“कोई उनको हब्सिन कहता, कोई कहता नीच-अछूत,
अबला कोई उन्हें बतलाये, कोई कहे उन्हें मजबूत”
ह्या ओळी त्या दलित वीरांगनांसाठी लिहिल्या गेल्या आहेत ज्यांनी १८५७ च्या समरात आपले सर्वस्व पणाला लावले. १८५७ चे समर. भारतातला पाहिला राष्ट्रीय उठाव अशा नावाने आपण ज्याला ओळखतो. १७५७ ते १८५६ ह्या १०० वर्षाच्या काळात इंग्रजी राज्यकर्त्यांनी सगळ्या भारतभर आपले हातपाय पसरवले. व्यापाराच्या नावाखाली आलेल्या इंग्रजांनी पूर्ण देशच गिळंकृत करायचे, त्यांचे मनसुबे आता सगळ्यांना चांगलेच लक्षात आले होते. जनतेत असंतोष वाढत होता, आणि त्याचा परिणाम म्हणजे १८५७ चे समर होय. ऊदा देवी ह्या त्यातल्याच एक नेमबाज.
अवध मधील एका दलित कुटुंबात जन्माला आलेल्या उदा देवी ह्या अतिशय विचारवंत आणि शूर होत्या. त्यांचं लग्न बेगम हजरत महल ह्यांच्या सैन्यातील सैनिक श्री मक्का पासी ह्यांच्याशी झालं. ऊदा देवींना जनतेच्या मनात इंग्रज हुकूमती विरुद्ध असलेला रोष लक्षात आला. तिथल्या राणी बेगम हजरत महल ह्यांच्यापर्यत त्या पोचल्या आणि त्यांनी राणीला ह्या ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी तयारी करायला गळ घातली. राणीने एक महिला तुकडी तयार करायला प्रोत्साहन दिले आणि ऊदा देवींने त्याचे नेतृत्व केले.
१८५७ चे रणशिंग फुंकले गेले. कमांडर कोलीन कॅम्पबेल च्या नेतृत्वाखाली लखनऊ च्या सिकंदरबाग येथे ब्रिटिशांनी हमला केला. सुरवातीलाच हजारो दलित विरांगनांच्या तुकडीचा सामना ब्रिटिश सरकार ला करावा लागला. तेवढ्यात ऊदा देवी पर्यंत त्यांचा पती मक्का पासी ह्यांच्या हौतात्म्याची खबर आली. आता त्यांची मनाची तयारी आणि द्वेष दोन्हीही अजूनच कणखर बनले. आपल्या तुकडीला योग्य ते मार्गदर्शन करून, त्या जवळच्याच एका झाडावर चढल्या आणि तिथून ब्रिटिश सैन्यावर गोळ्या झाडू लागल्या. एकट्या ऊदा देवींनी ३० च्या वर इंग्रजी सैनिकांना मारले. एका ब्रिटीश प्रमुखाच्या हे लक्षात आले की झाडावरून गोळ्या झाडल्या जात आहेत, त्यांनी झाडाला निशाणा बनवला. ऊदा देवी झाडावरून पडल्या त्याच मुळी मृत होऊन.
शेवटच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या ह्या नेमबाज वीरांगनेला आम्हा सर्व भारतीयांतर्फे ही शब्दसुमानांजली.
वंदे मातरम्.
— सोनाली तेलंग.
संदर्भ: Inuth.com, thewire.in, hindi.thebetterindia.com, en.wikipedia.com
११/०६/२०२२.
Leave a Reply