एक सुंदर स्त्री, ज्यांच्या सौंदर्या पुढे चंद्राची आभा फिकी पडवी असं वर्णन आपल्या इतिहासात सापडते तर एक स्त्री ज्यांना ब्रिटिश सरकार घाबरत असत असेही वर्णन सापडते हा प्रवास नक्कीच साधा नसणार. जे दैवी देणे आहे त्याचा अहंकार न ठेवता, आपल्या कार्यातून आपली ओळख निर्माण करणाऱ्या महाराणी जिंद कौर.
१८१७ साली मान सिंघ जे रणजितसिंहांच्या कारभारातले मामुली सेवक होते ह्यांच्या घरी जिंद नावाच्या सौंदर्यवतीचा जन्म झाला. जिंद दिसायला अतिशय सुंदर होत्या, त्यांच्या सौंदर्याची चर्चा सर्वदूर व्हायची. राजा रणजितसिंह त्याच्या सौंदर्यावर मोहित झाले आणि त्यांनी विवाहासाठी आपली तलवार पाठवली. जिंद कौर ची महाराणी जिंद कौर झाली. १८३५ साली त्यांनी आपल्या एककुलत्या एक मुलाला जन्म दिला दुलीप सिंघ.
ब्रिटिशांनी आपले हातपाय सर्व भारतभर पसरायला सुरवात केली होती. त्या अनुषंगे त्यांचे कटकारस्थान सुरूच होते. भारत पूर्ण काबीज करण्यात ते यशस्वी होत होते, आता वेग-वेगळ्या राज्यांना काही-बाही कारणं देऊन ते संस्थान आपल्यात सामावून घेणे सुरू होते. महाराजा रणजितसिंह शीखांचे शेवटचे राजा ह्याचा मृत्यू झाला, म्हणजे त्यांना मारले गेले. दुलीप सिंघ त्यावेळी वयाने लहान असल्यामुळे त्यांना राजगादीवर बसविण्यात आले आणि कारभार महाराणी जिंद कौर ह्यांच्याकडे सोपविण्यात आला.
राणीने आपल्या सैन्याची ताकद वाढविली. त्यासाठी इतर राज्यांची मदत सुद्धा घेतली. सैन्याचा खर्च आणि इतर कारभारातील खर्च ह्यांचा ताळमेळ बसवायला विविध उपक्रम राज्यात चालवले. उद्योग-धंद्यांना वाढीस लावले. त्यांचे नेतृत्व गुणांनी सारे राज्य प्रेमाने काबीज केले म्हणूनच त्यांना जनतेने ‘राणी माँ’ ही पदवी स्वखुशीने बहाल केली. दुलीप सिंघ केवळ ९ वर्षाचे होते आणि राज्याला ब्रिटिशांना विरुद्ध पाहिले युद्ध लढावे लागले. राणी जिंद कौर ह्यांनी जबरदस्त मुकाबला केला, पण त्या असफल झाल्या आणि सत्तेवर इंग्रजी हुकुमातीचा हात आला. दुलीप सिंघ अजूनही राजेच होते, पण मुख्य कारभारात इंग्रजांनी त्यांच्या माणसांची नेमणूक केली. राणी जिंद कौर ह्यांच्या हातून सत्ता गेली. तरी त्या पुढचे जवळपास ५-६ वर्ष संघर्ष करत राहिल्या, इंग्रजांच्या नाकी नऊ आणणारी ही राणी त्यांच्यासाठी भीतीचे कारण बनली. इंग्रजांनी राणीची बदनामी सुरू केली, त्यांना ‘बगावती’ म्हणू लागले. आईबरोबर राहिला तर राजकुमार दुलीप सिंघ ब्रिटिश विरोधी होतील म्हणून त्यांनी ९ वर्षाच्या दुलीप सिंघ ह्यांना इंग्लंडला पाठविले आणि महाराणी जिंद कौर ह्यांना त्यांच्या केसांनी पकडून फरफटत कारावासात बंद केले. उत्तर प्रदेश च्या किल्ल्यातून त्या पळून गेल्या आणि नेपाळ ला वास्तव्य केले. आपल्या मुलापासून दूर.
११ वर्ष त्यांचे वास्तव्य नेपाळ मध्ये होते.तिथल्या महाराजांनी राणीला सुरक्षित ठेवले आणि त्याच्या मान मुरतब्यासह ठेवले. पण ब्रिटिश मात्र पूर्णवेळ त्यांच्यावर पाळत ठेऊन होते.११ वर्षांनंतर जेव्हा ब्रिटिश सरकारला वाटले आता राणी जिंद कौर आपल्या साम्राज्याला धोका देऊ शकणार नाही, त्यावेळी त्यांनी महाराणी ला इंग्लडला आपल्या मुलाजवळ यायची परवानगी दिली. पण कदाचित शत्रू राज्यात त्यांचा जीव रमलाच नसेल, त्या आजारी पडत गेल्या आणि २ वर्षातच म्हणजे १८६३ साली त्यांनी इहलोकीची यात्रा संपवली. पण ह्या दोन वर्षात त्यांनी दुलीप सिंघ ह्याच्या मनात देशप्रेमाची बीज जरूर रोवले.
शीख साम्राज्याचे पाहिले राजा – राजा रणजितसिंह ह्यांची शेवटची पत्नी, शीख साम्राज्याचे शेवटचे राजा दुलीप सिंघ ह्यांची आई, इंग्रजी हुकूमतेला घाबरवून सोडणारी एक लढवय्या राणी, आपल्या सौंदर्याच्या नव्हे तर आपल्या कर्तृत्वाच्या बळावर आपल्या प्रजेचे मन काबीज करणारी राणी जिंद कौर ह्यांना आमचे कोटी कोटी नमन.
|| वंदे मातरम् ||
— सोनाली तेलंग.
२५/०७/२०२२
संदर्भ:
http://xn--e4b.sikhri.org/
http://xn--f4b.inuth.com/
http://xn--g4b.wikipedia.com/
Leave a Reply