एक स्त्री किती वेग-वेगळ्या भूमिका आपल्या जीवनात निभावत असते, मुलगी, बहिणी, मैत्रीण, बायको, पण तिच्या स्त्रीत्वाचा गौरव तिला स्वतःलाही ‘आई’ म्हणून घेण्यातच वाटतो. ती आई ह्या रुपात परिपूर्ण असते म्हणून आपला हिंदू समाज देवीची जी पूजा ही मातृशक्ती म्हणूनच करतो. म्हणजे बघा मातृ म्हणून एकीकडे हळवी आणि शक्ती म्हणून दुसरीकडे आपण तिच्यातल्या ठाम व्यक्तिमत्वाची पूजा करतो. ज्या स्त्रीला तिच्या २ महिन्याच्या बाळाला घेऊन कारावास भोगावा लागला असेल, तोही थोडे-थोडके दिवस नाही तर पूर्ण दोन वर्षे, त्या स्त्रीच्या मनाची तयारी, दृढता, तिचे लक्ष्य किती पक्के असेल हे सांगण्याची जरूर नाही. आज भेटूया एका अश्याच आई ला श्रीमती कुट्टी मालू अम्मा.
१९०५ साली त्यांचा जन्म केरळ येथे झाला. त्यांच्या लहानपणीच्या कथा कधीच राजकुमार आणि परीकथा नव्हत्या, तर कथा असायच्या देशातल्या थोर नेत्यांच्या, ज्यांनी देशासाठी आपले सर्वस्व अर्पण केले अश्या वीरांच्या. मनाची मशागत अशीच झाली. १९२६ साली त्यांचा विवाह तेव्हाचे कांग्रेस प्रदेश अध्यक्ष श्री कोझीपुराथू माधव मेनन ह्यांच्याशी झाला. आता पर्यत कुट्टी मालू ह्यांच्या आयुष्याचा विचार करता त्यांच्या मनाची मशागत सुरू होतील आता लग्नानंतर त्यांनी खऱ्या कामाला सुरुवात केली.
स्त्री शक्तीला एकत्रित आणून काम करणे हे त्यांनी सुरू केले. त्याच बरोबर खादी चा प्रचार, प्रसार आणि वापर तिन्हीवर भर दिला. विदेशी कपड्यांची होळी हा सुद्धा त्याचाच भाग होता. कॅलिकट मधल्या दुकानातून विदेशी वस्तूंची विक्री बंद व्हावी ह्यासाठी त्यांनी महिलांना एकत्र करून मोर्चा काढला. ह्या सगळ्या उपक्रमाच्या मुळाशी मुख्य हेतू एकच होता ब्रिटिश राजवटीचा अंत.
१९३२ साली असहकार आंदोलन,सविनय कायदा भंग ह्या सगळ्यात त्यांनी भरपूर काम केले. एक मोठा मोर्चा काढण्यात आला, त्यात कुट्टी मालू ह्यांनी पुढाकार घेतला आणि त्या मोर्च्याचे नेतृत्व देखील केले त्यावेळी त्यांची मुलगी केवळ दोन महिन्यांची होती. इंग्रजांचे दडपशाही चे धोरण सर्वश्रुत आहेच. त्यांनी महिला, मुलं, अबाल-वृद्ध काहीच बघितले नाही आणि सगळ्यांना देशद्रोही म्हणून कारावासात टाकणे सुरू केले. कुट्टी मालू ह्यांना सुद्धा २ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा झाली, त्यांच्या दोन महिन्यांच्या तान्हुली बरोबर त्यांनी कारावास भोगला. प्रत्येक चळवळ जी भारताला स्वातंत्र्य देऊ शकेल अश्या सगळ्यात कुट्टी मालू ह्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला, मग ते सविनय कायदे भंग, असहकार आंदोलन किव्हा चले जाव चळवळ. प्रत्येकवेळी त्याची शिक्षा ही ठरलेली,
कारावास कालावधी फक्त वेगळा होता. कारावसातून सुटून आल्यावर त्या अजून जोमाने कामाला लागायच्या.
ह्या सगळ्याशिवाय त्यांचा समाजकार्यात सुद्धा मोलाचा सहभाग होता. त्यांनी केरळातील स्त्रियांसाठी एक मंडळ स्थापन केले, ज्या अंतर्गत महीलांचे प्रश्न सोडवणे, त्यावर काम करणे,शिक्षण, आरोग्य, बाल विवाह असे सगळेच प्रश्न हाताळले जात. काँगेस च्या राष्ट्रीय समितीत, तसेच प्रदेश समितीत सुद्धा त्या कार्यरत होत्या. अनाथ मुलांसाठी त्यांनी फार मोठं काम उभं केलं. तरुण अपराधी मुलांसाठी पुनर्वसनाचे केंद्र उभे केले. त्यांच्या शब्दकोशात निवृत्ती हा शब्दच नव्हता बहुतेक. सामाजिक कामात त्यांना विशेष आनंद मिळत असे, त्याच्या शेवट्याच्या श्वासापर्यंत त्या काम करत राहिल्यात. १९८५ साली ह्या तेजस्वी शलाकेने डोळे मिटले. त्यांच्या कामाचा आवाका बघता आणि त्यांचे सगळ्यांसाठीच मातृ हृदय बघता, जन मानसात त्या ‘अम्मा’ म्हणूनच ओळखल्या जातं. ह्या मातृशक्तीला आमचे सादर नमन.
|| वंदे मातरम् ||
— सोनाली तेलंग.
२२/०७/२०२२
संदर्भ:
१.indianculture.gov.in
http://xn--f4b.inuth.com/
http://xn--g4b.wikipedia.com/
Leave a Reply