भारतरत्न महर्षी अण्णासाहेब तथा धोंडो केशव कर्वे हे आधुनिक भारतातील स्त्री-शिक्षणाचा पाया रोवणारे क्रियाशील समाजसुधारक.
विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना केली. अण्णांनी 1904 साली हिंगणे येथील माळावर सहा एकर जागा मिळविली. तेथे छोटेसे घर बांधून अनाथ बालिका व निराधार विधवांसाठी वसतिगृह बांधले. ते स्वतही तेथेच राहू लागले. त्यांचे हे घर म्हणजे दुर्दैवी स्त्रियांचे माहेरघर होते. अण्णांनी या निराधार स्त्रियांसाठी तेथे प्राथमिक व माध्यमिक शाळा काढली. पुढे महिलांसाठी महाविद्यालय व महिला विद्यापीठाची स्थापना ही केली. विद्यापीठाचे संघटनात्मक काम स्वत अण्णा जातीने बघत असत. हे विद्यापीठ प्रथम पुण्यास होते. विद्यापीठासाठी विठ्ठलदास ठाकरसी यांनी मोठी देणगी दिली. त्यामुळे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ (SNDT) असे नाव देण्यात आले. हे विद्यापीठ पुण्याहून मुंबईस आले. सरकारची विद्यापीठाला मान्यता मिळाली. भारतातील हे पहिले महिला विद्यापीठ आहे.
मध्यंतरीच्या काळात अण्णांच्या पत्नी निवर्तल्या. त्यानंतर त्यांनी एका विधवेशी पुनर्विवाह केला. या पुनर्विवाहामुळे मुरूड गावानी अण्णांना वाळीत टाकले होते. अण्णा शतायुषी झाले. त्यावेळेस मात्र याच गावानी त्यांची जन्मशताब्दी साजरी केली. यातच अण्णा, त्यांचे कार्य याची थोरवी लक्षात येते.
महिला स्वावलंबी व्हाव्या यासाठी निष्काम मठ स्थापन केला. 1936 साली ग्रामीण शिक्षणासाठी महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ स्थापन केले. अस्पृश्यता निवारणासाठी 1944 मध्ये समतासंघ स्थापन केला. त्यांनी लावलेल्या शिक्षणाच्या रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे.
अण्णासाहेब कर्वे यांचे वयाच्या 104 व्या वर्षी 9 नोव्हेंबर 1962 रोजी निधन झाले.
— स्नेहा जैन
Leave a Reply