१५० वर्षाचे पारतंत्र्याचे पाश तोडायचे होते, सोपं नक्कीच नव्हतं. लोकांची मानसिकता बदलायची होती, सोपं नक्कीच नव्हतं. आपण पारतंत्र्यात आहोत हे जन-मानसात रुजवायच होतं, सोपं मुळीच नव्हतं. एखाद्या शत्रूची आधी तो आपला शत्रू आहे म्हणून जाणीव करून देणे गरजेचे आणि मग त्याच्याविरुद्ध लढा. काम कठीण होतं, पण आपण भारतीय आहोत, मुळातच चिवट असतो, तेच आपल्या आधीच्या पिढीने केले, वेग-वेगळ्या पद्धतीने जन-जागरण. सरला देवी चौधरानींनी गाण्याच्या माध्यमातून, साहिताच्या माध्यमातून देशातील काना कोपरयात स्वातंत्र्य संग्राम पोचवला.
७ सप्टेंबर १८७२ साली घोषाल परिवारात त्यांचा जन्म झाला. घोषाल तेव्हाचे पुढारलेल्या विचारांचे बंगाली कुटुंब होते. त्यांचे वडील जानाकीराम घोषाल हे काँग्रेस कमिटीचे सचिव होते तर आई स्वर्णकुमारी घोषाल प्रसिद्ध बंगाली उपन्यासकार होत्या. त्यांचे मामा म्हणजे साक्षात रवींद्रनाथ टागोर होते. त्यांच्या घरात साक्षात सरस्वतीचा वास होता. सरला देवींचा गळा फार गोड होता, आपल्या गाण्यातून आणि आपल्या साहित्य प्रेमातून त्यांनी स्वातंत्र्य लढा घरा-घरात पोचवला.
इंग्लिश भाषेत पदवी घेऊन त्या पुढे शिक्षिका म्हणून म्हैसूर येथे रुजू झाल्या. वर्षभर काम करून त्या कलकत्याला परतल्या. परत आल्यावर त्यांनी एक बंगाली पत्रक ‘भारती’ साठी लिखाणाला सुरवात केली. इथूनच त्यांच्या राजकीय कामाचा आलेख सुरू झाला. पुढे १९०७ पर्यंत त्यांनी ह्या पत्रकाचे काम सुरू ठेवले, उद्देश एकच लोकांमध्ये देशप्रेम, पारतंत्र्याची चीड, स्वातंत्र्य संग्रामची ओळख निर्माण करणे. १९१० साली अलाहाबाद मध्ये त्यांनी ‘भारत स्त्री महामंडळ’ पहिल्या अखिल भारतीय स्त्रियांसाठी काम करणाऱ्या संस्थेची ची स्थापना केली, ज्याच्या पुढे हैदराबाद, मिदानपूर, अमृतसर, दिल्ली, कानपुर, कराची, हजारीबाग, आणि कलकत्ता अश्या सगळ्याठिकाणी शाखा सुरू झाल्या. ह्या संस्थेमार्फत स्त्री शिक्षण हा मुख्य उद्देश आणि महिलांचा सामाजिक स्तर उंचविणे ह्यावर काम केले गेले.
१९०५ साली त्यांचा विवाह श्री रामभुज दत्त चौधरी ह्यांच्याशी झाला आणि त्या पंजाबमध्ये आल्या. श्री रामभुज दत्त चौधरी एक पत्रकार, राष्ट्रीय नेतृत्व असलेले व्यक्ती आणि स्वामी दयानंद सरस्वतींनी स्थापन केलेल्या आर्य समाजाचे अनुयायी होते. ते उर्दू पत्रक ‘हिंदुस्थान’ चे संपादक होते ज्यात रामप्रसाद बिस्मिल सारख्या साहित्यिकांच्या साहित्यातून देश जागृतीचे होत होते. हिंदुस्थान ह्या उर्दू दैनिकाचे पुढे इंग्रजी संस्करण पण सरला देवींच्या मदतीने प्रसिद्ध होऊ लागले. असहकार चळवळीत चौधरी दाम्पत्याने भाग घेतला, त्यात श्री रामभुज ह्यांना अटक झाली. सरला देवींना भेटायला त्यावेळी गांधीजी गेले होते. पुढे सरला देवींनी गांधीजींबरोबर सारा भारत पालथा घातला, त्यावेळी त्यांचा एककुलता एक मुलगा दीपक अतिशय लहान होता. सगळ्या सभांमध्ये आपल्या गोड गळ्यातून त्या देशभक्तीपर गीतं गात. असं म्हणतात की रवींद्रनाथ टागोरांनी वंदे मातरम च्या पहिल्या दोन ओळींना चाल दिली पण बाकी चाल सरला देवीची आहे आणि हे पूर्ण गीत पहिल्यांदा त्यांच्याच आवाजात गायिले गेले आणि पूर्ण भारतभर प्रसिद्ध झाले.
सप्त-कोटि-कण्ठ-कल-कल-निनाद-कराले
द्विसप्त-कोटि-भुजैर्धृत-खरकरवाले,
अबला केन मा एत बॅले, बहुबलधारिणीं
नमामि तारिणीं, रिपुदलवारिणीं
मातरम्।।
श्री रामभुज ह्यांच्या मृत्यू पश्चात सरला देवी कलकत्त्याला परतल्या. भारती ह्या आपले पत्रिकेचे पुनः मुद्रण त्यांनी सुरू केले. मुलींसाठी शाळा सुरू केली. १९३५ मध्ये त्यांनी आपल्या राजकीय कामातून निवृत्ती घेतली, पण शिक्षण आणि साहित्य सेवा आजन्म केली. १८ ऑगस्ट १९४५ ला त्याची जीवणज्योत शांत झाली. देशाला स्वातंत्र्यात त्यांना बघता आले नाही, पण स्वातंत्र्याची नांदी मात्र त्यांनी नक्कीच अनुभवली असेल.
भारतमातेच्या ह्या वीरांगनेला आमचे कोटी कोटी नमन.
|| वंदे मातरम् ||
— सोनाली तेलंग.
२३/०७/२०२२
संदर्भ:
http://xn--e4b.biographyhindi.net/
http://xn--f4b.inuth.com/
http://xn--g4b.wikipedia.org/
Leave a Reply