आपल्या कल्पना शक्तीच्या पलीकडचा भारत होता अगदी आजपासून १०० वर्षांपूर्वी. इथलं राहणीमान, इथली विचारसरणी सारीच निराळी होती. माझ्या पिढीला निदान भारताच्या स्वातंत्र्य संग्रामची तोंड ओळख तरी आहे पण आमच्या पुढच्या पिढीला तर साधी कल्पनासुद्धा येणार नाही की तेव्हाचे जीवन किती वेगळे होते आणि जो संघर्ष केला, त्यासाठी ज्या यातना भोगल्या गेल्या त्या किती पराकोटीच्या होत्या, घरं च्या घरं उध्वस्त झालीत, आपल्या खुणा इतिहासात राहतील की नाही ह्याची सुद्धा पर्वा न करता लोकं लढलीत आणि ‘आपण’ मुक्त झालोत. आजची वीरांगना अशीच एक प्रसिद्धीच्या झोतापासून कोसो मीटर लांब राहिलेली गुलाब कौर.
पंजाब मधील बक्षिवाला येथे १८९० साली ह्यांचा जन्म झाला. एवढीच माहिती त्यांच्या बद्दलची आहे. त्यांचं लग्न श्री मान सिंघ ह्यांच्याशी झाले. भारतातील एकूण सांपत्तिक परिस्थिती बघता या तरुण जोडप्याने पश्चिमेकडे धाव घेतली. आपल्या आजूबाजूची परिस्थितीत बदल होणार नाही आणि आपण एकटे काहीच करू शकत नाही कदाचित अशीच मानसिकता त्यांची असावी. म्हणून इथे जे काही घडते आहे त्याच्याशी आपला संबंध नाही असा विचार करून ते सहज बाहेर पडू शकले. पुढे उज्ज्वल भविष्य दिसत असतांना, अंधारात चाचपडत जगणे कोण स्वीकारेल. फिलिपीन्स पर्यंतचा प्रवास झाला पण पुढे अमेरिका गाठायची होती.
पुढचा प्रवास सुरु होणार तेव्हा मात्र त्यांची भेट काही ‘गदरी क्रांतिकारी’ शी झाली. गदरी म्हणजे भारता बाहेरील शीख लोकांचे संघटन जे भारताच्या स्वातंत्र्यासाठी काम करत होते. हे क्रांतिकारी भारतात परत येत होते, भारतात राहून भारतीय स्वातंत्रा संग्रामात त्यांना काम करायचे होते. ह्या तरुण जोडप्याशी त्याच्या गप्पा झाल्या, दोघांनाही क्षणभर वाटलं की आपण पण परत जावं आणि आपल्या मातृभूमीला पारतंत्र्यातून बाहेर काढायला काम करावं. पण मान सिंघ ह्यांनी निर्णय घेतला, त्यांनी अमेरिकेला जायचे निश्चित केले, इकडे गुलाब कौर ह्यांचा पण निर्णय झाला होता, नवऱ्याला सोडून त्या गदरी संघटनेला जाऊन मिळाल्या, आपल्या सोनेरी भविष्याकडे, संसाराकडे पाठ फिरवून त्या गदरी क्रांतिकारी संघटनेच्या कार्यकर्त्या बनल्या. एका कोवळ्या वयाच्या मुलीसाठी हा निर्णय नक्कीच सोप्पा नसणार, पण तो निर्णय पक्का होता. गुलाब कौर भारतात परत आल्या.
कपूरथला, होशियारपूर, जालंधर ही गुलाब कौर ह्यांची कर्म भूमी झाली. ह्या भागातल्या क्रांतिकारी कामकाज गुलाब कौर जातीनी बघत होत्या. स्वातंत्र्य संग्रामातील विषय, कामाचा आढावा सामान्य जनतेपर्यंत पोचवायची एकच पद्धत त्याकाळात उपलब्ध होती, ती म्हणजे पत्रक, वृत्तपत्र इत्यादी. गुलाब कौर ह्यांनी पत्रकारकेची भूमिका घेतली आणि त्यायोगे, घरा-घरातुन स्वातंत्र्य संग्रामशी जोडलेले साहित्य पोहचवू लागल्या. लोकांमध्ये स्वातंत्र्य संग्रामाबद्दल जन जागृती करणे हे त्यांचे मुख्य कामच झाले जणू. एक पत्रकार म्हंटल की थोडी सहूलत पण मिळत असेल बहुदा म्हणून मग त्यांनी आपल्या शबनम बॅग मधून क्रांतीकारकांसाठी दारुगोळा, पिस्तुलं अशी ने आण सुरू केली.
एकूणच त्याचा समजात वावर बघता इंग्रजांना त्यांच्यावर शंका येऊ लागली. ते पण एखादा सुगावा / पुरावा मिळतो का ह्यासाठी त्यांच्यावर पाळत ठेवूनच होते. दैवदुर्विलास एकदा अश्याच गुलाब कौर क्रांतिकारी साहित्याच्या वाटप करायच्या उद्देशाने बाहेर पडल्या, ह्यावेळी त्यांना पिस्तुलं आणि काडतुस पोहचवायची होती, पण त्या सगळ्या मुद्देमाला सह पडकल्या गेल्या. इन्कलाब जिंदाबाद चा नारा परत एकदा पूर्ण आसमंतात घुमला. त्यांच्यावर देशद्रोहाचे कलम लावण्यात आले आणि दोन वर्षे कारावास आणि सक्त मजुरीची शिक्षा देण्यात आली. त्यांचा कारावासात सुद्धा अनन्वित छळ करण्यात आला, शारीरिक आणि मानसिक दोन्ही.
कारावसातून बाहेर आल्यावर त्या वरचेवर आजारी पडू लागल्या आणि अशातच त्यांना १९३१ साली वीरमरण आले. बीबी गुलाब कौर / गदरी बीबी गुलाब कौर वयाच्या ४० व्या वर्षी विरगतीला प्राप्त झाल्या.
शौर्यम..दक्षम..युध्धेय..! बलिदान परम धर्म
भारतमातेच्या या विरांगनेला इतिहासाच्या पानात थोडीतरी जागा मिळेल ना मिळेल पण आम्ही भारतीय त्यांचे बलिदान व्यर्थ ना जाऊ देऊ. आम्ही आजन्म त्यांच्या ऋणात राहू.
|| वंदे मातरम् ||
— सोनाली तेलंग.
२१/०७/२०२२
संदर्भ:
http://xn--e4b.thebetterindia.com/
२.hindi/starsunfold.com
http://xn--g4b.inuth.com/
Leave a Reply