त्या व्यवसायाने शिक्षिका होत्या, पण आपल्या मातृभूमीने दिलेल्या हाकेला त्यांनी रुकार द्यायचे ठरविले. त्या जे काम करत होत्या तेही तेवढेच मोलाचे होते तरीसुद्धा मातृभूमीची हाक त्यांना टाळता आली नाही. जे काम केलं ते झोकून देऊन केलं, मर्यादित उपलब्ध संसाधनांमध्ये त्यांनी जे उत्तम तेच करून दाखवले हे सगळ्यात महत्वाचे. भारतमातेच्या वीरांगना अक्कमा चेरीयन.
१४ फेब्रुवारी १९०९ साली त्यांचा जन्म त्रावणकोर येथील कंजिरपल्ली येथे श्री थॉमस चेरीयन आणि अन्नमा चेरीयन ह्यांच्याकडे झाला. आई-वडील दोघेही स्त्री शिक्षणाप्रति जागरूक होते, म्हणूनच स्त्री शिक्षणाच्या विरुद्ध जाणाऱ्या सामाजिक वातावरणात त्यांनी आपल्या मुलींना शिक्षणासाठी मोकळे आकाश दिले. अक्कमा ह्या त्या काळातल्या दोन पदव्या घेणाऱ्या मोजक्याच महिलांमधील एक होत्या. शिक्षण झाल्यावर त्यांनी शाळेत शिक्षिका म्हणून काम सुरू केले. एकूण ६ वर्षाच्या आपल्या कार्यकाळात त्यांनी प्रबंधिका पर्यंतचा प्रवास केला.
१९३८ साली त्रावणकोर येथे राज्य काँग्रेस चे संघटन अस्तित्वात आले, आणि त्या माध्यमातून स्वातंत्र्य चळवळीची ज्वाला त्रावणकोर मध्ये प्रज्वलित झाली. ह्या हाकेला रुकार देण्याचे अक्कमा ह्यांनी ठरवले. हल्लीच्या भाषेत बोलायचे झाले तर चांगल्या सुरू असलेल्या ‘करिअर’ मार्गावर हा मोठा झटका होता. एखाद्या सुज्ञ व्यक्तीने असा निर्णय कधीच घेतला नसता.
स्त्रीला शिक्षण, नौकरी हे सगळं दुरापास्त असण्याचा काळ होता, त्यात अक्कमा ह्यांना सगळंच मिळालं, आता छान आयुष्य जगू शकल्या असत्या पण काळाला, त्यांच्या मनाला हे मजूर नव्हते.
आता त्रावणकोर मध्ये इंग्रजी हुकूमत आणि भारतीयांना मध्ये संघर्ष पेट घेत होता. जे स्वातंत्रता आंदोलन सुरू व्हायचे त्याला दाबण्याचा प्रयत्न इंग्रज करत होते. सविनय अवज्ञा आंदोलन पेट घ्यायला लागले. काँग्रेसच्या सगळ्या बड्या नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले. काम तर पुढे चालायला हवे, म्हणून राज्य काँग्रेस विघटित करण्यात आली, आणि नव्या अध्यक्षांना एकाधिकार देण्यात आला. इंग्रजांनी अध्यक्षांना पकडणे सुरू केले, राज्य काँग्रेस अध्यक्षा अक्कमा चेरीयन ह्यांनी पदभार सांभाळला.
अक्कमा चेरीयन ह्यांनी राज्य कांग्रेसवर लागलेले सगळे प्रतिबंध रद्द करण्यासाठी थंपनूर ते कोडीयार महाला पर्यंत एका विशाल मोर्च्यांचे नेतृत्व केले ज्यात सगळ्यांनी खादी टोपी घातली होती. ब्रिटिश अधिकाऱ्यानी पोलिसांना मोरच्यावर गोळीबार करायला सांगितला, त्यावेळी अक्कमा चेरीयन ह्यांनी गर्जून सांगितले, ‘मी ह्या मोर्च्याची नेता आहे, गोळ्या झाडायच्याच असतील तर माझ्यापासून सुरवात करा.’ अक्कमा चे हे रूप पाहून पोलिसांनी आपले आदेश मागे घेतले. गांधींपर्यत त्रावणकोर ची वार्ता पोचली, त्यांनी अक्कमा चेरीयन ह्यांना ‘त्रावणकोर ची झाशी ची राणी’ अशी उपाधी दिली. १९३९ साली त्यांनी निषिद्ध आदेशांचे उल्लंघन केले अश्या आरोपाखाली ब्रिटिशांनी त्यांना कैद केले.
१९३८ साली देशसेविका म्हणजेच महिलांचा समूह स्वातंत्र्य चळवळीत काम करण्यासाठी चे गठन करण्याचे काम त्यांच्यावर सोपविण्यात आले, त्यासाठी अक्कमा ह्यांनी वेग-वेगळ्या केंद्रांवर प्रवास केला आणि महिलांना स्वातंत्र्य संग्रामची माहिती दिली तसेच त्यांना संग्रामात भाग घ्यायला प्रेरित केले. १९३८ साली जेल मधून बाहेर पडल्यावर त्या पूर्णवेळ काँग्रेस कार्यकर्त्या झाल्या. पुढे चले जाव चळवळीत सुद्धा अक्कमा चेरीयन ह्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. ह्या काळात त्यांना परत एकदा कारावास भोगावा लागला. ह्यावेळी तो एकवर्षं सश्रम कारावास होता. १९४६ साली प्रतिबंध आदेशांचे उल्लंघन केले म्हणून अक्कमा चेरीयन ह्यांना परत एकदा सहा महिन्यांचा कारावास भोगावा लागला. प्रत्येकवेळी कारावासात त्यांचे मनोबल तुटेल ह्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले गेले. पण अक्कमा चेरीयन आपल्या विचारांवर ठाम राहिल्या.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांनी विधान सभेच्या माध्यमातून आपले राजकीय जीवन सुरू ठेवले. पुढे राजकीय पक्षांच्या बदलत्या धोरणामुळे त्यांनी राजकारणाला राम राम ठोकला, पण काम तर करायचे होते, त्यांनी स्वातंत्र्यता सेनानी पेशन बोर्डाचे काम बघितले. ५ मे १९८२ साली त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ह्या तेजस्वी शलकेला आमचे कोटी कोटी प्रणाम.
|| वंदे मातरम् ||
— सोनाली तेलंग.
२७/०७/२०२२
संदर्भ:
१.amritmahotsav.nic.in
http://xn--f4b.inuth.com/
http://xn--g4b.wikipedia.org/
४.indianculture.gov.in
Leave a Reply