य बघता तर हेच जाणवते. आपल्या भाषेत बोलायचं तर खाऊन-पिऊन सुखी घर होते त्यांचे, आरामशीर आयुष्य जगता आले असते, पण तेच कदाचित नको होते.
आपलं शिक्षण पूर्ण करून त्यांनी पूर्णवेळ समाजकार्याला द्यायचा हे ठरवले. गांधीजींच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर होता. समाजकार्याबरोबच देशाला स्वातंत्र्य मिळवून देणेही तेवढेच महत्वाचे होते. त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात सक्रिय भाग घेतला मग ते चलेजाव आंदोलन असो किव्हा सविनय अवज्ञा अभियान असो. त्या आपल्या सहकाऱ्यांच्या बरोबरीने काम करत होत्या. ह्या सगळ्या स्वातंत्र्य सेनानी, वीरांगना ह्यांचे दुसरे घर म्हणजे कारावास असे. ह्याला श्रीमती दसप्पा अपवाद नव्हत्या.
१९३० साली झालेल्या जंगल सत्याग्रहात ही त्यांनी भाग घेतला ज्याचे फलित १२०० लोकांना कारावास भोगावा लागला. विदूरश्वथ जे कर्नाटकातील एक गावा आहे, तिथल्या सत्याग्रहाच्या वेळी पोलिसांनी समोरच्या घोळक्यावर गोळ्या झाडायला सुरवात केली, ३५ लोकांना आपले प्राण गमवावे लागले आणि बाकीच्यांना कारावास मिळाला, श्रीमती यशोधरा दसप्पा त्यापैकी एक होत्या. त्यांचे घर म्हणजे भूमिगत सत्याग्रही लोकांसाठी हक्काची जागा. स्वातंत्र्य चळवळीतल्या सेनानी, वीरांगना ह्याचीभेटण्याची जागा. आपल्या देशातील एका वास्तू ‘हॅमिल्टन’ हे नामविधान त्यांना मान्य नव्हते, त्यासाठी त्यांनी अनेक पत्र लिहिलीत, अनेक ठिकाणी भाषणे दिली.
त्यांचा विवाह श्री HC दसप्पा ह्यांच्याशी झाला. ते सुद्धा समाजसुधारक विचारांचे होते. त्यामुळे लग्नानंतर सुद्धा यशोधरा दसप्पा आपल्या पती बरोबर समाज सेवेचे आपले व्रत पुढे चालवत राहिल्या, नव्हे समाजसेवा हे त्यांच्या जगण्याचा हिस्सा बनला. लोकांना साक्षर बनविणे, आत्मनिर्भर बनविणे ह्या दोघांचे उद्देश बनला.
सगळ्यांच्या प्रयत्नांचे फलित म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळाले. आता आपलं सरकार आलं. देशाला स्वराज्य तर मिळाले पण सुराज्य निर्माण होणे बाकी होते. श्रीमती दसप्पा ह्यांना दुसऱ्यांदा पार्टीकडून तिकीट पाठवलं गेलं, पहिल्यादा तर त्यांनी साफ मना केले, पण दुसऱ्यावेळी त्यांना तसे करणे शक्य झाले नाही. पण त्यांनी ठरवलं की आपण प्रचारावर पैसा खर्च करायचा नाही. त्यांनी स्वतःहून कुठलाही प्रचार केला नाही, पार्टी ने जेवढा गरजेचा तेवढा केला, पण त्या निवडून आल्या त्यांच्या कामाच्या बळावर.
राजकारणात त्या कधी रमल्या नाही, आता सत्ताधारी पक्षाच्या वतीने मंत्रिपद होते, पण त्यांना सतत जाणवायचं, वेळेचे आवाहनाला वेळेतच उत्तर द्यायला हवं, वेळेची मागणी न ऐकणं एका जागृत मानसिकता असलेल्या व्यक्तीला अशक्य आहे. जानेवारी १९६६ साली त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला, सरकार दारूबंदी चा कायदा काढायला मागे-पुढे पाहत होती, श्रीमती दसप्पा ना जाणवत होते, की दारू विक्रीतून सरकारला होणाऱ्या फायदापेक्षा नागरिकांना होणारे नुकसान जास्त मोठे आहे. त्यांच्या ह्या कृतीमागचा विचार तत्कालीन सरकार पर्यत पोचायला हवा होता की सरकार ची स्थापना जनतेच्या हितासाठी झाली आहे, आपला लाभ बघण्यासाठी नाही.
श्रीमती दसप्पा शासकीय बंधनातून मुक्त होऊन आता पूर्णवेळ समाजकार्याला देऊ शकणार होत्या आणि तो त्यांनी दिला.
निर्माणों के पावन युग में, हम चरित्र निर्माण न भूलें।स्वार्थ साधना की आंधी में, वसुधा का कल्याण ना भूलें ।। ह्या साठी त्या झटल्या. स्वराजला सुराज्यात जे परिवर्तित करायचे होते. स्त्री शिक्षण, स्त्री-पुरुष समानता, नशाबंदी ह्या सगळ्यावर ते काम करत राहिले.
श्री दसप्पा ह्यांच्या मृत्यूनंतर तर त्यांनी पूर्ण देशाला आपले घर मानायला सुरवात केली आणि त्यासाठी झटत राहिल्या. देशातील छोट्यातल्या छोट्या खेड्यांमध्ये प्रगती करणे म्हणजे देशाची प्रगती हे त्यांना पक्के माहिती होते. त्यांनी अनेक गावातून कन्या विद्यालय, महिला ग्राम सेवक प्रशिक्षण केंद्र, महिला संस्था सुरू केल्यात. मंत्रिपद सोडल्यावर त्यांनी ह्याच कामात आपले जीवन व्यतीत केले. तिसऱ्या निवडणुकांच्या वेळी त्यांना परत एकदा पार्टी कडून तिकीट देण्याचा मानस सांगितला गेला, पण श्रीमती दसप्पा नी तो परतवून लावला. वयाच्या ७५ व्या वर्षी सुद्धा त्या पूर्ण वेळ समाजसेवेचे व्रत आनंदाने पार पाडत होत्या.
स्त्री चेतना म्हणजे केवळ पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण नाही तर सौम्यता आणि साधेपणा हेच तिचे खरे आभूषण आहेत, फॅशन हे मानसिक दास्यतेचे लक्षण आहे हा त्याचा दृढ विचार होता. आपल्या सांसारिक जवाबदऱ्या अतिशय योग्य पद्धतीने पार पाडून त्यांनी आपले जीवन समाजसेवेसाठी वाहून घेतले.
बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो
हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो
हीच इच्छा उराशी बाळगून जन्मभर जनसेवेचे व्रत आपल्या स्वतःच्या पुढे ठेऊन जगलेल्या भारतमातेच्या वीरांगना श्रीमती यशोधरा दसप्पा ह्यांना शत शत नमन.
|| वंदे मातरम् ||
— सोनाली तेलंग.
१९/०७/२०२२
संदर्भ:
http://xn--e4b.literature.awgp.org/
http://xn--f4b.inuth.com/
http://xn--g4b.wikipedia.com/
Leave a Reply