१८५६ पर्यत ब्रिटिशांचे एकछत्री साम्राज्य संपूर्ण भारतात स्थापित झाले होते. १८५७ चा ऐतिहासिक लढ्याने जनजगृती तर केली पण त्याला यश आले नाही. पुढे १८८५ पर्यंत राष्ट्रीय भावना वाढीस आली होती. लोकांमध्ये देशप्रेम, पारतंत्र्याची चीड, स्वराज्य हे सगळे विचार वाढतांना दिसून आले. सुरवातीला अर्ज-आर्जव करून अधिकार पदरात पाडून घ्यावे असे वाटत होते आणि तसेच काम पण सुरू होते,मात्र पुढे-पुढे ह्यातून निष्पन्न निघत नाही म्हटल्यावर मात्र जहाल विचार प्रबळ होऊ लागले. ह्या सगळ्या साठी संघटन महत्वाचे, एकी महत्वाची त्यासाठी काय काय करू शकतो, तर महाराष्ट्रातल्या पुण्याच्या डॉ इंदुमती नाईक ह्यांनी चक्क घरातच बांगड्यांचे दुकान काढले, घरा-घरातून स्वातंत्र्य चळवळ पोचविण्यासाठी.
सुमती वीरकर ह्यांचा जन्म ८ ऑगस्ट १८९७ साली पुण्यातल्या एका ब्राम्हण आणि अतिशय सुसंस्कृत परिवारात झाला. त्यांचे वडील नारायण वामन वीरकर हे अतिशय हुशार वकील होते तसेच सुधार मतवादी होते. त्यांनी त्याच्या दोन्ही मुलींना म्हणजे सुमती आणि भानुमती ह्यांना शैक्षणिक अधिकार दिला. सुमती ताई शालान्त परीक्षेत पहिल्या आल्या. त्यांच्या वडिलांनी ठरविल्या प्रमाणे आपल्या मुलींची लग्न १५ वर्ष पूर्ण होण्याच्या आधी केली नाहीत. सुमती पास झाल्यावर त्यांना डॉ रामचंद्र नाईक ह्यांचे स्थळ आले. ते बीजवर होते, पण त्यांची अट होती की मुलीने आपले शिक्षण पूर्ण करावे. सुमती वीरकर च्या इंदुमती नाईक झाल्या आणि पुढे निष्णात डॉ इंदुमती नाईक झाल्या. मेडिसिन आणि सर्जरी अश्या दोन्हीत त्या गोल्ड मेडलिस्ट झाल्या. त्यांना त्याकाळी ब्रिटिश सरकारी इस्पितळात नौकरी देण्यात आली, पण डॉ रामचंद्र नाईक स्वतः कट्टर देशभक्त होते आणि त्यांची ईच्छा होती इंदुमती बाईंनी स्वातंत्र्य संग्रामात योगदान द्यावे. जर बघितले तर १९२० साली निष्णात डॉ म्हणून जर नौकरी किव्हा स्वतःचा व्यवसाय केला असता तर पुष्कळ पैसा कमावून एक प्रतिष्ठित आयुष्य जगता आले असते, पण इंदूमतींनी सुद्धा त्यावेळेच्या आवाजाला होकार द्यायचे ठरवले आणि स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली.
१९२० साली गांधीजी पुण्यात आले आणि त्यांच्या भाषणाने प्रभावित होऊन डॉ इंदूमतींना मुळशी धरणासाठीच्या सत्याग्रहापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. तिथल्या घरांमध्ये जाणं, लोकांशी बोलणं, त्यांच्या समस्या जाणून घेणे, हे सगळं त्यांनी केलं. डॉ इंदूमतींना आपला व्यवसाय बाजूला ठेऊन पूर्णपणे देशकार्याला स्वतःला वाहून घेतले. मुळशी सत्याग्रहात स्त्रिया सहभागी झाल्याशिवाय तो खऱ्या अर्थाने सत्याग्रह होणार नाही असे त्यांना वाटले आणि त्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. इंदूमतींच्या भेटी मुळशी भागात वाढू लागल्या आणि तिथल्या स्त्रिया सत्याग्रहात भाग घेण्यासाठी नावे नोंदवू लागल्या. इंदूमतींना पुण्याला एक सभा ठरवली आणि त्याच्या पहिल्याच सभेला जवळपास १००० स्त्रिया आल्या. इंदूमतींचा अभ्यास दांडगा होता, रोजच्या व्यवहारा पासून ते पुराणातील दाखले त्या फार सुंदर पद्धतीने गुंफत. त्यांच्या अमोघ वक्तृत्व शैलीने सभा सहज काबीज होत असे. इंदूमतींना या सत्याग्रहात शेतकरी व मध्यमवर्गीय शहरी स्त्री ह्यांच्यामधील दुव्याची कामगिरी चोख बजावली.
