पाठीवरती हात ठेवून फक्त ‘लढ’ म्हणा, प्रत्येकाला अशीच आशा असते आपल्या मोठ्यांकडून. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणणारे स्वामी सगळ्यांचे श्रद्धा स्थान होतात ते ह्याच कारणामुळे. भारताचे स्वातंत्र्य संग्राम असेच सगळ्या स्तरांवर लढले गेले. कोणी प्रत्यक्ष लढले तर कोणी कणखर साथ दिली. मूलमती आपल्या मुलाची पाठीराखी स्वातंत्रता सेनानी.
मूलमती केवळ ११ वर्षाची असतांना त्यांचा विवाह झाला. मध्यप्रेदेश मधील राजपूत घराण्यातील तोमर परिवारात मूलमती सून म्हणून आल्या. शिक्षणाची प्रबळ इच्छा त्यांना स्वस्थ बसू देई ना. आपल्या समाजरचनेच्या आणि परिवाराच्या विरुद्ध त्यांनी स्वतःचे शिक्षण स्वतःच सुरू ठेवले. त्यांना ३ मुलं आणि ५ मुली झाल्या. त्यांच्या घराच्या प्रथेप्रमाणे त्यांच्या सासूबाई मुलींना मारून टाकण्याचा सल्ला देत होत्या, पण मूलमती आपल्या विचारांत पक्की होत्या. एवढ्या सगळ्या विपरीत परिस्थिती आपल्या मुलींना वाढवायचा आणि शिकवायचा निर्णय घेतला. हा केवळ निर्णय नव्हता तर त्यावर अंमल बजावणी सुद्धा केली. आपल्या मुलांमध्ये आणि मुलींमध्ये त्यांनी कधीही फरक केला नाही. समानतेची वागणूक दिली.
रामप्रसाद बिस्मिल ज्यांनी “सरफारोशी की तमन्ना अब हमारे दिल मे है, देखना है जोर कितना बाजू-ए कातील मे है” श्रेष्ठ क्रांतिकारी आणि कवी ज्यांनी हा नारा आपल्या स्वातंत्र्य संग्रामला दिला त्याच्या आई म्हणजे मूलमती. त्यांना घडविण्यात मूलमतींचा मोठाच हात आहे. आपल्या मुलाला देशप्रेमाची, देशसेवेचे धडे जणू त्यांनी बालघुट्टीतूनच दिले. त्यांच्या सगळ्या क्रांतिकारी चळवळींना आईचे पाठबळ होते. त्यासाठी मूलमतींना अगदी आपल्या घरच्यांचा ओरडासुद्धा खावा लागे.
रामप्रसाद ह्यांचे पहिले पिस्तुल घ्यायला पैसा मूलमतींना पुरवला. ते हाती देतांना मात्र एक वचन घ्यायचे त्या विसरल्या नाहीत, की अगदी कुठल्याही प्रसंगी, आपल्या शत्रूवर सुद्धा ह्या शस्त्राचा गैरवापर करणार नाही. रामप्रसाद क्रांतिकारी कवी होते. त्यांचे लिखाण मुख्यत्वे हिंदी आणि उर्दू मधून असे. त्या कविता देशप्रेमींसाठी स्फुर्तीगान होत्या. त्यांचे सगळे साहित्य, कविता, पुस्तकं हे सगळं छपण्यासाठी चा खर्च सुद्धा मूलमती आपल्या घरखर्चातून वाचवलेल्या तुटपुंज्या जमापुंजीतून देत असे. रामप्रसाद ने हा मार्ग स्वतः निवडला होता, तो कठीण होता, कधीतरी नैराश्य जवळ आले तरी मूलमती त्यांच्यासाठी त्यांचा आधार म्हणून सतत सोबत असत. त्यांच्याकडूनच सदाचार, धैर्य आणि देशप्रेमाचा वारसा रामप्रसाद बिस्मिल ह्यांना मिळाला असे त्यांनी लिहून ठेवले आहे.
हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन (जे क्रांतिकरि साहित्य छापत)त्याचे सर्वेसर्वा आणि मैनपूर षडयंत्र केस, तसेच काकोरी रेल डाका ह्यासाठी आपल्या वयाच्या ३० व्या वर्षी त्यांना फासावर चढवले गेले. १९ डिसेंम्बर १९२७ ला त्यांना फाशी होणार होती. त्या आधी त्यांनी आपले आत्मचरित्र लिहिले. त्यात ते लिहितात, “जर माझी आई मूलमती नसती, तर मी सुद्धा एक सामान्य जीवन जगणारा, संसार चक्रात अडकलेला तरुण झालो असतो”.
आदल्या दिवशी आई मूलमती त्यांला भेटायला गेली. रामप्रसाद रडत होते. आई मूलमती म्हणाली, ‘मला तुझा अभिमान वाटतो, तू आपल्या देशासाठी आपले आयुष्य वेचले, तू मृत्यू च्या भीतीने रडावे हे मला मान्य नाही’. त्यावर रामप्रसाद म्हणाले मृत्यू चे भय नाही तर परत तुला भेटू शकणार नाही हे दुःख आहे.
रामप्रसाद ह्यांच्या मृत्यू नंतर ब्रिटिश प्रशासना च्या विरुद्ध आयोजित सभेमध्ये मूलमती आपल्या एककुलत्या एक जीवित अपत्यांला सुशीलचंद्र ला बरोबर घेऊन गेल्या आणि म्हणाल्या, देशासाठी माझा हा मुलगा पण समर्पित आहे.
त्या काळात, काळाच्या कितीतरी पुढची विचारशैली असलेल्या आणि त्याचप्रमाणे आचरण करणाऱ्या त्या राष्ट्रमातेला माझे शतशः नमन.
— सोनली तेलंग.
संदर्भ : samanygyaaan.com, Inuth.com
०९/०६/२०२२.
Leave a Reply