नवीन लेखन...

भारतरत्न स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी

स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९२२ रोजी झाला.

भीमसेन जोशींचे वडील शिक्षक होते. भीमसेन यांचा संगीताकडे असलेला ओढा त्यांना पसंत नव्हता. भीमसेन जोशी यांनी वैद्यकीय अथवा अभियांत्रिकी शिक्षण घ्यावे असा त्यांचा आग्रह होता. या मतभेदांमुळे अखेर भीमसेनांनी घर सोडण्याचे आणि त्याकाळी शास्त्रीय संगीतासाठी ख्यातनाम असलेल्या ग्वाल्हेर, लखनौ, रामपूर या शहरांपैकी एका ठिकाणी जाण्याचे ठरविले. व १९३३ साली वयाच्या अकराव्या वर्षी घर सोडले आणि ते ग्वाल्हेरात दाखल झाले.

उस्ताद अब्दुल करीम खाँ, वझेबुवा, केसरबाई केरकर, उस्ताद बिसमिल्ला खाँ, वगैरेंचे गायन-वादन त्यांनी ऐकले. सुरुवातीला ते इनायत खाँ यांचे शिष्य जनाप्पा कुर्तकोटी यांच्याकडे गायन शिकले. त्यानंतर जालंदर येथे पंडित मंगतराम यांच्याकडे व ग्वाल्हेर येथे राजाभय्या पूंछवाले यांच्याकडेही गाण्याचे शिक्षण घेतले. त्यानंतर ते रामपूर येथे मुश्ताक हुसेन खाँ यांच्याकडे काही काळ शिकले. अशा प्रकारे काही वर्षे ग्वाल्हेर, लखनौ, रामपूर येथे व्यतीत केल्यानंतर त्यांचा शोध घेत असलेल्या वडिलांशी त्यांची भेट झाली आणि भीमसेन पुन्हा घरी परत आले. भीमसेनांचा संगीतासाठीचा तीव्र ओढा पाहून त्यांचे वडील भीमसेनांना जवळच असलेल्या कुंदगोळ गावातील रामभाऊ कुंदगोळकर यांच्याकडे घेऊन गेले आणि रामभाऊंनी भीमसेनांना त्यांचे शिष्यत्व दिले. रामभाऊ ’सवाई गंधर्व’ म्हणून ख्यातनाम होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, भीमसेनांनी हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाचे धडे घेतले. रामभाऊ हे किराणा घराण्याच्या पद्धतीचे गायक होते. त्या काळातील परंपरेनुसार भीमसेनांनी गुरुगृही राहून कष्टपूर्वक गायनाचे धडे घेतले. रामभाऊ त्यांच्याकडून तोडी, पुरिया, मुलतानी वगैरे रागांवर रोज सुमारे आठ तास मेहनत करवून घेत. आणि त्यांच्याकडून भीमसेनांनी १९३६ ते १९४१ पर्यंतच्या काळात शक्य तेवढे ज्ञान आत्मसात केले. त्यावेळी आणि त्यानंतरही ते रोज सोळा तासांचा रियाज करण्याचा स्वतःचा दंडक पाळीत. त्यानंतर गुरू रामभाऊंच्या आज्ञेनुसार भीमसेनांनी त्यांचा निरोप घेतला आणि ते पुणे येथे आले.

भीमसेनांनी त्यांची पहिली संगीत मैफिल १९४२ साली वयाच्या केवळ एकोणविसाव्या वर्षी पुण्यातील हिराबागेत घेतली. सवाई गंधर्वांच्या षष्ट्यब्दी सोहळ्यानिमित्त त्यांनी गायन केले आणि महाराष्ट्राला त्यांची पहिली नीट ओळख झाली. भीमसेन जोशींना हिंदुस्थानी शास्त्रीय गायन पद्धतीचे ख्याल गायक म्हणत असले तरी ते ठुमरीही अतिशय छान गात.

भारतात शास्त्रीय गायनाच्या हिंदुस्थानी आणि कर्नाटकी या दोन प्रमुख शाखा मानल्या जातात. भीमसेन जोशींचे वैशिष्ट्य असे की ते दक्षिणी भारतात प्रचलित असलेल्या कर्नाटकी गायनातल्या चीजा हिंदुस्थानी पद्धतीने गाऊन दाखवीत. त्यामुळे त्यांचे गायन कर्नाटकी संगीताची परंपरा असलेल्या दक्षिणी भारतातही, विशेषतः तरुण पिढीमध्ये लोकप्रिय झाले. आपल्या स्वरांची नदी जगाच्या दहा दिशांना अथांग वाहणाऱ्या संगीतसम्राट तसेच ख्याल गायकीसाठी सर्वश्रृत असलेल्या पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेली भजने देखील प्रसिद्ध आहेत. शास्त्रीय संगीत व भजन यासह त्यांनी अनेक चित्रपटगीते, ठुमरी देखील वेगळ्या शैलीत गायल्यामुळे प्रसिद्ध आहे.

त्यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.केवळ मराठीच नाही, तर संपूर्ण देशासह विदेशातील रसिक भीमसेन जोशी यांच्या आवाजाने संगीत मैफल सुरू असताना जागेवरच खिळवून ठेवत होते. आपल्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करून त्यांच्यावर भुरळ घातली होती. त्यांच्या त्या काळी वारंवार होणाऱ्या विमान प्रवासांमुळे, त्यांना पु.ल.देशपांडे यांनी गमतीने ‘हवाईगंधर्व’ ही पदवी बहाल केली होती. भीमसेन जोशी यांनी, त्यांचे गुरू सवाई गंधर्व यांच्या स्मरणार्थ १९५२ सालापासून पुणे येथे दरवर्षी होणारा सवाई गंधर्व संगीत महोत्सव सुरू केला.

महान गायक भीमसेन जोशीं यांचे २४ जानेवारी २०११ निधन रोजी झाले. आपल्या समूहाकडून भीमसेन जोशी यांना आदरांजली.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..