मुळशी सत्याग्रहानंतर इंदूमतींना असहकार चळवळीवर लक्ष केंद्रित केले. स्वदेशीचा प्रचार, खादीचा वापर, विदेशी वस्तूंची होळी, सूतकताई वर्ग, राष्ट्रीय शिक्षण ह्या सगळ्यात नाईक पती-पत्नीने आपला बहुमूल्य वेळ दिला. स्त्रियांपर्यत स्वातंत्र्य चळवळीची प्रत्येक गोष्ट पोहोचावी या साठी डॉ इंदूमतींना आपल्या घरातच स्वदेशी बांगड्यांचे दुकान सुरू केले. त्यांचा विश्वास होता की बायकांपर्यत हा विषय गेला तर तो प्रत्येक घरातून उचलून धरला जाईल. डॉक्टरीण की कासारीण अशी त्यांच्यावर टिकापण झाली पण इंदुमती त्याने मागे हटल्या नाहीत. असहकार, स्वदेशी, हरताळ ह्याचे तात्विक अधिष्ठान समजावून सांगण्यासाठी त्यांनी लेखणीचा आधार घेतला. इंग्रजी आणि मराठी अश्या दोन्ही भाषेतून त्यांनी विपूल लेखन केले. आपल्या राहत्या घरी सुतकताईचा वर्ग सुरू केला. त्याला स्त्री वर्गाकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यातूनच सूत कमिटीची स्थापना झाली. त्यात आनंदीबाई जोगळेकर, सत्यभामा बाई कुवळेकर ह्यांना त्याचे प्रमुख केले. ह्या कमिटीतर्फे विणले जाणारे सूत अतिशय तलम होते, बालगंधर्वानी त्याची साडी विकत घेतली आणि त्याला सहज प्रसिद्धी मिळाली.
राष्ट्रीय कामासाठी अनेक फ़ंडांसाठी त्यांनी पैसा गोळा केला. त्यांचे भाषण हे सभेचे आकर्षण ठरू लागले. काँग्रेसला नवीन कार्यकर्ते मिळू लागले. एकेका सभेतून ४०-४० कार्यकर्ते नोंदणी होऊ लागली. इंदूमतींच्या कामाचा आवाका बघून आता अखिल भारतीय काँग्रेस समितीवर त्यांची नेमणूक झाली. सरोजिनी नायडू, कस्तुरबा गांधी, विजयालक्ष्मी पंडित, स्वरूपा राणी व डॉ इंदुमती नाईक अश्या फक्त ५ जणी ह्या कार्यकारीणी वर होत्या त्यांना ‘पंचकन्या कमिटी’ म्हणत. आठवा एडवर्ड इंग्लडचा युवराज च्या भारत भेटीवर बहिष्कार घालावा म्हणून डॉ इंदूमतींनी महाराष्ट्रभर दौरे केले. दारू दुकानावरील निदर्शनाकरिता स्त्रीयांच्या बैठका घेणे, त्यांना बोलण्यासंबंधी माहिती देणे त्या करत होत्या. त्यांच्या कामांची दखल वृत्तपत्रांना घ्यावी लागली, त्यांना आणि त्यांच्या टीमला ‘पुण्याच्या बहादूर स्त्रिया’ असे वर्णन वृत्तपत्रातून येऊ लागले.
त्यांच्या सततच्या प्रवासाने, कामाच्या व्यापामुळे त्यांना प्रचंड दगदग झाली. त्या आजारी पडल्या. त्यात दोन मुलांचा जन्म, पण त्या परत उभ्या राहिल्या आणि स्त्रियांमध्ये राष्ट्रीय शिक्षण ह्यावर काम करू लागल्या. विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर ह्या उक्ती प्रमाणे त्यांनी सतत फिरस्ती ठेऊन पक्षबांधणी, अध्यात्मिक प्रवचने, संघटना बांधणे, हिंदू-मुस्लिम ऐक्यावर काम करणे असे सुरू केले. १९२६ ते १९४२ त्यांची भ्रमंती चालूच होती. १९२८ साली डॉ रामचंद्र नाईकांची एक सभा पुण्यात उधळली गेली, त्याच्या पायावर लाठीचार्ज झाला आणि त्यांना कायमचे अपंगत्व आले. इंदूमतींचा मोठा आधार अचानक पंगू झाला. त्याही परिस्थिती त्यांचे राज्यातून कीर्तने, प्रवचने, त्यातून स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, स्त्रियांचा राष्ट्रकर्यात सहभाग असे सगळे विषय मांडणे सुरू होते. १९४० नंतर मात्र नाईक कुटुंब कऱ्हाड, सातारा येथे स्थायिक झाले, कारण मुलांच्या शिक्षणाची आबाळ, खाण्यापिण्याचे हाल आणि डॉ रामचंद्र नाईकांना आलेले पंगूपण. तिथे डॉ देशपांडेंकडे डॉ इंदुमती नाईक सकाळी ७ ते ९ नौकरी करून आपल्या कुटुंबाला आधार देत राहिल्या.
१९४२ साल भारतीय स्वातंत्र्य संग्रामात अतिशय महत्वपूर्ण ठरले. चले जावं आंदोलन सुरू झाले, पण आता सांसारिक जवाबदाऱ्यांमुळे इंदूमतींना त्यात सक्रिय सहभाग नोंदवता आला नाही. १९२४ साली गांधीजींना अपेनडिक्स चा त्रास झाला, त्यावेळी त्यांना कारावसातून ससून मध्ये शस्त्रक्रियेसाठी आणण्यात आले. डॉ मोडकांनी त्यावेळी डॉ इंदूमतींना मदतीसाठी बोलावून घेतले. अश्या निष्णात डॉक्टरने आपले सगळे भविष्य देशासाठी त्यागून दिले. आपल्या मुलांच्या भविष्याचीसुद्धा चिंता केली नाही. १९७४ साली कऱ्हाड येथे त्यांची प्राणज्योत मालवली. आज हा लेख लिहितांना, त्यांच्याविषयी माहिती शोधणे अतिशय कठीण गेले, इतिहासाने त्यांच्या कामाची नोंद ठेवली नाही. भारतमातेच्या वीरांगना डॉ इंदुमती नाईक ह्यांना ही माझी शब्द सुमानांजली.
|| वंदे मातरम् ||
— सोनाली तेलंग.
२०/०७/२०२२
संदर्भ:
http://xn--e4b.jstor.org/stable
http://xn--f4b.loksatta.com/chaturang
Leave a Reply