आपण कोणा सारखे दिसतो? त्यामुळे आपण काय काय करू शकतो? प्रसंगी किती कठीण परिस्थितीशी दोन हात करू शकतो, ह्यात आपले नावसुद्धा पुसले जाऊ शकते, तरीही आपण ह्या समाजाचे, आपल्या राष्ट्राचे देणे लागतो, ती आपली जबाबदारी आहे हे सांगणारी आजची गाथा- वीरांगना झलकारी बाई.
झाशीजवळ भोजला गावात एका कोळी कुटुंबात २२ नोव्हेंबर १८३० साली झलकारी बाईंचा जन्म झाला. एका गरीब कुटुंबातील मुलीला जी सगळी कामे करावी लागतात आणि करता येतात ती सगळी कामे झलकारी बाई आनंदाने करायच्या. घराची साफ-सफाई, बकऱ्यांना जंगलात चरायला घेऊन जाणे, लाकूड तोडून आणणे इत्यादी. त्या जन्मतः च शूर होत्या, धाडसी होत्या, पराक्रमी होत्या. ह्याच्या अनेक कथा भोजलच्या स्थानिक लोकांच्या कडून ऐकायला मिळतात. एकदा अश्याच त्या जंगलात गेल्या असतांना, त्यांची वाघाशी झुंज झाली आणि ह्या पिटुकल्या पोरीने आपल्या साहसाचे प्रकट रूप दाखविले, हातातल्या कुऱ्हाडीने त्यांनी वाघाला ठार केले. किस्से एवढ्यावरच संपत नाहीये, तर एकदा त्यांच्या समोर चित्ता आला, मेंढरं हाकायच्या काठीने त्याला बेजार करून मारला. आईच्या अवकाळी मृत्यू मुळे झलकारी बाईंचे पालन पोषण त्यांच्या वडिलांनी एकट्यानेच केले. घोडेस्वारी, तलवारबाजी असे सगळे खेळ खेळतच त्या लहानाच्या मोठया झाल्या.
अश्या ह्या झलकारी लग्न होऊन झाशीच्या राणीच्या सैन्यातली शिपाई पुरण सिंघ ह्यांच्या पत्नी झाल्या. झलकारी बाई झाशीला आल्या आणि त्यांच्यातले आणि राणीतले साधर्म्य लक्षात आले. झलकारी बाई राणीच्या महिला सैनिकी तुकडीत (दुर्गा दल) दाखल झाल्या. आपल्या कर्तृत्वाने झलकारी बाई मोठ्या हुद्यावर पोचल्या आणि एका तुकडीच्या प्रमुख झाल्या. लहानपणी खेळातून शिकलेल्या तलवारबाजी, घोडेस्वारी ह्यामुळे झलकारी बाई युद्धशास्त्रात निपुण झाल्या.
१८५७ चे रणशिंग फुंकले गेले. झाशीवर इंग्रजांचा डोळा होता. झाशीचा वारस दत्तक होता. इंग्रजांना हे मान्य नव्हते, पण राणी ने कडक शब्दात सांगितले ,” मै अपनी झासी नही दुगी”. ७ दिवस झाशी ला घमासान युद्ध चालले. आपल्या सरदारांच्या सल्ल्यावरून राणीने किल्ला सोडून जाणे योग्य राहील असे ठरले. ह्या कठीण प्रसंगी झलकारी बाईंने समजदारीचा, स्वामीभक्तीचा आणि राष्ट्रप्रेमाचा परिचय दिला, राणीच्या वेषात किल्ल्यात लढत राहिल्या, आपल्या सैनिकांचे मनोबल खच्ची नाही होऊ दिले. इंग्रजांना कळलेच नाही की राणी नाहीये. राणी ला मार्गक्रमणासाठी वेळ मिळाला. झलकरीने बाईंनी फक्त राणीचे वस्त्रच परिधान नव्हते केले तर त्यांचा आत्माही राणीचाच होता असा भास होत होता. ह्या युद्धात त्यांना वीर मरण आले, पण राणी वाचली, १८५७ चे समर चालू राहिले.
अवघे २७ वर्षाचे आयुर्मान पण केवढा तो प्रवास. वय म्हणजे केवळ आकडा हे त्यांच्या आयुष्याचा प्रवास पहिला की लक्षात येतं. इतिहासाच्या पानांमध्ये कुठेतरी हरवून गेलेल्या अश्या ह्या वीरांगनेला माझा प्रणाम.
— सोनाली तेलंग.
संदर्भ: Indianculture.gov.in, amrut mahotsav.nic.in, wikipedia.com
०८/०६/२०२२.
Leave a Reply