कानपूर १८५७ च्या विद्रोहाचे केंद्र बनले होते. नाना साहेब तिथूनच सगळी सूत्र हलवत होते. ह्या कानपुर मध्ये एक नर्तकी होत्या, ज्यांच्या सौंदर्यावर, गाण्यावर, नाचण्यावर बरेच लोक फिदा असत, पण मनातून त्या एक देशभक्त होत्या, त्यांचे घर क्रांतिकारकांचे भेटायचे ठिकाण होते, हक्काचा पाणवठा होता आणि निरोप पोचवायचे केंद्र होते. भारतमातेच्या वीरांगना अजीजन बाई.
१८३२ साली त्यांचा जन्म लखनऊ येथे झाला. त्यांच्या आई सुद्धा एक गणिका होत्या. अजीजन बाई लहान असतांनाच त्यांच्या आईचा मृत्यू झाला. अजीजन बाई लखनऊ येथेच सतरंगी महालात लहानच्या मोठ्या झाल्या. पुढे त्या उमराव बेगमच्या महालात कानपूर ला आल्या, त्यांच्या ह्या जागा बदलाच्या बाबतीत कुठलाही दस्तावेज मिळत नाही.
१ जून १८५७ ला कानपूर मध्ये स्वातंत्र्य सेनानींची एक महत्वपूर्ण बैठक झाली, त्याला नाना साहेब, तात्या टोपे आणि इतर क्रांतीकारकां बरोबर अजीजन बाई पण उपस्थित होत्या. गंगेच पाणी हातात घेऊन भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्याची शपथ तिथे उपस्थित प्रत्येकाने घेतली.
अजीजन बाई एक गणिका होत्या, पण मनातून क्रांतिकारी. आपल्या जवळची सगळी संपत्ती त्यांनी नाना साहेबांना दिली, देश सेवेसाठी. फक्त धनच नाही दिले तर स्वतः त्याच्याबरोबर रणभूमीवर सुद्धा उतरल्या. त्या पुरुषाचा वेष करत, कमरेला तलवार आणि हातात बंदूक, घोड्यावर स्वार होऊन रणभूमीत उतरत. त्यांनी एक गणिकांची टोळी बनवली, त्याला ‘मस्तानी टोळी’ असं नाव दिलं, प्रत्येकीला बंदूक चालवायला, तलवार चालवायला शिकवलं. जखमी क्रांतीकारकांवर इलाज करणे, त्यांना खायला-प्यायला देणे, दारुगोळा पुरवणे, अशी सगळी काम अजीजन बाईच्या नेतृत्वाखाली ही मस्तानी टोळी करत असे. वीर सावरकरांनी सुद्धा आपल्या पुस्तकात अजीजन बाईंचा उल्लेख केला आहे, ते म्हणतात, ‘अजीजन बाईंच्या हास्यावर सगळे फिदा असत, त्यांचे मधुर हास्य वीरांना प्रेरणा देत असे परत रणांगणावार जाऊन शत्रूला सामोरे जायला, परंतु एखादा जर युद्धाला पाठ दाखवून आला तर अजीजन बाई कडून त्यांना चांगलाच ओरडा बसत असे. त्या स्वतः कायम युद्धभूमीवर शत्रूवर तुटून पडत असे.’
कानपूरने १८५७ ला पहिला विजय पहिला, पण हा आनंद फार काळ टिकला नाही, इंग्रज फिरून आले, जास्त शक्तीने आले आणि कानपूर काबीज केले. आता घरा-घरातून क्रांतीकारकांना शोधले जाऊ लागले, जरासा संशय आला की लगेच त्याला पकडले जाऊ लागले. अशातच अजीजन बाई पकडल्या गेल्या, त्यांना कमांडर हेनरी हैवलोक समोर प्रस्तुत केले गेले. हेनरी ने त्यांना वचन दिले की क्रांतीकारकांची माहिती दे, तुला सोडून देऊ, परत तुझा व्यवसाय करायला परवानगी देऊ, पण अजीजन बाई झुकल्या नाही, त्यांनी माहिती देण्यास मना केले, परिणाम अपेक्षितच होता, मृत्यूदंड. हेनरी च्या गोळ्या त्यांच्या शरीरातून त्यांचे प्राण घेऊन गेल्या.
फौजी टोपे से मिली अजीजन
हमहूं चलब मैदान मा।
बहू-बेटिन कै इज्जत लूटैं
काटि फैंकब मैदान मा।
अइसन राच्छस बसै न पइहैं
मारि देब घमसान मा
भेद बताउब अंग्रेजन कै
जेतना अपनी जान मा।
भेद खुला तउ कटीं अजीजन
गईं धरती से असमान मा।
कितीदा तरी आपण किती य:किंचित आहोत, असं आपल्याला वाटत राहतं, पण आपल्या कामाने आपण लहान होत नाही, तर विचारांनी लहान होते, हे आपल्या कार्यातून दाखवून देणाऱ्या, प्रत्येक क्षण भारतमातेच्या मुक्ती साठी कटिबद्ध असलेल्या भारतमातेच्या वीरांगना अजीजन बाईंना आमचे कोटी कोटी नमन.
|| वंदे मातरम् ||
— सोनाली तेलंग.
२६/०७/२०२२
संदर्भ:
http://xn--e4b.jivnihindi.com/
http://xn--f4b.inuth.com/
http://xn--g4b.navbharattimes.indiatimes.com/
http://xn--h4b.wikipedia.com/
५.bharat discovery.com
Leave a Reply