सरदार वल्लभभाई पटेल ह्यांची सुपुत्री मणिबेन पटेल, आपल्या वडिलांसारखीच अतिशय तत्वनिष्ठ, शिस्तप्रिय, तसेच निष्ठावंत होत्या. त्या आपल्या वडिलांची सावली बनून राहिल्या तरीही त्यांचे स्वतःचे अस्तित्व वेगळे उठून दिसते, त्यांचे कर्तृत्व वेगळे जाणवते.
३ एप्रिल १९०३ साली त्यांचा जन्म गुजराथ येथे झाला. त्या फक्त ६ वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांच्या आईला देवाज्ञा झाली. सरदार वल्लभभाई पटेल स्वतंत्रता संग्रामात व्यस्त असत, त्यावेळी मणिबेन आपल्या काकांकडे श्री विठ्ठलभाई पटेल ह्यांच्याकडे लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांचं शिक्षण पूर्ण झालं आणि त्या महात्मा गांधींच्या आश्रमात रोज सेवाकार्यासाठी जाऊ लागल्या. देशप्रेम त्यांना वारस्यात मिळाले आणि गांधीजींच्या सहवासात ते अजूनच वृद्धिंगत झाले.
मिठाचा सत्याग्रह, सविनय अवज्ञा चळवळ ह्या सगळ्यात त्यांचा सहभाग मोठा होता. ह्या दरम्यानच्या काळात त्यांना अनेकवेळा जेलयात्रा घडली. १९४२ च्या चले जाव मध्ये तर त्या एका तुकडीचे नेतृत्व करत होत्या, अटक अटळ होतीच. ह्यावेळी मात्र ती ३ वर्षाची होती, सश्रम कारावास. कारावासात सुद्धा त्यांची दिनचर्या अगदी आखीव-रेखीव होती ज्यात, प्रार्थना, सूत काढणे, वाचन, स्वछता, आजाऱ्यांची सेवा असं सगळं असत.
१९२३-२४ साली ब्रिटिश सरकारने जनतेवर कर लादायला सुरवात केली, आणि जे कर देऊ शकत नसे त्यांची जमीन, गाय, बैल,बकरी किव्हा मालमत्ता जप्त करू लागले. मणिबेन त्यावेळी स्त्रियांमध्ये जागरूकता यावी यासाठी सतत प्रयत्नशील होत्या. सरदार पटेल आणि गांधीजींच्या बरोबरीने त्यांनी ‘ना कर आंदोलनात’ काम केलं.
१९३० साली मणिबेन आपल्या वडिलांच्या बरोबर काम करू लागल्या. सरदार पटेलांचे सगळे वेळापत्रक त्याच बघत. त्यांच्या कामाच्या, विचारांच्या नोंदी ठेऊ लागल्या. १९४५ साली कारागृहातून परतल्यावर सुद्धा त्या आपल्या वडिलांबरोबर काम करत राहिल्या. १९५० साली सरदार पटेल ह्यांना देवाज्ञा झाली. त्यानंतर मणिबेन ह्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला. १९७६ सालच्या ‘इमर्जन्सी’ मध्ये त्यांना परत एकदा कारावास भोगावा लागला.
आपल्या राजीकय कारकिर्दीत सुद्धा त्यांची सामाजिक कामे सुरूच होती. वेग-वेगळ्या समाजसेवी संथांची जवाबदारी त्यांनी घेतली आणि ती पार पाडली. गुजराथ विद्यापीठ, वल्लभ विद्या नगर, बरडोली स्वराज आश्रम आणि नवजीवन ट्रस्ट ह्या सगळ्यांच्या माध्यमातून त्या सतत समाजात काम करत राहिल्या. शिक्षण क्षेत्रातील त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे.
त्यांनी आयुष्यभर स्वतः सूत काढलेल्या दोऱ्यापासून निर्मित वस्त्र घातली. प्रवास नेहमीच तृतीय श्रेणीतच केला. आपल्या स्वतःच्या कुठल्याही औद्यापुढे त्यांनी देशहित, समाजसेवा ह्यांना महत्व दिले आणि तश्याच वागल्या. स्वतःचा वेगळा संसार करण्यापेक्षा त्यांनी आपला देशच आपला संसार समजून आजीवन काम करत राहिल्या. १९९० साली त्यांच्या सामाजिक कामाला पूर्णविराम लागला. अशा भारतमातेच्या वीरांगनेला माझे शत शत नमन.
|| वंदे मातरम् ||
— सोनाली तेलंग.
२८/०७/२०२२
संदर्भ:
http://xn--e4b.winentrance.com/
http://xn--f4b.inuth.com/
http://xn--g4b.wikipedia.com/
Leave a Reply